Mon, May 20, 2019 10:06



होमपेज › Kolhapur › अंबाबाई पुजारी हटाव हा महाराष्ट्राच्या पुरोगामी विचारांचा विजय : डॉ.सुभाष देसाई

अंबाबाई पुजारी हटाव हा महाराष्ट्राच्या पुरोगामी विचारांचा विजय : डॉ.सुभाष देसाई

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा





गारगोटी : प्रतिनिधी

छत्रपती शाहू महाराज, म. फुले, डॉ. आंबेडकर यांच्या पुरोगामी विचारांचा आदर करणाऱ्या आणि कृतीत उतरविणार्‍या आम जनतेच्या रेट्यामुळे अंबाबाई मंदिर व्यवस्थापनाचा कायदा विधानसभेत पारित झाला आहे. त्याचे लवकरच कायद्यात रूपांतर होईल आणि पंढरपूरच्या विठ्ठल मंदिराप्रमाणे करवीर निवासिनी अंबाबाई मंदिरातील पुजारी हटवले जातील असा विश्वास अंबाबाई पुजारी हटाव आंदोलनाचे प्रमुख कार्यकर्ते जेष्ठ विचारवंत डॉ. सुभाष के. देसाई यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केले. 

करवीरच्या इतिहासातील हे ऐतिहासिक यशस्वी आंदोलन आहे. यात आम जनता, कोल्हापूर महापालिका, जिल्हा परिषद, आमदार राजेश क्षीरसागर, आमदार प्रकाश आबिटकर, आमदार बच्चू कडू, पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचे अभिनंदन डॉ. देसाईंनी केले.

या विधेयकानुसार देवस्थान कमिटीच्या देणगी पेटीतील ५२ कोटी रुपये पुजार्‍यांनी कोर्टात अडकून ठेवलेत ते सरकार जमा होतीलच. मंदिराच्या स्त्रोताकडून जे बेहिशेबी पैसे पुजार्‍यांनी पतसंस्था व त्यांच्या बँकेत ठेवी, शेअर्समध्ये गुंतवलेत ते तपशीलासह शासन जमा झाले पाहिजेत. अंबाबाई मंदिराच्या जमिनी स्थावर जंगम मालमत्ता कायदा पास झाल्यावर ३० दिवसात जमा कराव्या लागतील.

त्याचप्रमाणे बहुजन समाजातील गुरव, भट या समाजातील आणि छत्रपती शाहू महाराजांच्या वैदिक स्कूलमधील पुजारी नियुक्त करावे तसेच स्त्री देवता असल्याने महिला पुजारी नेमावेत असा आग्रह आहे. यापुढे अंबाबाईप्रमाणे महाराष्ट्रातील सर्वच गणमाता पुरोहितमुक्त करून ही धार्मिक स्वातंत्र्याची चळवळ चालूच राहील असेही डॉ. सुभाष के. देसाई यांनी सांगितले. यावेळी विश्व शाहीर परिषदेचे राज्याचे अध्यक्ष डॉ. राजीव चव्हाण उपस्थित होते.

दैनिक पुढारी नेहमीच सामाजिक परिवर्तनाच्या लढाईत अग्रेसर

दैनिक पुढारी नेहमीच सामाजिक परिवर्तनाच्या लढाईत अग्रेसर राहिला आहे. डॉ. जाधव कुटुंबबियांच्या तिन पिढ्यांचे  यात योगदान आहे. पद्मश्री डॉ. ग. गो. जाधव यांनी नाशिकच्या काळाराम मंदिरात दलितांना प्रवेश करुन दिला तर पद्मश्री डॉ. प्रतापसिंह जाधव यांनी १९५४ साली पाच दाम्पत्यांला घेऊन अंबाबाई मंदिरात पूजा केली असल्याचे डॉ. देसाई यांनी सांगितले.






  •