Tue, Jul 16, 2019 22:29होमपेज › Kolhapur › ‘एजंटराज’ चौकशीसाठी त्रिसदस्यीय समिती

‘एजंटराज’ चौकशीसाठी त्रिसदस्यीय समिती

Published On: Jan 14 2018 1:52AM | Last Updated: Jan 14 2018 12:11AM

बुकमार्क करा
गडहिंग्लज : प्रवीण आजगेकर

गडहिंग्जल उपविभागातील महावितरणच्या कार्यालयातील काही अधिकारी गोरगरीब शेतकर्‍यांना वीज कनेक्शनसाठी मोठ्या प्रमाणात नाहक त्रास देत असून, छोट्या उद्योगांसाठीही वीज कनेक्शनच्या मागणीसाठी एजंटांच्या माध्यमातून त्यांच्याकडून पैशांची लूट करत आहेत. याबाबत दै. ‘पुढारी’ने शुक्रवारी (दि. 12) अंकामध्ये ‘महावितरणमध्ये एजंटराज’ या मथळ्याखाली बातमी प्रसिद्ध केली. या बातमीमुळे महावितरणमध्ये खळबळ उडाली असून, एजंटांच्या माध्यमातून काम करणार्‍या अधिकार्‍यांची बोबडी वळली आहे. महावितरणने याबाबत कडक भूमिका घेत चौकशीसाठी त्रिसदस्यीय समिती नेमली असून, दोन दिवसात याबाबतचा अहवाल देण्याचे आदेश दिले आहे. 

गडहिंग्लज उपविभागातील महावितरणच्या काही कार्यालयांमध्ये एजंटांच्या माध्यमातून काही अधिकारी गोरगरीब शेतकर्‍यांना नाहक त्रास देण्याचा प्रयत्न करत असून, एजंटांच्या माध्यमातून केवळ ‘अर्थ’गणितासाठी विविध प्रकारच्या कागदपत्रांची मागणी करून अर्जांबाबत अनेकदा त्रास देण्याचे काम करत आहेत.   शेतकर्‍यांची आर्थिक पिळवणूक करत आहेत. कागदपत्रांच्या त्रुटी सांगून या शेतकर्‍यांना काही फेर्‍या मारावयास लावल्यानंतर मग एजंटांच्या माध्यमातून त्यांची कागदपत्रे पूर्ततेसाठी हालचाली करण्यास हेच अधिकारी हिरवा कंदील दाखवतात, मगच शेतकर्‍यांची कामे पूर्णत्वास जात असल्यामुळे यामध्ये शेतकर्‍यांचा जीव मेटाकुटीस येत होता. ‘एजंटराज’बाबत दै. ‘पुढारी’ने वृत्त प्रसिद्ध केल्यानंतर महावितरणने चौकशी समिती नेमली आहे.