Thu, Apr 18, 2019 16:39होमपेज › Kolhapur › उमलू द्या कळ्यांना : लहान मुलांचे शोषण थांबवा

ब्लॉग : येणारी पिढी कुणालाच माफ करणार नाही

Published On: Feb 27 2018 5:48PM | Last Updated: Feb 27 2018 5:55PMधनाजी सुर्वे : पुढारी ऑनलाईन

बालपण म्‍हणजे माणसांच्या आयुष्यातील सुंदर काळ. माणसाच्या आयुष्यातील हा काळ कुणी हिरावून घेऊ नये म्‍हणून काळानुरूप कुटुंबियांसह आता अनेक सामाजिक संस्‍था, सेलिब्रेटी प्रयत्‍न करू लागले आहेत. काळानुसार दिवस बदलत गेले. या बदलणार्‍या काळात माणसांचं बालपण कळत, नकळत, दृश्य, अदृश्य स्‍वरूपात होरपळून निघू लागलं. कधी नातेवाईक, कधी शाळेतील मित्र, कधी परिसरातील शेजारीपाजार्‍यांकडून हे बालपण होरपळून, हिरावून घेऊ लागलं. बर्‍या वाईट वाढत्‍या घटनांमुळे बालपणाचा म्‍हणजेच बालहक्‍कांचा आणि बालकांच्या शोषणाचा प्रश्न एैरणीवर आला. बालकांच्या आयुष्याच्या प्रश्नावर समाजामध्ये तीव्र भावना उमटू लागल्या आहेत. 

अलिकडेच कोल्‍हापूरमध्ये समाज रक्षकाच्या एका मुलीनेच अल्‍पवयीन दत्तक मुलावर अत्‍याचार केल्याची घटना घडली. मुलगा अल्‍पवयीन आणि कायद्याच्या रक्षकांच्या कुटुंबियांडूनच अशा घटना घडू लागल्याने या घटनेचे गांभीर्य तीव्र झाले आहे. अल्पवयीन मुलाला कायदेशीर दत्तक न घेता घरकामासाठी त्याचा वापर करून त्‍याच्यावर शारीरिक व मानसिक अत्याचार करण्यात आले. अत्याचाराची बाब उघड होताच सारे कुटुंबीय पसार झाले. अत्याचार करणे आणि त्यानंतर सोयीने पसार होणे ही बाब समाजासाठी घातक आणि गंभीर आहे.

दत्तक म्‍हणून एखादा जीव घरात आणायचा, त्यांना माहित असतं, ना त्‍याला घर आहे, ना त्याचं नातंगोतं आहे. या एवढ्याच गोष्टी अन्याय, अत्‍याचार करणार्‍यांना पुरेशा असतात. अन्‍न, निवार्‍यासाठी भटकण्यापेक्षा अनाथ मुलं, मुली हे असे अत्याचार सहन करतात आणि सहन नाही झालं की मग रस्‍ता मिळेल तिकडे किंवा जीव संपवण्याचा निर्णय घेतात. आयुष्याचा आनंद सुरू होण्यापूर्वीच मग आनंद हिरावून घेतला जातो. कालांतराने हे सगळं इतिहास जमा होतं. अनाथांच्या जीवाची कुणी कुठे खातरजमा करीत नाहीत, ना कुणी विचारत नाहीत. अनाथ बनलेले आणि नंतर अनाथ म्‍हणून मरून गेलेल्यांना फक्‍त पोलिस डायरीचा आधार बनतो. नंतर त्यांची ना चौकशी होते, ना तपास होतो आणि अनाथांचा श्वास थांबावा तसं सगळचं थांबतं.

कोल्‍हापुरात घडलेल्या अमानुष अत्‍याचाराच्या घटनेने सारा महाराष्ट्र हादरला. या घटनेची राज्य मानवी आयोग, महिला बालकल्‍याण केंद्राने गंभीर दखल घेत लहाण मुलांच्या शाषणाविरोधात आणि बाल हक्‍कांबाबत आवाज उठविला. या घटनेमुळे बाल हक्‍कांचा आणि त्‍यांच्या शोषणाचा प्रश्न जसा ऐरणीवर आला तसाच प्रश्न अनाथ मुलांच्या जगण्यावरही उपस्‍थित होतो. याप्रकरणामुळे बाल हक्‍काबाबतचा प्रश्न कधी मिटणार असा सवालही उपस्‍थित करण्यात आला.

बालकांना कधी बेदम मारहाण, बलात्‍कांचे लैंगिक शोषण, छेडछाड, अपहरण, अर्भकांना बेवारस सोडून देणं अशा घटना अनाथ मुलं आणि मुलींसोबत मोठ्या प्रमाणात घडत असल्यानेच भारतासारख्या तरुणांच्या राष्ट्रात ही बाब गंभीर बनली. एकीकडे बालकांना सर्वांगीण विकासाची समान संधी मिळावी म्‍हणून संयुक्त राष्ट्रसंघातर्फे १९८९ साली बालहक्क संहिता तयार करण्यात आली. त्याला नुकतेच २९ वर्षे पूर्ण झाली. तरी ना बालकांचे प्रश्न सुटले ना त्यांना त्यांचे हक्‍क मिळाले, ना त्‍यांचे शोषण थांबले.  

