Mon, Apr 22, 2019 12:10होमपेज › Kolhapur › ‘अमृत’साठी इचलकरंजीकरांचा महामोर्चा

‘अमृत’साठी इचलकरंजीकरांचा महामोर्चा

Published On: May 15 2018 1:36AM | Last Updated: May 15 2018 1:12AMइचलकरंजी : वार्ताहर

वारणा योजनेतून इचलकरंजीला पाणी  आणायचेच, या निर्धाराने सोमवारी तमाम इचलकरंजीकरांनी सर्व व्यवहार बंद ठेवत सोमवारचा बंद शंभर टक्के यशस्वी केला. त्यामुळे वस्त्रनगरीतील व्यवहार, दैनंदिन जीवन ठप्प झाले. कोणत्याही परिस्थितीत वारणा नदीतून अमृत योजना झाली पाहिजे, असा निर्धार करत इचलकरंजीकर प्रांत कार्यालयावरील मोर्चासाठी हजारोंच्या संख्येने रस्त्यावर उतरले. त्यामध्ये महिलांचा सहभाग लक्षणीय व उत्स्फूर्त होता. रणरणत्या उन्हात मोर्चेकर्‍यांनी प्रांत कार्यालयासमोर एक तास ठिय्या आंदोलन करीत पाणीप्रश्‍नी इचलकरंजीकरांच्या भावना तीव्र असल्याची प्रचिती दिली.

इचलकरंजी शहराला शुद्ध व मुबलक पाणी मिळावे, यासाठी शासनाने वारणा नळपाणी योजनेला मंजुरी दिली आहे. मात्र, या योजनेला वारणाकाठच्या नागरिकांनी तीव्र विरोध दर्शवत योजनेचे काम रोखले आहे. वारणा योजना मार्गी लागण्यासाठी शासन स्तरावर विविध बैठका झाल्या. मात्र, विरोधामुळे वारणेचा प्रश्‍न प्रलंबित आहे. विरोधाला प्रत्युत्तर देण्यासाठी इचलकरंजीत सर्वपक्षीयांच्या वतीने आंदोलनाचा इशारा देण्यात आला होता. त्यानुसार सोमवारी सर्वपक्षीय बंद पुकारण्याबरोबरच प्रांत कार्यालयावर महामोर्चा काढण्याचे जाहीर करण्यात आले होते.

सकाळपासूनच शहरातील सर्व व्यवहार, उद्योग कडकडीत बंद ठेवण्यात आले. कॉ. मलाबादे चौक, महात्मा गांधी पुतळा चौक, मध्यवर्ती बसस्थानक, राजर्षी शाहू पुतळा, डेक्‍कन चौक आदींसह प्रमुख चौकांसह बाजारपेठेत शुकशुकाट होता. रिक्षा, एस. टी., टांगा आदी वाहतूक व्यवस्थाही बंद ठेवण्यात आली होती. नगरपालिकेतही अघोषित बंदच होता. मोर्चाच्या अनुषंगाने प्रभागा-प्रभागांतून नागरिक, महिला मोठ्या संख्येने गटागटाने छत्रपती शिवाजी महाराज पुतळा चौकात जमू लागले. सकाळी 11.30 वाजता छ. शिवाजी पुतळा चौकातून भव्य मोर्चाला प्रारंभ झाला. मोर्चाच्या अग्रभागी महिला होत्या. ‘वारणेचे पाणी आमच्या हक्‍काचे, नाही कुणाच्या बापाचे’, ‘वारणेचे पाणी मिळालेच पाहिजे’, यासह वारणा योजनेच्या समर्थनार्थ प्रचंड घोषणा देत मोर्चा मार्गस्थ झाला.

