Sun, Mar 24, 2019 23:09
    ब्रेकिंग    होमपेज › Kolhapur › अंबाबाई मंदिरात पगारी पुजारी पदासाठी मुलाखती सुरू

अंबाबाई मंदिरात पगारी पुजारी पदासाठी मुलाखती सुरू

Published On: Jun 19 2018 11:49AM | Last Updated: Jun 19 2018 1:26PMकोल्हापूर : प्रतिनिधी

 पश्‍चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या वतीने अंबाबाई मंदिरात तात्पुरत्या कालावधीसाठी पगारी पुजारी नेमण्यासाठीच्या  मुलाखत प्रक्रियेला मंगळवारपासून प्रारंभ झाला. शिवाजी विद्यापीठाच्या नॅनो सायन्स टेक्नॉलॉजी विभागात पोलिस बंदोबस्तात या मुलाखतीची प्रक्रिया सुरू होती. पहिल्या दिवशी 40 पैकी 36 उमेदवारांच्या मुलाखती झाल्या. 4 उमेदवार गैरहजर होते. 

पगारी पुजारी नेमण्याचे अधिकार नेमके देवस्थान समितीला आहेत की नाहीत, हा वाद सुरू असतानाच तात्पुरत्या काळासाठी पगारी पुजारी नेमण्याची प्रक्रिया सकाळी 10 वाजल्यापासून सुरू झाली. देवस्थान समितीने यासाठी समिती तयार करण्यात आली आहे. यामध्ये धर्म अभ्यासक तसेच समिती सदस्यांची नियुक्‍ती करण्यात आली आहे.  11 प्रमुख पुजारी, 35 सहायक पुजारी अशा एकूण 55 पुजारी व सेवेकरांसाठी मुलाखत प्रक्रियेला प्रारंभ झाला. या समितीत  धार्मिक अभ्यासक  गणेश नेर्लेकर, संस्कृत  भाषातज्ज्ञ प्रा. शिवदास जाधव, देवस्थान समिती सचिव विजय पोवार, सदस्य शिवाजीराव जाधव, संगीता खाडे व शंकराचार्य पिठाचे प्रतिनिधी यांचा समावेश होता.  

अर्जदारांना एकूण शिक्षण,  वैदिक शास्त्राचे शिक्षण, अंबाबाई देवीची माहिती, तसेच मंदिरातील अन्य देवदेवता,  मंदिर स्थापनेबाबतची माहिती विचारण्यात आली. देवीचे रोजचे धार्मिक विधी, वैदिक सोपस्कार, मंदिरातील वातावरण, कुंकुमार्चन विधींच्या संदर्भात तोंडी प्रश्‍न विचारण्यात आले. प्रत्येक उमेदवाराला देवीला साडी नेसवणे व आलंकारिक पूजा बांधायला येते की नाही, हे समजण्यासाठी  मुलाखतीच्या ठिकाणी उत्सवमूर्ती आणली होती. पगारी पुजारी म्हणून तात्पुरत्या काळासाठी जरी मुलाखती असल्या, तरी प्रत्येक नियमांचे काटेकोर पालन केले जात होते. प्राप्‍त अर्जांतील उमेदवारांना  दिलेल्या टोकनप्रमाणे मुलाखतीला बोलवले जात होते.

पुजारी नेमण्यावरून सध्या सुरू असलेल्या आरोप-प्रत्यारोपांच्या पार्श्‍वभूमीवर मुलाखतीच्या  ठिकाणी कडक पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. मुलाखतीला येणार्‍या उमेदवारांचे ओळखपत्र पाहूनच त्यांना मुख्य मुलाखतीच्या कक्षात प्रवेश  दिला जात होता. प्रत्येक  उमेदवाराची तोंडी मुलाखत घेण्यासाठी 20 ते 25 मिनिटांचा अवधी लागत होता. अजून दोन दिवस ही मुलाखत प्रक्रिया सुरू राहणार आहे.