Thu, Apr 25, 2019 13:27होमपेज › Kolhapur › डोळ्याचे पारणे फेडणारे ‘प्रति पंढरपूर’ नंदवाळ (व्हिडिओ) 

डोळ्याचे पारणे फेडणारे ‘प्रति पंढरपूर’ नंदवाळ (व्हिडिओ)

Published On: Jul 23 2018 3:32PM | Last Updated: Jul 23 2018 4:30PMकोल्‍हापूर : प्रतिनिधी

साडेतीन शक्‍ती पीठांपैकी एक पूर्ण शक्‍तीपीठ म्हणून अवघ्या देशात कोल्‍हापूरच्या अंबाबाईची ओळख आहे. याच अंबाबाईच्या मंदिरापासून अवघ्‍या दहा किलोमिटर अंतरावर नंदवाळ गाव आहे. या नंदवाळला प्रति पंढरपूर म्‍हणून ओळखले जाते. आधी नंदग्राम नंतर नंदापूर व आज नंदवाळ अशी या नंदवाळ गावची ओळख. येथे विठ्ठलाचे देवस्थान अतिशय प्राचीन व प्रसिध्द आहे. या मंदिरातील मूर्ती स्वयंभू असून विठ्ठल, राई (सत्‍यभामा) व रखुमाबाई, अशा तीन मूर्ती एकत्र असल्याने हे वैशिष्ट्यपूर्ण मंदिर आहे. मूळ मंदिर अतिशय प्राचीन हेमाडपंथी असून, या मंदिराला अनेक शतकांचा इतिहास आहे.नंदवाळमध्ये आषाढी वारीच्या आदल्‍या दिवशी रात्री विठ्ठल भगवंत मुक्‍कामी असतात आणि ते आषाढी वारीदिवशी सकाळी पंढरपूरला जातात अशी आख्यायिका आहे. या ठिकाणाला महाराष्ट्र शासनाने तीर्थक्षेत्राचा दर्जा दिला आहे. आषाढी एकादशीला या नंदवाळमध्ये ४ ते ५ लाख भाविकांचे पाय लागतात. सगळा परिसर टाळ-मृदंगाच्या गजरात भाविकांच्या महापुराने ओसंडून वाहत असतो. 
 

खर्‍या अर्थाने नंदवाळ हे प्रति पंढरी आहे. पंढरीला जे बघायला मिळते तेच इथे आहे. तशीच चंद्रभागा नदी आहे. (भीमाशंकर येथील गुप्‍त नदी) आत तलाव आणि मंदिर आहे. तसेच येथे स्वयंभू पिंडही आहे. या पिंडीला कान लावताच पाण्याचे नाद ऐकायला मिळतात, असे म्‍हटले जाते. देवाच्या समोरच गावाच्या मध्यभागी पुंडलिकाचे मंदिर असून, प्राचीन काळातील पंढरपूरप्रमाणे येथेही गाईमूख आहे. त्याच्या समोर गोपाळ कृष्णाचे मंदिर आहे. या ठिकाणच्या नोंदी करवीर महात्‍म्यातही आहेत.

 

आषाढी एकादशीच्या अगोदर अंबाबाईच्या मंदिराची नगरप्रदक्षिणा करून दिंड्यांतून भाविक नंदवाळकडे रवाना होतात. याचा रिंगण सोहळा सकाळी ११ ते १ च्या दरम्यान पुईखडी येथे होतो. हा ज्ञानोबा, तुकोबांच्या पालख्यांप्रमाणेच गोल रिंगण सोहळा असतो. या ठिकाणी पंचक्रोशीतील भजनी मंडळे, वारकरी, दिंड्या यांच्या स्‍वागतासाठी सपूर्ण गाव उत्‍सुक असतो. राधानगरी ते नंदवाळ व कोल्हापूर ते नंदवाळकडे येणार्‍या दिंडींना प्रसादाचे वाटप ठिकठिकाणी सेवा म्हणून केलेले असते. 
विठ्ठल नामाच्या गजरात भगव्या पताका, तुळशी वृंदावन, टाळ मृदूंगाचा ठेका आणि ध्येयभान विसरून तल्‍लीन झालेला वारकरी नंदवाळ येथे दाखल होतो. जय जय राम कृष्ण हरी, ज्ञानोबा माऊली तुकाराम सारख्या भजनांच्या तालावर जागोजागी महिला, वारकरी फुगडीचा फेरा धरतात. या उत्‍साही आणि चैतन्यमयी वातावरणात प्रति पंढरीत आषाढीचा सोहळा संपन्‍न होतो.