Wed, Jul 24, 2019 05:48होमपेज › Kolhapur › सत्ताधार्‍यांमुळे राज्यावर कर्जाचा डोंगर : अजित पवार

सत्ताधार्‍यांमुळे राज्यावर कर्जाचा डोंगर : अजित पवार

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

मुदाळतिट्टा : प्रतिनिधी

देशातील व राज्यातील भाजप आघाडीचे सरकार सर्वच पातळीवर अपयशी ठरले आहे. ‘अच्छे दिन’ची घोषणा करून सत्ता मिळवणार्‍या भाजपने चार वर्षांत जनतेसाठी काय केले? याचे स्पष्टीकरण द्यावे.  सरकारच्या कारभाराविरोधात जनतेचे मोर्चे निघत आहेत. राज्य सरकारचा  कार्यकाल संपेपर्यंत राज्यावर 5 लाख कोटी रुपयांच्या कर्जाचा डोंगर उभा राहणार असून, येथून पूढे जन्माला येणारे मूल राज्याचे कर्जदार म्हणूनच जन्माला येईल, अशी टीका माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली. 

मुरगूड (ता. कागल) येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे आयोजित  हल्लाबोल सभेत ते बोलत होते.  पवार म्हणाले, राष्ट्रवादीचे हल्लाबोल आंदोलन अंतिम निर्णायक टप्प्यावर आले आहे. कोल्हापूरही शाहूंची जन्मभूमी, कर्मभूमी आहे. तर मुरगूड ही क्रांतिकारकांची भूमी आहे. अशा या पुण्यभूमीत राष्ट्रवादीच्या हल्लाबोल यात्रेच्या चौथ्या पर्वाची सुरुवात केली आहे. राज्यात सरकारबरोबर असणारी शिवसेना सत्तेत आहे की विरोधात, हे कळत नसल्याचा टोला पवार यांनी  लगावला.  

विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे म्हणाले की, 2014 च्या लोकसभा निवडणुकीत ‘मैं विदेश जाऊंगा, काला धन लाऊंगा और आपके खातेमे 15 लाख रुपये जमा करूंगा, असे सांगणार्‍यांनी सामान्यांच्या खात्यांवर 15 पैसेसुद्धा जमा केलेले नाहीत. विजय मल्ल्या, नीरव मोदी यांनी कोट्यवधी रुपये पळवले असल्याने 15 लाख जमा होण्याऐवजी 15 लाखांचे कर्ज प्रत्येकाच्या खात्यावर जमा होईल, अशी भीती त्यांनी व्यक्त केली.   

प्रदेशाध्यक्ष आ. सुनील तटकरे म्हणाले, जनसामान्यांत खोटारड्या सरकारविरोधात चीड निर्माण झाली आहे. देशात सत्तापरिवर्तन होणार असे सांगत त्यांनी, देशाचे राजकारण शरद पवार यांच्याशिवाय होणार नाही, दिल्लीला शरद पवार यांच्याशिवाय पर्याय नाही, असे स्पष्ट केले. राष्ट्रवादीचे कार्यकर्ते हजारोंच्या संख्येने उपस्थित होते.

मंत्रालयातील उंदीर
 तटकरे भाषण करत असताना  व्यासपीठाजवळील रिकाम्या जागेतून  सरडा धावत गेला. याचा धागा पकडत  तटकरे म्हणाले, मंत्रालयातील उंदीर मुरगूडला कसा आला? असा प्रश्‍न उपस्थित करताच टाळ्यांचा कडकडाट झाला. 

कशात खावं ?
 धनंजय मुंडे म्हणाले की,  तावडे यांनी फोटोत, भगिणी मुंडे यांनी चिक्कीत, देसाई यांनी भुखंडात आरोग्य मंत्र्या यांनी औषधात तर अदिवासी मंत्र्यांनी शालेय आहारात खाऊन जनतेची लुटच केली.

स्वागत माजी नगराध्यक्ष प्रविणसिंह पाटील यांनी केले. प्रास्ताविक माजी मंत्री आमदार हसन मुश्रीफ यांनी केले. यावेळी आमदार जयदेव गायकवाड, शशिकांत शिंदे, जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील, माजी आमदार के. पी. पाटील, माजी खासदार निवेदिता माने, राष्ट्रवादी महिला प्रदेशाध्यक्ष चित्राताई वाघ, अ. संध्यादेवी कुपेकर, युवक राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष संग्राम पाटील आदी उपस्थित होते. आभार राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष शिवानंद माळी यांनी मानले.  सभेच्या प्रारंभी निढोरी (ता. कागल) येथून 2 हजार मोटर सायकलची रॅली काढण्यात आली.

...तर मग कर्नाटकात जा
जन्मावे तर कर्नाटकात, असे म्हणणार्‍या पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर टीका करताना अजित पवार म्हणाले, मग महाराष्ट्रात आलाच कशाला?, महाराष्ट्रातील जनतेच्या जीवावर पदे भोगावयाची अन् गोडवे मात्र सत्ता मिळविण्यासाठी कर्नाटकचे गायचे, अशा लोकांना जागा दाखविण्याची वेळ आली आहे.

Tags  : ncp halabol yatra, kolhapur district, kagal taluka,  ajit pawar


  •