Tue, Jul 16, 2019 22:42होमपेज › Kolhapur › आंब्याजवळ अपघातात ६ ठार

आंब्याजवळ अपघातात ६ ठार

Published On: Jan 28 2018 1:34AM | Last Updated: Jan 28 2018 1:21AMआंबा/मलकापूर : वार्ताहर

कोल्हापूर - रत्नागिरी महामार्गावरील आंबा गावानजीक  तळवडे गावाच्या हद्दीतील अपघाती वळणावर गाडी आंब्याच्या झाडावर धडकून झालेल्या भीषण अपघातात पुणे येथील राऊत व शेळकंदे कुटुंबातील सहा जण ठार, तर दोघे जण जखमी झाले. या घटनेची नोंद शाहूवाडी पोलिसात झाली आहे. मृतांत एक महिला, तीन पुरुष, दोन मुलगे अशा सहा जणांचा समावेश आहे.

घटनास्थळी  व पोलिसातून मिळालेली माहिती अशी की, यार्डी सॉफ्टवेअर सोशल वर्क कंपनी, सेनापती बापट, पुणे येथे कामाला असणारे राऊत व शेळकंदे कुटुंबीय सलग तीन दिवस सुट्टी असल्याने आपल्या मित्राच्या पुन्टो गाडी (एम एच 11, ए डब्ल्यू-6600) मधून पुणे येथून पहाटे गणपतीपुळेस देवदर्शनासाठी निघाले होते. सकाळी 10.30 वाजता ते आंब्यापासून काही अंतरावर असणार्‍या तळवडे गावात ते आले. तेथील अपघाती वळणावरील आंब्याच्या झाडावर गाडी जोरात धडकली, यावेळी गाडीच्या दर्शनी भागाचा चक्‍काचूर झाला. गाडीतील संतोष त्रिंबक राऊत (वय 37) त्यांची पत्नी स्नेहल ऊर्फ अपर्णा (32), मुलगा स्वानंद (5, सर्व जण रा. शेवाळवाडी, हडपसर, पुणे), दीपक बुधाजी शेळकंदे (40), मुलगा वरुण दीपक शेळकंदे (3, रा. 84/1/2 साई पार्क लक्ष्मी सुपर मार्केटसमोर दिघी, पुणे) व चालक प्रशांत सदाशिव पाटणकर (40 रा. भागीरथी हौस पिंपळेगुरव, पुणे) हे सहा जण ठार झाले. तर वरुणा दीपक शेळकंदे (40) व यज्ञा दीपक शेळकंदे (3 वर्षे) ह्या दोघेही गंभीर जखमी झाल्या आहेत. जखमींवर मलकापूर ग्रामीण रुग्णालयात उपचार करून पुढील उपचारासाठी कोल्हापुरातील शासकीय इस्पितळात दाखल केले आहे.

संतोष राऊत, स्नेहल राऊत व दीपक शेळकंदे हे तिघे जण जागीच ठार झाले. जखमी स्वानंद राऊत व वरुण शेळकंदे यांना मलकापूर ग्रामीण  रुग्णालयात उपचारास आणण्यापूर्वीच त्यांचा वाटेतच मृत्यू झाला, तर चालक प्रशांत पाटणकर यांचा कोल्हापुरातील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू असताना मृत्यू झाला. गंभीर जखमी यज्ञा शेळकंदे हिची तब्येत गंभीर आहे, तर शेळकंदे यांच्या पायाला मोठी दुखापत झाली आहे.

दरम्यान, घटनास्थळी जिल्हा पोलिसप्रमुख संजय मोहिते, शाहूवाडी-पन्हाळ्याचे पोलिस अधीक्षक आर. आर. पाटील, पो. नि. अनिल गाडे यांनी भेट दिली.गाडी झाडावर धडकल्याने सुमारे 10 फूट उलट दिशेला फिरली होती, गाडीचा वेग 115 वर लॉक झाला होता.

गाडीच्या दर्शनी बाजूची हेडलाईट सुमारे 150 फूट पडली. तर दर्शनी पूर्ण बाजूचा चक्‍काचूर झाला. गाडीत रक्‍तांचे थारोळे साचले होते. अपघातग्रस्तांना आंबा येथील उपघातग्रस्त पथकाचे कृष्णा दळवी, राजेंद्र लाड, पो. पा. गणेश शेलार, दत्तात्रय गोमाडे, लक्ष्मण घावरे, मारुती पाटील, महेंद्र वायकूळ, दत्तात्रय पाटील, नीलेश कामेरकर, शंकर डाकरे यांनी अपघातग्रस्त जखमींना रुग्णालयात पोहोचवणे, वाहतूक व्यवस्था करण्याचे काम केले.

घटनास्थळी पो. नि. अनिल गाडे, फौ. प्रशांत यम्मेवार, रामचंद्र दांगट, भरत मोळके, धनाजी सराटे, विश्‍वास चिले, एफ. आय. पिरजादे, संजय जानकर आदींनी तातडीने भेट देऊन अपघातग्रस्तांना मदत केली.

मृत संतोष राऊत, दीपक शेळकंदे व प्रशांत पाटणकर एकाच कंपनीत कामाला होते.राऊत कुटुंबीयातील गाडीतील आई-वडील व मुलगा ठार, तर शेळकंदे कुटुंबीयातील पती, मुलगा ठार व पत्नी, मुलगी जखमी झाले.

अपघाताची शंभरी
तळवडे परिसरातील 500 मीटरवर असणार्‍या वळणावर असणारी झाडे ही गेल्या अनेक वर्षांपासून वाहन चालकांचा जीव घेणारी ठरत आहेत. या झाडाच्या खोडाला सालीच येत नाहीत. अपघाताची शंभरी पार झाली आहे.