होमपेज › Kolhapur › आंदोलन करायचे तर दिल्‍लीत करा : चंद्रकांत पाटील

आंदोलन करायचे तर दिल्‍लीत करा : चंद्रकांत पाटील

Published On: May 18 2018 1:21AM | Last Updated: May 18 2018 9:30AMकोल्हापूर : प्रतिनिधी

पर्यायी पुलाबाबत सुरू असलेल्या आंदोलनाचा शेवट काय, असा सवाल करत अभ्यास न करता होणार्‍या आंदोलनाने ‘डिस्टर्बन्स्’ वाढत असल्याची टीका पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केली. आंदोलन करायचे तर दिल्लीत करा, असा सल्लाही त्यांनी कृती समितीला दिला.

पर्यायी पुलाच्या बांधकामाचा प्रश्‍न चिघळत चालला आहे. या पार्श्‍वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालयात पत्रकारांशी बोलताना पालकमंत्री पाटील म्हणाले, आंदोलनाचे स्वातंत्र्य सर्वांनाच आहे; पण या आंदोलनाचा शेवट काय? त्याचे उत्तर येथे मिळणार आहे का?

पुरातत्त्व खात्याने परवानगी दिलेली नाही. यामुळे काम रखडले आहे. या पुरातत्त्व खात्याच्या दिल्लीत कार्यालयासमोर आंदोलन करावे, त्यासाठी आपण मदत करू, विमानाचे तिकीट काढू, राहण्याची व्यवस्था करू, मंडप घालून देऊ; पण येथे आंदोलन करून बांधकाम विभाग अधिकार्‍यांना, 

जिल्हाधिकार्‍यांना त्रास देण्यात काय अर्थ आहे. पुरातत्त्व खात्याची परवानगी नसताना या पुलाचे बांधकाम झाले, तर पाच वर्षे सक्तमजुरीची शिक्षा आहे, यामुळे कोणता अधिकारी हे काम अंगावर घेईल, असा सवालही त्यांनी केला.

सावित्री पुलाच्या दुर्घटनेनंतर राज्यातील सर्वच पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्यात आले आहे. पुलावर सेन्सर बसवण्यात आले आहेत. निश्‍चित केलेली पाणीपातळी ओलांडली की, सुमारे 50 संबंधित लोकांना त्याबाबतचा मोबाईलवर संदेश जाईल, अशी व्यवस्था करण्यात आली आहे. यासह पावसाळ्याचा पार्श्‍वभूमीवर पुलाच्या तपासणीचे कामही सुरू करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.

वाचा :

शिवाजी पूल २२ ला बंद करणार