होमपेज › Kolhapur › मराठा आरक्षण पाठिंब्यासाठी लोटला जनसागर

मराठा आरक्षण पाठिंब्यासाठी लोटला जनसागर

Published On: Jul 30 2018 1:29AM | Last Updated: Jul 30 2018 12:19AMकोल्हापूर : प्रतिनिधी 

मराठा आरक्षणासाठी दसरा चौकात गेले पाच दिवस ठिय्या आंदोलन सुरू आहे. रविवारी या ठिय्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी जिल्ह्यातील विविध संघटना, संस्था, ग्रामपंचायती, तरुण मंडळे, महिला बचतगटांची रीघ लागली होती. रविवार कॉलेज आणि महाविद्यालयांना सुट्टी असल्याने युवक-युवतींचा ठिय्या आंदोलनात मोठा सहभाग दिसला. यावेळी ऐतिहासिक दसरा चौकाने शिस्त अन् एकीचे दर्शन अनुभवले. पाठिंब्यासाठी बहुजन समाज संघटनांची दिवसभर रीघ लागली होती.

निवृत्ती चौक रिक्षा मित्र मंडळाने रॅलीद्वारे मराठा आरक्षणाला पाठिंबा दिला. निवृत्ती चौकातून सकाळी अकरा वाजता रॅलीला सुरुवात झाली. बिनखांबी गणेश मंदिर, महाद्वार रोड, शिवाजी चौक, महाराणा प्रताप चौक, शाहूपुरी, व्हीनस कॉर्नरमार्गे रॅली दसरा चौकात आली. सर्व रिक्षाचालकांनी पाठिंब्याचे पत्र संयोजकांकडे दिले. यामध्ये राजू जाधव, अमर तोडकर, किरण राऊत, महादेव पाटील, सचिन पोवार उपस्थित होते. उजळाईवाडी, पाडळी खुर्द, वडणगे, गांधीनगर आणि पोर्ले ग्रामस्थ गाव बंद ठेवून ठिय्या आंदोलनास पाठिंबा देण्यसाठी आले होते. पोर्लेचे प्रकाश जाधव, प्रकाश पाटील, गणपती चेचर, मारुती आरेकर, सरदार चौगुले, सर्जेराव सासने, बाबासाहेब गवळी, तर गांधीनगरच्या सरपंच रितू लालवाणी, उपसरपंच सेलवाणी, सोहणी सेलवाणी, तैयना आडवाणी, नातक सुंदराणी, पाडळी खुर्दच्या सरपंच मंगल तानुगडे, उपसरपंच प्रकाश पाटील, पोलिसपाटील अर्चना पाटील, ग्रामपंचायत सदस्य संगीता पाटील, गीता पाटील, माधुरी जाधव, सुमन कांबळे, पै. विजय पाटील, महेश पाटील, विश्‍वास पालकर, आनंदा पाटील, सुरेश सूर्यवंशी, अशोक पालकर, शिवराज पाटील आदींनी ठिय्या आंदोलन करून पाठिंब्याचे निवेदन संयोजकांना दिले. 

संयुक्त फुलेवाडी येथील तरुण मंडळे, फुटबॉल संघ, विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी दुचाकी रॅलीने शिस्तबद्धरीत्या दसरा चौकात आले. येथे नगरसेवक राहुल माने, राजू मोरे यांची भाषणे झाली. आजी-माजी विद्यार्थी संघटना, शिवाजी विद्यापीठाच्या संघटनेने पाठिंबा दिला. यावेळी डॉ. प्रवीण कोडोलीकर, डॉ. चांगदेव बंडकर, ऋतुराज माने, तर संयुक्त विद्यार्थी संघटनेचे मंदार पाटील, नीलेश यादव, रोहित पाटील, अभिजित राऊत, मयूर पाटील आदींनी ठिय्या आंदोलनस्थळी भेट देऊन ठिय्या मांडून पाठिंबा दिला. कोल्हापूर सराफ संघाच्या पदाधिकार्‍यांनी मोर्चाने दसरा चौकात येऊन आरक्षणाला पाठिंबा दिला. यावेळी भारत ओसवाल, विजय हावळ, कुलदीप गायकवाड, अनिल पोतदार, नंद ओसवाल यांच्यासह सराफ व्यावसायिक उपस्थित होते.

कोल्हापूर जिल्हा बैतुलमाल कमिटीच्या वतीने जाहीर पाठिंबा देऊन मुस्लिम बांधवांनी मराठा समाजाच्या पाठीशी ठाम राहण्याचा निर्धार व्यक्त केला. यावेळी तौफिक मुल्लाणी, राजू नदाफ, झाकीर कुरणे, इर्शाद बंडवल, जाफर मलबारी, रियाज सुभेदार, वासीम चाबुकस्वार, अलताफ इनामदार, जाफर महात, युनूस नदाफ, राजू तांबोळी, इरफान मुल्लाणी, युनूस शिकलगार, उमर सय्यद, इरफान थोडगे आदी उपस्थित होते. महाराष्ट्र हायस्कूल माजी विद्यार्थी संघटनेने ठिय्या मांडून पाठिंबा दिला. कोल्हापूर मराठा रणरागिणी ग्रुपच्या सदस्या,  माजी महापौर सई खराडे, प्रतिमा पाटील, ऋग्वेदा माने, संगीता खाडे, सरलाताई पाटील, संजीवनी देसाई, अनिता पाटील, प्रेरणा घोरपडे, संगीता लोखंडे, शुभांगी थोरात, सुवर्णा क्षीरसागर, चारुलता चव्हाण यांनी ठिय्या आंदोलनाला भेट देऊन दसरा चौकातील शाहू महाराजांच्या पुतळ्याखाली ठिय्या मांडला. कोल्हापूर लिंगायत तेली समाज, कोल्हापूर जिल्हा परीट समाज, युवा महिला संघटना, कोल्हापूर जिल्हा कोष्टी समाज, एस 4 ए विकास आघाडी, फर्मा मराठा कोल्हापूर, कोल्हापूर डिस्ट्रिक्ट स्पोर्टस् पॅरेंटस् असोसिएशन, प्रॅक्टिस क्लब, भ्रष्टाचारविरोधी जनजागृती समिती, कोल्हापूर जिल्हा सुतार-लोहार समाज, भारतीय सिंधी समाज, जाँबाजप्रणीत ए.एफ. ग्रुप, जय भवानी दूध संस्था पाडळी, शिव-साई ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था वरणगे, छत्रपती शाहू ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था वरणगे, सिटिझन फोरम, भोगावती शिक्षण प्रसारक मंडळ, श्री रेणुका भक्त संघटना, चर्मकार समाज, पेठवडगाव ग्रामस्थ, मराठा बँक माजी कर्मचारी संघटना आदींनी पाठिंबा दिला.

ठिय्या आंदोलनास पाठिंबा : देवस्थान समिती अध्यक्ष जाधव
मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीस पश्‍चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव यांनी पाठिंबा दिला. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी आंदोलनाच्या प्रक्रियेत व्यक्तिशः, तसेच भाजप पक्ष जिल्हाध्यक्ष या नात्याने सक्रिय होतो. सर्वप्रकारचे मोर्चे, आंदोलने, बंद यामध्ये आपला सहभाग, सहकार्य होते आणि राहील, असे प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.