Mon, Mar 25, 2019 09:39होमपेज › Kolhapur › गुरुपौर्णिमा : गुरु हा संत कुळीचा राजा

गुरुपौर्णिमा : गुरु हा संत कुळीचा राजा

Published On: Jul 27 2018 7:33AM | Last Updated: Jul 27 2018 7:33AMप्रा. शिवाजीराव ज. भुकेले

आज आषाढी पौर्णिमा अर्थात गुरुपौर्णिमा. हिलाच व्यासपौर्णिमाही म्हटले जाते. गुरूविषयी अन् महर्षी व्यासांच्या विषयी कृतज्ञता प्रकट करण्याचा आजचा दिवस भारतीय गुरू परंपरेत व्यासांना गुरूंचे गुरू अर्थात आद्य गुरू मानले आहे. जीव ब्रह्म ऐक्य ज्ञानाचा उगम व्यासांच्या पासून होतो, अशी भारतीयांची धारणा आहे. म्हणूनच तर, व्यासांच्या अप्रतिम प्रतीभेला साहित्यरूप मेखलेची उपमा देताना ज्ञानोबा माऊली म्हणतात की,

तेथे व्यासादिंकाच्या मती । चोखाळपणे झळकती । पिया मेखला मिखीती पल्लव सडक । 

खरंच, गुरू हीच साधकांचरू जीवनातील चैतन्यशक्ती आहे. आयुष्याच्या पथावर जेव्हा दिशा अंधारलेल्या वाटू लागतात, महत्त्वाकांक्षांची घुबडे स्वत:च्या भोवतीनेच घुत्कार घालू लागतात, अपेक्षांचे कोळसे होऊ लागतात, जगावं की जगू नये, असे यक्ष प्रश्‍न डोके भंडावून सोडतात, तेव्हा गुरू नावाचा जीवनाचा आधार संकटाच्या व दु:खाच्या मार्गातील अडथळे नाहीसे करून जीवनाची पाऊलवाट दाखवणारा वाटाड्या असतो. चैतन्याचा प्रकाश दाखवणारा गुरू हा एक मंगलदीप आहे. बाकी सगळे दिवे विझले तरी चालतील; परंतु सद्शिष्यांच्या अंत:करणात ज्ञानदीप प्रज्वलित करणारा गुरू नावाचा मंगलदीप विझता कामा नये. त्याचे रक्षण करण्यासाठी शिष्याने ‘तनु मनु जीवे’ प्रयत्न करणे गरजेचे आहे. कारण, परमार्थ मार्गावरील गुरू केवळ ज्ञान देत नाहीत, तर जीवनाला आतून समृद्ध करणारी, आयुष्याला उज्ज्वलता देणारी आणि चर्म चक्षु पलीकडची क्रांतदर्शी दृष्टी देणारे गुरू हे एक द्रष्टे वाक्पीठ असते. ते केवळ हटातटाने जटा रंगवून मठामठांची उठाठेव करीत नाहीत. एखाद्या दर्शन सोहळ्याद्वारे शिष्याच्या भोवतीने प्रदर्शनाचे वलय निर्माण करीत नाहीत, तर आपल्या शिष्याच्या जीवनात जे स्व स्वरूपाचे अज्ञान असते, त्याला समूळ नष्ट करण्याचे काम फक्त सद्गुरूच करू शकतात. आपल्या शिष्याच्या मनात सृष्टीकडे प्रेम भावनेने पाहण्याची अंर्तदृष्टी ते निर्माण करतात. म्हणूनच संत कबीरांनी म्हटले होते- 

