Thu, Jun 27, 2019 18:19होमपेज › Kolhapur › अंगणवाडी कर्मचार्‍यांचा शासनाच्या विरोधात संताप

अंगणवाडी कर्मचार्‍यांचा शासनाच्या विरोधात संताप

Published On: Mar 11 2018 1:21AM | Last Updated: Mar 11 2018 12:43AMकोल्हापूर : प्रतिनिधी

निवृत्तीचे वय 65 वरून 60 करण्याच्या शासन निर्णयाविरोधात शनिवारी अंगणवाडी कर्मचार्‍यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढून शासनाविरोधात संताप व्यक्त केला. आक्रमक आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतले. शनिवारी सरकारी सुट्टी असताना निवासी उपजिल्हाधिकारी संजय शिंदे यांनी निवेदन स्वीकारले.

कोल्हापूर जिल्हा अंगणवाडी कर्मचारी युनियनचे कॉ. आप्पा पाटील, जयश्री पाटील, कॉ. रघुनाथ कांबळे यांच्या नेतृत्वाखाली अंगणवाडी सेविका व मदतनिसांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. मानधनवाढीसह अन्य प्रलंबित मागण्यांसंदर्भात शासनाकडून होत असलेल्या अन्यायाचा सेविका, मदतनिसांनी वैविध्यपूर्ण घोषणाद्वारे निषेध केला. रणरणत्या उन्हातच महिलांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या मारला. कर्मचारी महिला आक्रमक झाल्याने अखेर पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. यावेळी आंदोलक व पोलिस यांच्यात झटापटही झाल्याने वातावरण तापले होते. दरम्यान, युनियनच्या शिष्टमंडळाने उपजिल्हाधिकारी  संजय शिंदे यांची भेट घेऊन त्यांना मागण्यांचे निवेदन दिले. अंगणवाडी कर्मचार्‍यांना मानधनापेक्षा ठोस वेतन, बाह्य कामे, अंगणवाडी पटसंख्या आदींच्या बाबतीतही चिंता व्यक्त करून दर महिन्याच्या 5 तारखेपूर्वी मानधन मिळावे, अशी मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.