Thu, Aug 22, 2019 10:13होमपेज › Kolhapur › पंचगंगा, वारणा नदीकाठावर सतर्कतेचा इशारा

पंचगंगा, वारणा नदीकाठावर सतर्कतेचा इशारा

Published On: Jul 16 2018 1:24AM | Last Updated: Jul 15 2018 11:08PMकोल्हापूर : प्रतिनिधी

जिल्ह्यात रविवारी पावसाचा जोर कमी राहिला. मात्र, धरणातून वीजनिर्मितीसाठी सुरू असलेल्या विसर्गामुळे नद्यांच्या पाणी पातळीत वाढ सुरूच आहे. पंचगंगेने रविवारी दुपारपासूनच धोक्याच्या पातळीकडे वाटचाल सुरू केली. सकाळी आठ वाजता पाणी पातळी 38.4 फुटांवर होती. दुपारी चार वाजता 39.04 फुटांपर्यंत गेली. यामुळे पंचगंगा आणि वारणा नदीकाठावरील गावांना सतर्क राहण्याचा इशारा जिल्हा प्रशासनाच्या वतीने देण्यात आला आहे. वारणा धरण 81.72 भरले असून, या धरणातून वीजनिर्मिती आणि सांडव्यातून असे एकूण 5 हजार 374 क्युसेक पाणी सोडण्यात आले आहे.

जिल्ह्यातील 65 बंधारे पाण्याखाली असल्याने 150 हून अधिक गावांचा थेट संपर्क तुटलेलाच आहे. कोल्हापूर शहरात पुराचे पाणी गायकवाडवाड्याजवळ आले असून, या मार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे.

जिल्ह्यात आज दिवसभर थांबून थांबून पाऊस सुरू होता. 15-20 मिनिटे जोरदार कोसळून विश्रांती घ्यायचा, पुन्हा मोठी सर यायची, जिल्ह्यात पावसाची अशीच परिस्थिती होती. धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर होता, यामुळे धरणांतील पाणीसाठ्यात लक्षणीय वाढ होत आहे. वारणा धरण सकाळी दुपारी 4 वाजता 81.72 टक्के भरले आहे, पावसाचा जोर व अन्य बाबी विचारात घेऊन धरणातून 5 हजार 374 क्युसेक पाणी सोडण्यात आले आहे. तसेच राधानगरी धरण 77.72 टक्के भरले असून, वीजनिर्मितीसाठी 1,600 क्युसेक विसर्ग भोगावती नदीपात्रात सुरू आहे. त्यामुळे पुराच्या पाण्याच्या पातळीत वाढ होत आहे. 

शहरात गायकवाडवाड्यापासून पाणी पुढे जामदार क्‍लबकडे सरकू लागले आहे. यामुळे जामदार क्‍लब परिसरातील कुटुंबांना सतर्क राहण्याच्या सूचना महापालिकेने दिल्या आहेत.  कोल्हापूर-रत्नागिरी मार्गावर, तसेच आंबेवाडी-चिखली मार्गावरही अनेक ठिकाणी रस्त्यावर पाणी आले आहे. रविवार सुट्टी असल्याने सायंकाळी पंचगंगेचा पूर पाहण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी झाली होती. शिवाजी पुलावर वाहतुकीची वारंवार कोंडी होत होती.

रविवारी सकाळी आठ वाजेपर्यंत गेल्या 24 तासांत जिल्ह्यात सरासरी 40.77 मि.मी. पाऊस झाला. गगनबावडा आणि आजरा या तालुक्यांमध्ये जोरदार पाऊस झाला. तिथे अनुक्रमे 89.00 मि.मी. व 65.50 मि.मी. पावसाची नोंद झाली.
राधानगरीत 49.00 मि.मी., भुदरगडमध्ये 49.60 मि.मी., पन्हाळा 33.39 मि.मी., करवीरमध्ये 22.18 मि.मी., कागलमध्ये 21.84 मि.मी., गडहिंग्लजमध्ये 26.42 मि.मी., चंदगडमध्ये 51.33 मि.मी., हातकणंगलेत 8 मि.मी., तर शिरोळमध्ये 5 मि.मी. पाऊस झाला. जिल्ह्याच्या 14 पैकी 13 धरणांच्या पाणलोट क्षेत्रात अतिवृष्टी झाली. जंगमहट्टी धरण परिसरात 50 मि.मी. पाऊस झाला. कोणतीही गंभीर परिस्थिती निर्माण झाल्यास तातडीने मदत पुरविण्यासाठी जिल्हा प्रशासनाच्या वतीने रेक्यू फोर्स तयार ठेवण्यात आली आहे. 

चंदगड तालुक्यात सलग सातव्या दिवशी मुसळधार पाऊस सुरू असून, तब्बल आठ कोल्हापूर पद्धतीचे बंधारे पाण्याखाली होते. पूरस्थिती ‘जैसे थे’ असल्याने नुकत्याच लावलेल्या भात रोप लावणीला धोका निर्माण झाला आहे.
आजरा शहरासह तालुक्यात पावसाचा जोर कायम असून, तालुक्यात अतिवृष्टी झाली आहे. कासार कांडगाव व आजरा येथील दोन घरे कोसळली आहेत, तर   हिरण्यकेशी नदीचे पाणी पात्राबाहेर आले असून, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.