Sat, Nov 17, 2018 14:14होमपेज › Kolhapur › ‘अमृत’ योजनेला विरोधाचे ग्रहण

‘अमृत’ योजनेला विरोधाचे ग्रहण

Published On: Jun 04 2018 1:04AM | Last Updated: Jun 03 2018 10:20PMइचलकरंजी : प्रतिनिधी 

केंद्र सरकारने मंजूर केलेल्या ‘अमृत’ योजनेला दानोळीकरांनी टोकाचा विरोध दर्शवल्यानंतर योजनेचा उद्भव बदलण्याचा निर्णय झाला. हरिपूर-कोथळीदरम्यान उद्भवाला मुंबईतील बैठकीत ‘ग्रीन सिग्नल’ देण्यात आला. त्यानुसार महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे अधिकारी सर्व्हेसाठी गेले असता कोथळीकरांनीही त्यांना विरोध केला. त्यामुळे इचलकरंजीच्या ‘अमृत’ योजनेला लागलेले विरोधाचे ग्रहण अद्यापही कायम आहे.

‘अमृत’ योजनेला विरोध करण्यासाठी कृष्णा बचाव समितीची स्थापना करण्यात आली आहे. त्यामुळे इचलकरंजीची वारणा कृती समिती विरुद्ध कृष्णा बचाव समिती असा नवीन संघर्ष उदयास येण्याची शक्यता आहे. दरम्यान, वारणाकाठावरून योजनेला विरोध वाढत चालल्याने इचलकरंजी नगरपालिकेने सुरुवातीला निश्‍चित केलेल्या काळम्मावाडीच्या योजनेचाच पाठपुरावा करण्याची गरज निर्माण झाली आहे. 

दानोळीचा उद्भव बदलल्यानंतर ‘अमृत’ योजना पूर्णत्वास नेण्यासाठी वारणा बचाव समिती सर्वतोपरी सहकार्य करेल, अशी ग्वाही सर्वच नेत्यांनी दिली होती. त्यामुळे हा उद्भव बदलण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला होता. मात्र, आता कोथळीकरांनी या योजनेला विरोध दर्शवला आहे. त्यामुळे वारणा बचाव समिती, वारणाकाठचे लोकप्रतिनिधी आता कोणती भूमिका घेणार, याकडे लक्ष लागले आहे. दानोळीच्या विरोधानंतर उद्भव बदलल्यानंतर कोथळीकरांनी केलेल्या विरोधाबाबत शासन कोणता निर्णय घेणार, यावर आता योजनेचे भवितव्य अवलंबून आहे.