Wed, Apr 24, 2019 22:07होमपेज › Kolhapur › वादामुळे ‘आजरा’समोर अडचणींची शक्यता

वादामुळे ‘आजरा’समोर अडचणींची शक्यता

Published On: Jan 10 2018 1:57AM | Last Updated: Jan 10 2018 12:15AM

बुकमार्क करा
आजरा  :ज्योतिप्रसाद सावंत 

आजरा साखर कारखान्यामध्ये सत्तारूढ आघाडी व विरोधी आघाडीकडे प्रत्येकी दहा संचालक झाल्याने राजकीय कुरघोड्यांना ऊत आला असून या राजकीय संघर्षाचा भाग म्हणून एकमेकांवर जोरदार पत्रकबाजी सुरू आहे. कारखाना गळीत हंगाम ऐन भरात आला असताना कारखान्यातील सत्तासंघर्ष उफाळून आल्याने सत्तासंघर्षाच्या या राजकीय वादळात आजरा कारखान्याचे गलबत भरकटण्याची शक्यता निर्माण झाली असून तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकर्‍यांकडून याबाबत संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होऊ लागली आहे. कारखान्यातील सत्तासंघर्ष संपुष्टात न आल्यास पुढच्या वर्षीचा गळीत हंगाम अडचणीत येण्याची शक्यताही बोलून दाखविली जात आहे.

दोन वर्षांपूर्वी आजरा साखर कारखान्याची निवडणूक पार पडली. या निवडणुकीमध्ये अशोकअण्णा चराटी व मित्रपक्षांनी 11 जागांवर विजय मिळवत कारखान्यात निसटते बहुमत मिळवले. काठावरचे बहुमत असल्याने अंतर्गत राजकीय खेळ्या सुरूच राहिल्या. याचाच परिणाम म्हणून केवळ वर्षभरातच संचालक उमेश आपटे यांना अपात्र ठरवण्यात सत्ताधारी यशस्वी झाले. त्यानंतर झालेल्या जि. प. निवडणुकीनंतर सत्ताधार्‍यांमधील विष्णूपंत केसरकर व अध्यक्ष अशोकअण्णा चराटी यांच्यामधील राजकीय संघर्ष सुरू झाला. विष्णूपंत केसरकर यांनी चालूगळीत हंगाम सुरू होताच कारखाना आर्थिकदृष्ट्या अडचणीत आहे, असे स्पष्ट करत सत्ताधार्‍यांच्या कारभारावर अप्रत्यक्षरीत्या नाराजी व्यक्त केली. 

सत्ताधार्‍यांविरोधात वेळोवेळी भृमिका मांडणारे केसरकर हे थेट विरोधकांच्या तंबूत दाखल झाल्याने 11 विरुद्ध नऊ असे असणारे बलाबल 10-10 असे झाले आहे. आठवडाभरापूर्वी झालेल्या मासिक सभेतून अध्यक्ष चराटी व त्यांचे समर्थक सभा अर्धवट टाकून महत्त्वाच्या विषयावर चर्चा न करताच निघून गेले. अध्यक्षांना कारखान्याचे काहीही सोयरसूतक नाही, असा आरोप विरोधकांनी केला. त्याचा निषेधही नोंदवला. परंतु, याला प्रत्युत्तर देत अध्यक्ष चराटी यांनी सावध भूमिका घेत सभा रितसर पार पडल्यानंतरच आपण सभागृह सोडले आहे, असे स्पष्ट केले. पुन्हा एकवेळ यानिमित्त अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे. 

तालुक्यात मुबलक ऊस उपलब्ध असतानाही केवळ पुरेशी यंत्रणा नसल्याने व कारखाना संचालकांतून केल्या जाणार्‍या उलट-सुलट विधानांमुळे बहुतांशी ऊस हा बाहेरील कारखान्यांकडे चालला आहे. वास्तविक चालू गळीत हंगामात साडेतीन लाख मे. टनांपेक्षाही जादा ऊस गाळप होण्यासाठी संचालकांनी अंतर्गत मतभेद विसरून प्रयत्न करण्याची गरज होती. परंतु, सद्यपरिस्थिती पाहता हा आकडा तीन लाखांचा टप्पा ओलांडेल की नाही, याबाबत साशंकता व्यक्त होत आहे. दरम्यान, आमदार हसन मुश्रीफ यांनी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना चांगलीच रसद पुरवण्यास सुरुवात केली आहे. याचा परिणाम म्हणूनच गळीत हंगाम सुरू असतानाच विरोधी संचालकांकडून राजकीय खेळ्या सुरू झाल्या आहेत. केसरकर यांना सोबत घेण्यातही राष्ट्रवादी तूर्तास यशस्वी झालेली दिसते. गळीत हंगाम संपल्यानंतर मात्र कारखान्याच्या राजकारणात अनेक घडामोडी होणार, हे स्पष्ट होत आहे.

अनेक शेतकर्‍यांचा ऊस अद्याप उचलला गेलेला नसून ऊसतोडीसाठी  शेतकरी सेंटरचे ऊंबरे झिजवू लागला आहे. काहींनी तर इतर कारखान्यांचा पर्यायही स्वीकारला आहे. पश्‍चिम भागामध्ये हत्ती, गव्यांच्या त्रासामुळे शेतकरी वर्ग यापुढे ऊस उत्पादन घ्यायचे की नाही? या विचारात आहे. उचंगी, सर्फनाला, आंबेओहोळ प्रकल्पांना कोणीच वाली नसल्याने हे प्रकल्प होणार आणि ऊस उत्पादन वाढणार अशा वल्गना राज्यकर्त्यांकडून सुरू आहेत. अशावेळी कारखाना संचालक मंडळी मात्र सत्तासंघर्षात गुंतली आहेत. अशीच परिस्थिती राहिल्यास आगामी काळ कारखान्याच्या हिताच्या दृष्टीने खडतरच राहणार हे सांगण्याची कोणा ज्योतिषाची गरज नाही.