Sun, Mar 24, 2019 06:24होमपेज › Kolhapur › पुजार्‍यांच्या नेमणुका तात्पुरत्या काळासाठी : जाधव

पुजार्‍यांच्या नेमणुका तात्पुरत्या काळासाठी : जाधव

Published On: Jun 19 2018 1:32AM | Last Updated: Jun 19 2018 12:57AMकोल्हापूर : प्रतिनिधी

पश्‍चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या वतीने तात्पुरत्या  काळासाठी पुजार्‍यांच्या नेमणुका केल्या जाणार आहेत. विधी व न्याय विभागांच्या सचिवांशी चर्चा करूनच हा निर्णय घेण्यात आला आहे, असे पश्‍चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. 

यावेळी ते म्हणाले,  पगारी पुजारी नेमण्याचे हक्‍क देवस्थान समितीला नाहीत, असे काही संघटनांचे मत आहे. पगारी पुजारी कायद्याबाबात चर्चेसाठी शासनाकडे तीन वेगवेगळ्या बैठका आयोजित करून  या विषयावर चर्चा झाली. त्याअर्थी या देवस्थानकडे पुजारी नेमण्याची प्रक्रिया अधिकृतपणे देण्यात आली आहे. पगारी पुजार्‍यांच्या नियुक्त्या देवस्थान समितीच करेल. भाविकांच्या धार्मिक भावना, श्रद्धा यास कोणतीही बाधा न येता ही प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी देवस्थान समिती प्रयत्नशील आहे. श्री करवीर निवासिनी महालक्ष्मी (अंबाबाई) विश्‍वस्त व्यवस्था अधिनियम 2018 हा कायदा दि.12 एप्रिल रोजी प्रसिद्ध झाला आहे. या कायद्यातील कलम 2 नुसार राज्य शासन ज्या दिनांकापासून कायदा  नियत करील त्या दिवसापासून हा कायदा अमंलात येईल. कायद्यातील कलम 3 नुसार सर्व अधिकार देवस्थान व्यवस्थापन समितीस राहतील हे स्पष्ट करण्यात आले आहे.  

 देवस्थान समितीने विधी व न्याय विभागाच्या सचिवांशी केलेल्या चर्चेनंतर पगारी पुजारी नेण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. यासाठी 133 अर्ज प्राप्‍त झाले आहेत. यात सहा महिलांचा समावेश आहे. तज्ज्ञ समितीची नियुक्‍ती करूनच पगारी पुजारी मुलाखत प्रक्रिया पार पाडली जाणार आहे. ही भरती प्रक्रिया तात्पुरत्या स्वरूपाची आहे. भविष्यात नियमित पगारी पुजारी नेमण्याबाबत शासन आदेश झाल्यानंतर रितसर त्याची जाहीरात प्रसिद्ध करून आकृतीबंधाप्रमाणे पुजारी नेमण्यात येतील. 

तसेच ज्यांनी देवस्थान समितीच्या जमिनीचा गैरवापर केला आहे. ज्यांनी जमिनीचा वर्षांनुवर्षे खंड भरलेला नाही, त्यांची नावे एक महिन्यात जाहीर केली जातील असेही जाधव यांनी सांगितले. 
यावेळी बी. एन. पाटील-मुंगळीकर, सचिव विजय पोवार, संगीता खाडे आदी उपस्थित होते.