Sat, Aug 17, 2019 16:12होमपेज › Kolhapur › ‘विमान’तळाच्या सुरक्षेची हौसच भारी!

‘विमान’तळाच्या सुरक्षेची हौसच भारी!

Published On: Jun 10 2018 1:48AM | Last Updated: Jun 09 2018 11:14PMकोल्हापूर : दिलीप भिसे

वरिष्ठांचा धाक, कामातील अनियमतता, तपासातील चुकांमुळे खात्यांतर्गत कारवाईचा धोका लक्षात घेऊन पोलिस दलाअंतर्गत अधिकार्‍यासह कर्मचारी निवांतपणा, ऐश आरामी ड्युटीसाठी धडपडू लागले आहेत. ताणतणाव आणि त्रासदायक नसलेल्या शाखांमध्ये वर्णी लागण्यासाठी चढाओढ सुरू झाली आहे. उचगाव विमानतळावरील केवळ 18 प्रवाशांच्या रक्षणासाठी 170 पोलिसांनी बदलीसाठी साकडे घातल्याने वरिष्ठांची डोकेदुखी झाली आहे. 
अमर्याद कामाचा ताण तणाव टाळण्यासाठी तरुण पोलिसांसह निवृत्तीच्या उंबरठ्यावरील अधिकारी, पोलिसांची अलीकडच्या काळात मानसिकता बदलत असल्याचे चित्र आहे. वारणानगर येथील कोट्यवधी रुपयांची चोरी, सांगलीतील अनिकेत कोथळे मृत्यूप्रकरणी दोषी पोलिसांवर झालेल्या कारवाईनंतर ही मानसिकता अधिक स्पष्टपणे जाणवते.
  परीक्षेत्रांतर्गत अधिकार्‍यांसह पोलिसांच्या बदल्यांची प्रक्रिया सुरू आहे. पाच, दहा वर्षांपूर्वी मोक्याच्या पोलिस ठाण्यावर वर्णी लागण्यासाठी सर्वच मार्गांचा अवलंब केला जात होता. ‘मलईदार’ ठाण्यावरील वर्णी म्हणजे ‘दहाही बोटे तुपात’ अशीच म्हण प्रचलित होती. अलीकडच्या काळातील गंभीर घटनांमुळे ‘मलई नको पण सुरक्षित नोकरी’असेच समीकरण रूढ झाले आहे.

 आऊट पोस्टिंगसाठी सारे काही...

जिल्हा कार्यक्षेत्रांतर्गत एलसीबी, पोलिस ठाण्यातर्गत डी.बी., खंडणी, गुंडा स्कॉडसह काळ्याधंद्याविरोधात कार्यरत पथकावरील वर्णीसाठी चढाओढ लागायची. स्थानिक राजकारण्यांसह  मंत्रालयातून दबाव तंत्राचा अवलंब केला जात होता. कालांतराने ऐशआराम आणि निवांतपणासाठी आऊट पोस्टिंगसाठी फिल्डिंग लावण्यात येऊ लागल्याचे चित्र अनुभवाला येते आहे.

विमानाच्या बंदोबस्तासाठी 170 पोलिसांची फिल्डिंग

उचगाव विमानतळावर काही वर्षांपासून सन्नाटा होता. मात्र, अलीकडच्या काळात आठवड्यातील रविवार, मंगळवार, बुधवारी या तीन दिवसांसाठी मुंबई-कोल्हापूर विमानसेवा सुरू झाली आहे. 18 सीटचे विमान आणि परिसर बंदोबस्तासाठी निरीक्षक दर्जाच्या अधिकार्‍यासह 17 पोलिसांचे पथक कार्यरत असताना चालू 170 पोलिसांनी विमानतळावरील बदलीसाठी नुसते साकडेच नव्हे तर मनधरणीही सुरू केली आहे. 

पाठोपाठ जिल्हा विशेष शाखेला पसंती दिली आहे. मोर्चा, आंदोलने, अतिमहत्त्वाच्या व्यक्तींच्या बंदोबस्तामुळे ताण तणाव असलेल्या शाहूपुरी पोलिस ठाण्याकडे बहुतांशी पोलिसांनी पाठ फिरविल्याचे दिसून येते.