कोणत्याही देशाची मदार ही त्‍या त्या देशातील युवा वर्गावर असते. हा युवावर्गच जर अन्याय अत्‍याचाराचा बळी ठरत असेल तर देशाचे भवितव्‍य धोक्‍यात येण्यास वेळ लागणार नाही असं अनेक विचारवंताचे मत आहे. यासाठीच बालहक्‍कांच्या प्रश्नांकडे गांभीर्याने बघण्याची गरज बनली आहे. 

लहान मुलांचा वावर घर, शाळा, क्रिडांगण, मित्र मैत्रीणीबरोबर फिरायला जाणे, खासगी क्‍लास, सहल अशा ठिकाणी होत असतो. या  ठिकाणीच अनेक मुला-मुलींवर अन्याय अत्‍याचार मोठया प्रमाणात होत असले तरी कुटुंबातील सदस्‍यांकडून आणि जवळच्या नातेवाईकांकडूनही अत्‍याच्यार होत आहेत. मुलांनी याबाबत कुटुंबीयांना माहिती दिली तरी याकडे कुटुंबिय सोयीस्‍करपणे दुर्लक्ष करतात. लहान आहे म्‍हणून त्‍यांचे ऐकून घेतले जात नाही, आणि जेव्‍हा हा प्रकार वाढीस लागतो तेव्‍हा हिच हसणारी, खेळणारी मुलं एककल्‍ली बनतात, मानसिक रूग्ण तयार होतात. 

लहान मुलांच्या शोषणावर गांभिर्याने पाहणे गरजेचे आहे. यासाठी सरकारने तसेच समाजातील प्रत्‍येक घटकाने आपापल्‍या परीने प्रयत्‍न करणे गरजेचे आहे. लहान मुले ही आपल्‍या कामाला येत नाहीत, त्‍यांच्या  पालन-पोषणाची जबाबदारी मोठ्यांवर असते. ती समाजातील दुर्बल घटक आहेत. असा समज करून त्‍यांचे शोषण करण्यात येते. काहीवेळा कुटुंबातील व्यक्‍तीकडून किंवा जवळच्याच नातेवाईकांकडून शोषण करण्यात आल्‍याचे समोर येते. परंतु, लहान मुलांचे बोलणे एवढे गांभिर्याने घेतले जात नाही. त्‍यामुळे त्‍याने आपल्‍यावर झालेल्‍या आत्‍याचाराबाबत कोणाकडे तक्रार केली तरी त्‍याकडे जाणून बुजून दुर्लक्ष केले जाते. या प्रकाराकडे लक्ष न दिल्‍याने संबंधीत मुलांवर पुन्हा अन्याय सुरुच राहतो आणि उमलणारी कळी हळू हळू सुकून जाते. अशा घटनांना आळा घालायचा असेल, तर त्‍यांच्याकडे वेळीच लक्ष दिले पाहिजे. 

पालकांनी किंवा शिक्षकांनी मुलांना मारणे, स्त्रीभ्रूणहत्या, मुलीला जन्मानंतर नष्ट करणे, जातिभेद किंवा धर्मामुळे पोळली जाणारी मुला-मुलींची कुटुंबात व समाजात होणारी अवहेलना, बालविवाह, बलात्कार, छळ, अंधश्रध्देपोटी बळी देणे, अशा अनेक परिस्थितींचा, वस्तुस्थितींचा सामना आजच्या मुलामुलींना करायला लागत आहे, अशा घटनांमुळे कोवळ्या वयात आणि हसण्याखेळण्याच्या वयात या मुलांना नैराश्याने ग्रासले जाते. त्‍यामुळे भविष्‍यात संकटांचा सामना करताना ही मुले परिस्‍थितीशी दोन हात करू शकत नाहीत, परिणामी जीवनाच्या स्‍पर्धेत टीकू शकत नाहीत. 

काळ झपाट्याने बदलत आहे. बदलते नातेसंबंध, कौटुंबिक व्‍यवस्‍था, सामाजिक व्‍यवस्‍थेत अमुलाग्र बदल होत असताना बालकांच्या हक्‍कांविषयी, जाणीवांविषयी आपणच त्‍यांच्याबरोबर संवाद साधणं काळाची गरज आहे. शाळा, क्‍लास, खेळ, सहल अशा सगळ्याच ठिकाणी आपण पालक म्‍हणून त्यांच्या सोबत हजर नसतो. म्‍हणून त्यांना त्यांच्या हक्‍कांविषयी आणि त्यांच्या जाणीवांविषयी जाणीव करुन देण आपली जबाबदारी नाही तर आपले कर्तव्‍यच आहे. नाही तर येणारी ही पिढी कुणालाच माफ करू शकणार नाही.