Thu, Jun 27, 2019 16:00होमपेज › Kolhapur › मोबाईल ‘स्विच ऑफ’ केल्यास भत्ता कट

मोबाईल ‘स्विच ऑफ’ केल्यास भत्ता कट

Published On: Feb 09 2018 2:00AM | Last Updated: Feb 09 2018 12:07AMकागल : बा. ल. वंदूरकर

अपघात, आपत्कालीन तसेच महत्त्वाच्या वेळी तातडीने मदत मिळावी यासाठी एस.टी. महामंडळाच्या अधिकार्‍यांना यापुढे आपला मोबाईल 24 तास सुरू ठेवावा लागणार आहे. चुकून जरी मोबाईल ‘स्विच ऑफ’ झाला तर महामंडळाकडून संबंधित अधिकार्‍यांवर कारवाईचा बडगा उगारला जाणार आहे. अधिकार्‍याचा त्या महिन्याचा संपर्क भत्ता रद्द होणार आहे. या निर्णयाचे आता इतर शासकीय आणि निमशासकीय कार्यालये अनुकरण करण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

एस.टी महामंडळाच्या महाव्यवस्थापकांनी याबाबतचे आदेश राज्यातील सर्व विभाग नियंत्रकांना दिले आहेत. महामंडळाचे विभाग नियंत्रक, विभागीय वाहतूक अधिकारी, आगार व्यवस्थापक व विभागातील इतर अधिकारी त्यांचा मोबाईल बंद करून ठेवतात, परिणामी अपघात, आपत्कालीन परिस्थिती व महत्त्वाच्या कामांच्या वेळी संबंधित अधिकार्‍यांशी संपर्क ठेवणे कठीण होते. निर्णय घेणे अडचणीचे ठरते, अनेकदा निर्णय घेताच येत नाही. मोबाईल बंद करून ठेवू नयेत, सुरूच ठेवावेत, अशा प्रकारच्या सूचना यापूर्वीही देण्यात आल्या आहेत. मात्र, त्याची फारशी दखल घेण्यात आली नाही. सूचना गांभीर्याने घेण्यात आली नाही. त्यामुळे महामंडळाला पुनश्‍च सूचना द्यावी लागली आहे.

 प्रवाशी वाहतूक करताना काही तांत्रिक कारणामुळे   एस.टी.ला  वाईट प्रसंगाना सामोरे जावे लागते. अशा आपत्कालीन घटनांच्या वेळी तिथे तातडीने मदत मिळण्याच्या दृष्टीने एस.टी.चे अधिकारी तत्काळ पोहोचणे गरजेचे असते. मात्र, अनेकदा अशावेळी काही अधिकारी मोबाईल बंद करून ठेवतात. याबाबतच्या वाढत्या तक्रारीची दखल घेऊन अशा प्रकारच्या कडक सूचना देण्यात आल्या आहेत. अशा वेळी मोबाईल बंद असल्याचे निदर्शनास आल्यास संबंधित अधिकार्‍यांना त्या महिन्याचा संपर्क भत्ता देण्यात येणार नाही, असे आदेशात स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे. दरम्यान, महसूल, कृषी, सार्वजनिक बांधकाम, पाटबंधारे, विद्युत वितरण, नगरपालिका, आरोग्य तसेच इतर महत्त्वाच्या कार्यालयातील अधिकारी यांचे मोबाईलही अशाच पद्धतीने सुरूच ठेवावे, अशी मागणी होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.