Tue, Feb 18, 2020 06:26होमपेज › Kolhapur › ‘अंनिस’चे 20 पासून ‘जवाब दो’ आंदोलन

‘अंनिस’चे 20 पासून ‘जवाब दो’ आंदोलन

Published On: Jul 01 2018 1:52AM | Last Updated: Jun 30 2018 11:43PMकोल्हापूर : प्रतिनिधी

‘अंनिस’चे संस्थापक अध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर व कॉ. गोविंद पानसरे यांच्या मारेकर्‍यांना शोधण्याची सरकारकडे राजकीय इच्छाशक्‍ती नाही. तपास यंत्रणाही निद्रिस्त असल्याने गुन्हेगार सापडत नाहीत. सरकारच्या विरोधात 20 जुलैपासून देशभर ‘जवाब दो’ आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्य कार्याध्यक्ष अविनाश पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली. 

पाटील म्हणाले, डॉ. दाभोलकर व कॉ. पानसरे यांच्या हत्येच्या तपासाबाबत उच्च न्यायालयाने दिरंगाईबाबत सरकारवर ताशेरे ओढले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना अनेकवेळा भेटून निवेदने दिली. त्यांनी भेटीवेळी बैठक घेण्याचे आश्‍वासन दिले. मात्र, त्यांच्याकडून संवेदनशील प्रश्‍न टाळला जात आहे. यासाठी लोकजनशक्‍ती उभारली जाणार आहे. दि. 20 जुलै ते 20 ऑगस्ट या कालावधीत ‘अंनिस’ व समविचारी पक्ष व संघटनांतर्फे देशभरात ‘जवाब दो’ आंदोलन केले जाणार आहे. 

ऑल इंडिया पीपल्स सायन्स फोरमच्या बैठकीतील निर्णयानुसार डॉ. दाभोलकर यांचा स्मृतिदिन राष्ट्रीय वैज्ञानिक द‍ृष्टिकोन दिन म्हणून देशभर साजरा केला जाणार आहे. दि. 20 ऑगस्ट ते 21 सप्टेंबरदरम्यान वैज्ञानिक द‍ृष्टिकोन संवाद प्रबोधन अभियान राबविले जाणार आहे. सामाजिक बहिष्कारविरोधी कायदा लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी 1 मे 2019 पर्यंत देशभर अभियान राबविले जाणार आहे. त्यानुसार दि. 1 जुलै रोजी सांगली येथे पश्‍चिम महाराष्ट्रातील पाच जिल्ह्यांतील प्रशिक्षकांचे प्रशिक्षण शिबिर घेण्यात येणार आहे. पावसाळी अधिवेशनादरम्यान शासनाने व्यसनमुक्‍त धोरणाची अंमलबजावणी करावी, यासाठी व्यसनमुक्‍त महाराष्ट्र समन्वय मंचतर्फे नागपूर येथे दि. 9 जुलै रोजी सत्याग्रह धरणे आंदोलन करण्यात येणार असल्याचे पाटील यांनी सांगितले.