प्रांत कार्यालय चौकातच मोर्चाचे रूपांतर सभेत झाले. सभेच्या प्रारंभी आ. सुरेश हाळवणकर यांनी, दूषित पाणी पिल्यामुळे बळी पडलेल्या 40 नागरिकांना श्रद्धांजली वाहणारा ठराव मांडला. सर्वच नागरिकांनी एक मिनिट स्तब्धता पाळत श्रद्धांजली वाहिली. रणरणत्या उन्हातही सभेला नागरिकांसह महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. त्यामुळे नेत्यांनीही व्यासपीठावर न येता जनतेतच राहणे पसंत केले. 
हक्‍काचे पाणी : नगराध्यक्षा

नगराध्यक्षा सौ. अलका स्वामी यांनी यावेळी, वारणेचे पाणी शासनाने मंजूर केले आहे. ते आमच्या हक्‍काचे पाणी असून ते मिळवण्यासाठी इचलकरंजीकरांनी एकजूट दाखवली आहे. त्याचाच प्रत्यय आजच्या भव्य मोर्चाच्या रूपाने दिसून आला आहे. वारणा योजनेला गैरसमजुतीतून काहींनी विरोध दर्शवला आहे. मात्र, या विरोधाला काहीच अर्थ नाही. गत वर्षभरात ही योजना मार्गी लागेल, यासाठी आम्ही संयम बाळगला. मात्र, वारणेचे पाणी आणल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही.

पिक्‍चर अभी बाकी है..

हक्‍काच्या पाण्यासाठी शहरवासीयांनी आज केलेले आंदोलन हा एक ट्रेलरच आहे. पाण्यासाठी विरोध करून राजकारण करणार्‍यांना हा एक इशारा असून, ‘पिक्‍चर तो अभी बाकी है..’ असा गर्भित इशारा आ. हाळवणकर यांनी दिला. पाण्यासाठी विरोध करणार्‍यांना शाप लागेल व त्यांचा समूळ नायनाट होईल. प्रत्येक शहरवासीयाने घरटी एक माणूस जाऊन भूमिपूजन करायचे ठरवले तर काय होईल, हे आजच्या आंदोलनामुळे विरोध करणार्‍यांना समजून जाईल. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत वारणेचे पाणी आणणारच, असा निर्धार आ. हाळवणकर यांनी केला. 

राजकारण नको ः आवाडे
माजी मंत्री प्रकाश आवाडे म्हणाले, सर्वांनी एकजूट दाखवल्यास वारणेचे पाणी मिळण्यास कोणतीही अडचण उद्भवणार नाही. हक्‍काचे पाणी मिळवण्यासाठी सुरू असलेल्या या प्रयत्नात राजकारण आणू नये. वारणेचे पाणी आणण्याच्या कामात आमचे कोणतेच मतभेद नाहीत. हे पाणी जनतेनेच आणले, असा विचार करून वारणेचे पाणी आणण्यासाठी सर्वांनी पाठिंबा द्यावा. 

खासदारांच्या अनुपस्थितीवरून संतप्‍त प्रतिक्रिया
खा. राजू शेट्टी आंदोलनाला उपस्थित नसल्याचा सभेच्या ठिकाणी काही नागरिकांनी मुद्दा उपस्थित केला. त्यावर कार्यकर्त्यांनी खा. शेट्टी यांची बाजू मांडत शेट्टी यांचा वारणा योजनेला विरोध नसून, सामंजस्यातून हा प्रश्‍न सुटावा, यासाठी ते प्रयत्नशील असल्याचे सांगितले.

वस्त्रोद्योग महासंघाचे अध्यक्ष अशोक स्वामी, मदन कारंडे, पाणीपुरवठा सभापती नितीन जांभळे, कॉ. दत्ता माने, अजित जाधव, श्रीनिवास कांबळे यांनीही मनोगत व्यक्‍त करीत पाणी मिळवण्याचा निर्धार केला.

प्रांताधिकार्‍यांनी निवेदन घेण्यासाठी आंदोलनस्थळी यावे, यासाठी आवाहन करण्यात आले. त्यानुसार प्रांताधिकारी समीर शिंगटे यांनी प्रांत कार्यालय चौकात येऊन निवेदन स्वीकारले. मोर्चात माजी आमदार अशोक जांभळे, प्रताप होगाडे, उपनगराध्यक्षा सौ. सरिता आवळे, तानाजी पोवार, सागर चाळके, महादेव गौड, प्रकाश मोरे, जि. प. सदस्य राहुल आवाडे, रवींद्र माने, अजय जावळे, संतोष शेळके आदींसह नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.