Sat, Apr 20, 2019 10:28होमपेज › Kolhapur › पंढरपूरप्रमाणे अंबाबाई मंदिरासाठी कायदा करावाः पाटणकर 

पंढरपूरप्रमाणे अंबाबाई मंदिरासाठी कायदा करावाः पाटणकर 

Published On: Jan 21 2018 6:12PM | Last Updated: Jan 21 2018 6:17PMकोल्हापूरः प्रतिनिधी

पंढरपूर येथील विठ्ठल मंदिरास सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार ज्याप्रमाणे कायदा झाला आहे. त्या धर्तीवर अंबाबाई मंदिरासाठी कायदा करावा, त्याबाबतचा निर्णय येत्या मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय घ्यावा. तत्पूर्वी, यासंदर्भात अध्यादेश काढावा, अशी मागणी डॉ. भारत पाटणकर यांनी केली. पुण्यात राज्यव्यापी बैठक घेऊन आंदोलनासंदर्भात निर्णय घेण्यात येणार असल्याचे यावेळी जाहीर करण्यात आले.

आद्यगणमाता अंबाबाई मुक्‍ती आंदोलनतर्फे येथील शेतकरी कामगार पक्षाच्या कार्यालयात ही बैठक झाली. या बैठकीत अंबाबाई मंदिरात विनाअट सर्वांना प्रवेश खुला करावा, अशी मागणी करण्यात आली. डॉ. पाटणकर म्हणाले, मी देव मानतो. बहुजनांची प्रतीके माझी दैवते आहेत. म्हसोबा, खंडोबा, जोतिबा अंबाबाई या देवतांना मी मानतो; मात्र माझ्यावर नास्तिकतेचा आरोप होत आहे. हा खरा तर बहुजनांचा अवमान आहे. 

डॉ. पाटणकर म्हणाले, जनतेच्या मदतीने शांततेने आंदोलन करणार आहोत. आमच्यावर होत असलेल्या आरोपांमुळे कार्यकर्त्यांत असंतोष निर्माण होत आहे. याचा विचार करून पोलिसांनी संबंधितांना नोटीस देऊन समज द्यावी. डॉ. सुभाष देसाई म्हणाले, देशाच्या अर्थव्यवस्थेच्या अनेकपट मंदिरांतील उत्पन्‍न आहे. या पैशाचा उपयोग शेतकर्‍यांचे हित आणि शिक्षणासाठी झाला पाहिजे. त्यामुळे मंदिरांतील पुजार्‍यांमध्ये आर्थिक आणि धार्मिक उन्माद वाढला आहे. नवनाथ शिंदे म्हणाले, देशातील मंदिरांमध्ये जमा होणार्‍या लाखो कोटी रुपयांचा विनियोग समाजासाठी करावा. सौरभ खेडेकर, दिनकर पाटील, सौ. छाया पोवार, डॉ. टी. एस. पाटील सौ. जयश्री चव्हाण यांनीही भावना व्यक्‍त केल्या. 

संपत देसाई यांनी प्रास्ताविक करून आंदोलनाची पार्श्‍वभूमीवर विशद केली. टी. एल. पाटील यांनी आभार मानले.  गेल ऑम्वेट, अ‍ॅड. कृष्णात पाटील, मनीषा देसाई, सुवर्णलता गोविलकर, चारुशीला पाटील,  डी. के. बोडके, नरेंद्र पाटील आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते. शेकाप कार्यालय बनले  पोलिस छावणी या बैठकीस परवानगी देऊ नये, अशी मागणी बजरंग दलाने केली होती. या पार्श्‍वभूमीवर शेतकरी कामगार कार्यालय परिसरात मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. पोलिस व्हॅनसह मोठा फौजफाटा असल्याने या शेकाप कार्यालयास पोलिस छावणीचे स्वरूप प्राप्‍त झाले होते.