गुरूविण कोण बतावे वाट । बडा बिकट यम घाट ॥

भ्रांति की बाडी नदियां बिचमों । अहंकारकी लाट ॥  

मदमत्सरकी धार बरसत । माया पवन घनदाट ॥

काम क्रोध दो पर्वत ठाडे । लोभ चोर संगात ॥

कहत कबीरा सुन मेरे गुनिया । क्यौं करना बोभाट ॥

आगम सागरात गुरू या तीन वर्णांचा अर्थ स्पष्ट करताना म्हटले आहे, गुरू शब्दातला ‘ग’कार हा सिद्धी देणारा रकार हा पाप हारक व उकार हा अव्यक्त विष्णू आहे आणि एका गुरूमध्ये या तिन्हींचा समावेश झालेला असतो. म्हणून तर, देवी भागवताने गुरूला ब्रह्मा विष्णू व महेश्‍वराचे प्रतिनिधी मानले आहे. ब्रह्मा हा ज्याप्रमाणे नवनिर्मितीचे कार्य करतो, त्याप्रमाणेच गुरू आपल्या शिष्याच्या अंत:करणात नवविचारांचे अंकुर फुलविण्याचे काम करतो. एवढेच नव्हे, तर सद्विचाराची कास धरलेल्या सज्जनांच्यामुळे समाजात सद्गुणांचे संवर्धन होते. या भावनेपोटी चांगल्या गुणांची रक्षण करणारे सद्शिष्य घडविण्याचे काम सद्गुरूच करतो. आपल्या शिष्याच्या मनात अज्ञान, अहंकार, मोह, माया, या कु-विचारांचे जे तण आहे, यांचा नाश करणारी महेशी शक्ती म्हणजे खरा सद्गुरू होय. जो शब्दसृष्टीच्या जगातील असा एक ईश्‍वर आहे की, आपल्या दिव्य प्रज्ञेने शिष्यांच्या जीवनरूपी वेलीला काव्यात्मकतेचे फळ आणणारा तो एक वसंत ऋतू होय. गुरुकृपेच्या प्रसन्न चंद्राम्याच्या प्रकाशाने शिष्याच्या हृदयात स्फुर्तीच्या पौर्णिमेचा उदय होतो आणि मग त्यांच्या प्रतिभेला रसवृत्तीचे भरते येते. अशा या सद्गुरू नावाच्या शक्तीविषयी हजारो वर्षे विचारमंथन होत आले आहे व पुढेही होत राहणार आहे. 

सर्वसाधारणपणे मध्यकालीन धर्मसाधनेत व विशेषत: मुसलमानी आक्रमाणानंतरच्या धार्मिक संप्रदायात गुरूला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले. महाराष्ट्राच्या बाबतीत विचार केला, तर महानुभाव, नागेश, दत्त, शैव, वारकरी इत्यादी संप्रदायात गुरूचे महत्त्व अन्यन्यसाधारण मानन्यात आले आहे. त्यानंतरच्या कालखंडात श्री रामकृष्ण परमहंसांसारख्या परमज्ञानी सद्गुरूने विवेकानंदांना आपला आध्यात्मिक उत्तराधिकारी त्यांच्या मस्तकावर हात ठेवून केले. खरे तर, आई-वडील मुलांना केवळ जन्म देतात; परंतु गुरू मात्र त्यांच्या मनात बोधपुत्राचा उदय करून हजारो स्त्री-पुरुषांची जन्म-मरणातून सुटका करतो. म्हणूनच, मातापित्यांपेक्षाही गुरूचे स्थान श्रेष्ठ आहे. मध्ययुगीने संतपरंपरेने तर म्हटले आहे की, लोह परीसाची न साहे उपमा सद्गुरू महिमा अगाधची. लोखंडाला परीसाचा स्पर्श झाल्यानंतर त्याचे सोन्यामध्ये रूपांतर होते; परंतु परीस लोखंडाला परीस करीत नाही; परंतु सद्गुरूच्या परीसस्पर्शाने शिष्याच्या अंतःकरणात जीव ब्रह्म ऐक्य ज्ञानाचा उदय झाल्यानंतर तो सद्गुरू ज्या पदावर आरूढ झालेले आहेत, त्याच पदावर स्वत: जाऊन पोहोचतो. म्हणून, संत ज्ञानदेवांसारख्या प्रतिभावंत शिष्याने आपले सद्गुरू निवृत्तीनाथांचे वर्णन करताना म्हटले आहे, 

जैसे डोळ्या अंजन भेटी । तेवेळी दृष्टीसी फाटा फुटे ॥

मग वास पाहिजे तेथ प्रकटे । महानिधी ॥

का चिंतामणी आलीया हाती । सदा विजयी वृत्ती मनोरथी ।

तैसा मी पूर्ण काम श्रीनिवृत्ती ज्ञानदेव म्हणे ॥ 

श्रीगुरू हे सोन्या-चांदीचे दान देत नसले, तरी कैवल्य कणकाचे दान देतात. जे जन्म-जन्मांतरापर्यंत कधीच संपत नाही. अनंत कोटी ब्रह्मांडाचे अनंत रूप पाहणारी दिव्य दृष्टी केवळ सद्गुरू कृपेमुळे प्राप्त होऊ शकते. म्हणून, संत ज्ञानदेवांनी आपल्या सद्गुरूलाच आपल्या जीवनाचे परमनिधान मानले आहे. 

