Mon, Jun 17, 2019 18:32होमपेज › Kolhapur › इडा, पिडा टळो, बळीचे राज्य येवो...

इडा, पिडा टळो, बळीचे राज्य येवो...

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

कोल्हापूर : प्रतिनिधी

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारच्या कारभाराला राज्यातील जनता  वैतागली असून त्याला लगाम घालण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने राज्यभर हल्लाबोल यात्रेचे आयोजन केले आहे. या आंदोलनाचा चौथा टप्पा पश्‍चिम महाराष्ट्रातून सुरू करत आहोत. त्याची सुरुवात कोल्हापूर जिल्ह्यातून केली जात आहे. त्यानिमित्त सोमवारी सकाळी आम्ही सर्व नेतेमंडळींनी करवीर निवासिनी श्री अंबाबाईच्या मंदिरात जाऊन दर्शन घेतले. या राज्यावरील इडा पिडा टळो, बळीचे राज्य येवो, अशा पद्धतीने श्री अंबाबाईला साकडे घातले. श्री अंबाबाई आम्हाला निश्‍चित आशीर्वाद देईल, असा आशावाद राष्ट्रवादीचे नेते माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला. 

यावेळी विधान परिषदेतील राष्ट्रवादीचे विरोधीपक्ष नेते धनंजय मुंढे, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आ. सुनील तटकरे, आ. हसन मुश्रीफ, आ. चित्राताई वाघ, आर. के. पोवार, जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील आदी उपस्थित होते.

पवार म्हणाले, भाजप-शिवसेनेची सत्ता आल्यानंतर जनतेने पहिली दोन वर्षे सरकारला कारभार करण्यासाठी संधी दिली. पण, या सरकारने शेतकरी, कामगार यांच्यासाठी एकही योजना राबवली नाही. उलट नोटाबंदी करून जनतेला हैराण करून सोडले. सभागृहात प्रश्‍न विचारले तर थातूरमातून उत्तरे देऊन वेळ मारून नेण्याचा प्रयत्न केला जात आहे. कर्जमाफी मिळत नसल्याने शेतकरी आणि बोंडआळीला अनुदान मिळत नसल्याने कापूस उत्पादक शेतकरी अडचणीत आला आहे.आमच्या सरकारच्या काळात जनहिताचा कारभार केला. पण, भाजपाने नोटबंदी, शाळाबंदी अशा अनेक  चुकीच्या धोरणातून सामान्यांचे हाल केले आहे.  कोट्यवधीचा आर्थिक घोटाळा करून निरव मोदी देशातून पळून गेला आहे. तर राज्याच्या मंत्रिमंडळातील एका मंत्र्याचे 78 कोटींचे कर्ज 25 कोटीवर शटलमेंट करून भरून घेतले जात आहे. तेच तरुणांनी घेतलेल्या कर्जाच्या वसुलीसाठी त्याच्या दारात गाड्या पाठवल्या जातात, असा सवाल पवारांनी उपस्थित केला.

अधिवेशन आहे की प्राणीसंग्रहालय...
अधिवेशनामध्ये विधान परिषदेमध्ये आ. सुनील तटकरे, विरोधी पक्षनेते धनंजय मुढे तर विधानसभेमध्ये आपण, आ. जयंत पाटील, आ. हसन मुश्रीफ प्रश्‍न विचारत होतो. पण, एकाही प्रश्‍नाला उत्तर न देता उंदीर, मांजर, वाघ, सिंह यांच्या गोष्टी सांगून वेळ मारून नेला जात आहे. यावरून हे अधिवेशन म्हणावयाचे की प्राणीसंग्रहालय, अशी टीका करत सरकारचा कारभार न समजण्याइतकी जनता दुधखुळी राहिलेली नाही, जनतेच्या मनात या सरकारच्या धोरणाविरोधात प्रचंड राग निर्माण झाला आहे. त्यामुळे जनता पेटून उठली असून सरकारला खाली खेचल्याशिवाय राहणार नाही, असे  अजित पवार म्हणाले. 

राज्यात सुरक्षेचा बोजबारा
राज्यात सुरक्षा व्यवस्थेचा बोजवारा उडाला आहे, असे सांगून पवार म्हणाले, सभागृहात सहायक पोलिस निरीक्षक अश्‍विनी बिंद्रे यांच्या खुनासह अनेक गंभीर गुन्ह्याबाबत गृह खात्याने काय कारवाया काय केल्या? असे विचारले असता, चुकीची उत्तरे आणि माहिती देऊन वेळ मारून नेण्याचा प्रयत्न या सकारकडून केला जात आहे, असे अजित पवार म्हणाले.
 

Tags : kolhapur, ajit pawar, press conference


  •