Wed, Jun 26, 2019 11:43होमपेज › Kolhapur › आंदोलकांचं चुकलंच!

आंदोलकांचं चुकलंच!

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

कोल्हापूर : सतीश सरीकर

माणसा-माणसांतील वैर मेल्यावर संपते, असे म्हटले जाते. मरण म्हणजे वैरत्वाचा अंत समजला जातो. बुधवारी अख्ख्या सभागृहाने अंत्ययात्रा अनुभवली. कोल्हापूर शहरातील सर्वोच्च सभागृहातील महापौर आसनावरच शितोंडी (लोटकं) ठेवण्यात आली. सभागृहात तिरडी आणण्याचा प्रयत्न आणि शितोंडी आणणे म्हणजे सभागृहाच्या अवमानाचा कळसच झाल्याची चर्चा महापालिकेत अधिकारी-कर्मचार्‍यांतून सुरू होती.

महापालिका सभागृहाने आजपर्यंत आरोप-प्रत्यारोप सहन केले. वादावादीपासून अंगावर धावून जाण्याचे प्रकार अनुभवले. नगरसेविकांसमोरच शिवीगाळही ऐकली. काही नगरसेवकांना पोलिसांनी बेड्या घालून आणल्याचेही पाहिले. मात्र, बुधवारी थेट महापालिकेत तिरडी आणण्याचा प्रयत्न झाला. सभागृहात तिरडी आली नसली, तरी थेट शितोंडी आणली गेली. संपूर्ण शहराचा मान असलेल्या सभागृहातील महापौर आसनावरील मानदंडाच्या बाजूलाच शितोंडी ठेवण्यात आली. प्रतीकात्मक तिरडी असली, तरी त्यामुळे मनपाची उरलीसुरली ...ही गेल्याची भावना व्यक्‍त होवू लागली आहे.

महापालिकेतील याच सभागृहाने अनेक हुशार आणि तत्त्वनिष्ठ नगरसेवक पाहिले. शहराच्या विकासासाठी  अंतर्गत विरोध असूनही केवळ विकासाच्या मुद्द्यांवर सर्वजण शहराच्या हिताचे निर्णय घेण्यासाठी एकत्र यायचे. परंतु, महापालिकेत सद्यस्थितीत सत्ताधारी काँग्रेस-राष्ट्रवादी आणि विरोधी भाजप-ताराराणी आघाडी यांच्यातून अक्षरशः विस्तवही जात नाही, अशी स्थिती आहे. त्यांच्यातील नगरसेवक एकमेकांशी बोलणे लांबच, साधे बघतही नाहीत. काही अधिकारी त्याचा गैरफायदा घेत आहेत. भांडण लावून अक्षरशः तमाशा बघत असल्याचे माजी नगरसेवकच सांगत आहेत. परिणामी, शहरातील विकासकामांना खो बसत आहे.

प्रशासनातील अधिकारीही धुतल्या तांदळासारखे स्वच्छ आहेत, असे नाही. हाताच्या बोटावर मोजण्याइतके अधिकारी वगळता बहुतांश अधिकारी फक्‍त ‘मलईदार’ कामांच्याच मागे असतात. जनतेच्या हिताचे किंवा सामान्य माणसांच्या कामात त्यांना ‘इंटरेस्ट’ नसतो. त्यामुळेच समाजहिताच्या विकासकामांच्या फायली त्यांच्याकडून पूर्ण होत नाहीत. परिणामी, नगरसेवकांना आंदोलनाचा पवित्रा घ्यावा लागतो. 

भावना योग्य; पण कृती चुकीचीच

महापालिकेतील बहुतांश अधिकारी व कर्मचारीही हिसका दाखविल्याशिवाय काम करत नाहीत, हे वास्तव आहे. मात्र, सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांनी केलेले आंदोलन नक्‍कीच चुकीचे आहे. त्याचे कोणीही समर्थन करू शकत नाही. सभागृहाबरोबरच कोल्हापूरच्या जनतेचाही हा अपमान आहे.