अवधूत संप्रदायाने तर, गुरूला जीवनारूपी सोपानाचा मार्ग दाखवणारा व अंधाराच्या साम्राज्यात प्रकाशाची बिजे रोवणारा द्रष्टा महापुरुष मानले आहे. खुद्द भगवान दत्तात्रयांनी या पंचतत्त्वातील पृथ्वी, वायू, आकाश, अग्नी, सितांश, चंडांश, अजगर, सिंधू, पतंग, मधमाशी, हत्ती, भृंग, हरीण, मीन, वृक्ष इत्यादी चोवीस नैसर्गिक शक्तींना गुरू मानले आहे. मराठीयांच्या नगरी प्राकृताचा सुकाळ करणार्‍या संत एकनाथांनीसुद्धा यदु अवधुत संवादाद्वारा या चोवीस गुरूंचे महत्त्व सिद्ध केले आहे. आज या गुरूत्व शक्तीला आम्ही पारखे होत आहोत. पृथ्वीची सहनशीता व शांती आमच्यातून नष्ट होत आहे. पर्वताची निश्‍चलता आज कुठल्या कुठे पळून जात आहे. जो वृक्ष तोडणार्‍यालाही सावली देतो व लावणार्‍यालाही सावली देतो, त्या वृक्षातील परोपकारी वृत्तीच आज आमच्यातून नष्ट होत आहे. दुर्गुणाच्या कुर्‍हाडीने ज्याने आमची लावणी केली, त्यालाच तोडायला आम्ही निघालेलो आहोत. भ्रमराची गुंजारोव करण्याची व निरपेक्ष आनंद मिळवण्याची वृत्ती ही परमार्थिकाच्या ठिकाणी असावी; परंतु ती आज आमच्यातून नष्ट होत आहे. म्हणून, मानवी देहधारी गुरूबरोबर या सुपर नॅचरल पॉवरलाही सर्वश्रेष्ठ गुरू मानणे आज अगत्याचे आहे. 

संत एकनाथांसारख्या वयाव्या अकराव्या वर्षी गुरुकृपेला पात्र झालेल्या व जीवनाची लढाई आणि प्रत्यक्ष युद्धभूमितील लढाई जिंकलेल्या शांतीब्रह्माने आपल्या जीवनातील गुरूच्या अढळ स्थानाचे वर्णन करताना म्हटले आहे. 

गुरू हा साधकासी साह्य । गुरू हा भक्तालागी माय ।

गुरू हा कामधेनू गाय । भक्ताघरी दुभतसे ॥

गुरू हा संत कुळीचा राजा । गुरू हा प्राण विसावा माझा ।

गुरूविण अनुभव नाही दुजा । पाहता या त्रीभुवनी ॥

संतांच्या दृष्टीने खरा सद्गुरू काया-वाचा-मनाने उदार होऊन दीनजनावर कृपा करतो, शिष्याची संसार बंधने तोडून टाकतो आणि अहंकाराचे ठाणे उठवितो जो महापुरुष सदासर्वकाळ ब्रह्मानंदात डोलत राहतो व शिष्याला त्याच्या भक्तिभावाप्रमाणे प्रबोधन करण्यास समर्थ असतो, ज्याचा जसा भाव असेल तसा त्याला अनुभव देतो; पण मानात मात्र गुरूत्वाचा अहंभाव धरीत नाही. शिष्यापासून सेवा घेणे हे त्यांना स्वप्नातही आठवत नाही. इतकेच नव्हे, तर तो शिष्याचीच सेवा आपण स्वत: करतो आणि शिष्याला पूज्य मानतो. ‘शिष्य देखावा पुत्रासमान’ असे स्मृतिवाक्याचे प्रमाण आहे. त्याला अनुसरून तो शिष्याला गौण दृष्टीने न पाहता पूर्ण ब्रह्मत्वानेच पाहतो.