Sat, Jul 20, 2019 10:38होमपेज › Kolhapur › महामंडळाच्या आजी-माजी संचालकांना नोटीस

महामंडळाच्या आजी-माजी संचालकांना नोटीस

Published On: Mar 01 2018 1:38AM | Last Updated: Mar 01 2018 12:09AMकोल्हापूर : प्रतिनिधी 

अखिल भारतीय चित्रपट महामंडाळात आर्थिक गैरव्यवहार  झाला आहे, असा ऑडिट रिपोर्टचा संदर्भ घेऊन कोल्हापूरच्या धर्मादाय आयुक्त कार्यालयाने महामंडळाच्या आजी-माजी संचालकांना नोटीस बजावली आहे. ऑडिट रिपोर्टमध्ये नोंदवलेल्या आक्षेपाबाबत दि. 28 फेब्रुवारीस या आजी-माजी संचालकांनी म्हणणे सादर  करून  महामंडळावर प्रशासक नेमावा, अशी मागणी केली.

अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या सध्या असणार्‍या संचालक मंडळापूर्वी जे संचालक मंडळ होते त्यांच्यावर हा आक्षेप घेण्यात आला आहे. या काळासाठी महामंडळात ज्यांनी संचालक म्हणून काम केले अशा चौदा जणांना नोटीस बजावण्यात आल्या आहेत.  पूर्वीच्या संचालकांनी केलेल्या कामामध्ये आर्थिक गैरव्यवहार झाल्याची तक्रार बाळा जाधव, विजय शिंदे, प्रमोद शिंदे, भास्कर जाधव यांनी धर्मादाय आयुक्त कार्यालयाकडे केली होती. या तक्रारीमध्ये महामंडळाचे लेखा परीक्षण करावे व महामंडळावर प्रशासक नेमावा, अशी मागणी केली  होती. धर्मादाय आयुक्तांनी यासंदर्भात महामंडाळाचे ऑडिट करण्याचे आदेश दिले होते. त्याचा अहवाल धर्मादाय आयुक्तांना सादर केला आहे. 

या अहवालाचा संदर्भ घेऊन आयुक्तांनी महामंडळाच्या आजी-माजी संचालकांना नोटीस पाठवल्या आहेत. विद्यमान संचालक मंडळातील काही संचालक हे पूर्वीच्या संचालक मंडळातही कार्यरत होते. या नोटीसमध्ये ऑडिट रिपोर्टमध्ये गैरव्यवहार झाल्याचे आक्षेप नोंदवण्यात आले आहेत. याबाबत काही म्हणणे मांडायचे असल्यास 28 फेब्रुवारीस सकाळी 11 वाजता कार्यालयात उपस्थित राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. जर आपले म्हणणे मांडले गेले नाही तर पुढील आदेश करण्यात येईल, असेही नोटिसीत म्हटले आहे. संचालकांबरोबरच महामंडळाच्या व्यवस्थापकांनांही नोटीस बजावण्यात 
आली. 

बुधवारी सकाळी 11 वाजता धर्मादाय आयुक्त कार्यालयात नोटीस बजावलेले सर्व संचालक हजर झाले. यावेळी त्यांना ऑडिट रिपोर्टमध्ये गैरव्यवहार केल्याचे निदर्शनास आले आहे. याबाबत आपले म्हणणे मांडावे, असे सांगितले. यावेळी आजी-माजी संचालकांनी आम्हाला ऑडिट रिपोर्टची प्रत मिळालेली नाही. त्यामुळे नेमकेे  काय आरोप आहेत याची माहिती नसल्याचे सांगितले. यावेळी धर्मादाय आयुक्तांनी सोमवारी ऑडिट रिपोर्टची प्रत देण्यात येईल व 16 मार्चपर्यंत आपले म्हणणे मांडा, असे सांगितले.