Wed, May 22, 2019 22:33होमपेज › Kolhapur › महापौर निवडीनंतरच झेडपीमध्ये खांदेपालट

महापौर निवडीनंतरच झेडपीमध्ये खांदेपालट

Published On: Apr 16 2018 12:28AM | Last Updated: Apr 15 2018 11:07PMकोल्हापूर : प्रतिनिधी

जिल्हा परिषदेत खांदेपालट करण्यासाठी अनेकजण गुडघ्याला बाशिंग बांधून बसले असले, तरी पुढील महिन्यात महापालिका महापौर बदलानंतरच जिल्हा परिषदेतील खांदेपालटाचा निर्णय होणार आहे. शिवाय, अध्यक्षपद वगळून इतर पदाधिकारी बदलास सध्या हिरवा कंदील मिळाला असला, तरी अंतिम निर्णय तेव्हाच होईल, असे विश्‍वसनीय सूत्रांकडून समजते. जिल्हा परिषदेतील बदलाला महापालिकेचा संदर्भ लावल्याने महापालिकेत सत्तापालटासाठी भाजपने ‘फिल्डिंग’ लावली आहे की काय, अशी चर्चा सुरू झाली आहे.

जिल्हा परिषदेत सत्ता स्थापनेवेळी पदाधिकार्‍यांसाठी सव्वा वर्षाचा फॉर्म्युला भाजप आघाडीतील सर्व नेत्यांनी मान्य करत तसा सदस्यांना शब्द दिला होता. येत्या 20 जून रोजी या फॉर्म्युल्यानुसार सव्वा वर्षाची मुदत संपत आहे. त्यामुळे पदाधिकारी होण्यासाठी इच्छुक असणार्‍यांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. गेल्याच आठवड्यात सर्किट हाऊसवर खासदार राजू शेट्टी, सदस्य राहुल आवाडे, आमदार सुजित मिणचेकर यांनी घटकपक्ष सदस्यांची बैठक घेऊन उपाध्यक्षपद व महिला-बालकल्याण सभापतिपद बदलण्यास आपण तयार असून, इतर घटकपक्षांनी आपापला निर्णय घ्यावा, असे जाहीर केले. तसेच पालकमंत्र्यांनीच बैठक घेऊन निर्णय घ्यावा, असेही निश्‍चित झाले. 

त्यानुसार रविवारी (दि. 15) पालकमंत्र्यांची भेट घेऊ, असे सांगितले होते; पण दिवसभर यासंदर्भात गुप्‍तता पाळण्यात आली. यासंदर्भात नेत्यांशी संपर्क साधला असता, त्यांनी आपल्याला बैठकीला बोलावलेच नाही, असे सांगून विषय झटकून टाकला; पण सत्ताधारी इच्छुक सदस्यांमध्ये असलेली धुसफुस आणि नाराजीमुळे वेगळे वळण लागू नये म्हणून ही चर्चेचा तपशील गुप्‍त राहील याची खबरदारी घेतली गेली. स्वत: पालकमंत्री चंद्रकांत पाटील व खासदार शेट्टी यांची फोनवरून चर्चा झाली. यात अध्यक्षपद सोडून इतर पदांच्या बदलांबाबत तयार असल्याचे पालकमंत्र्यांनी सांगितल्याचे समजते. 
शौमिका महाडिक याच अध्यक्ष राहतील. उर्वरित पदाधिकारी बदलाबाबत ज्या त्या घटकपक्षांच्या नेत्यांनी निर्णय घ्यावा, असे खुद्द पालकमंत्र्यांनीच सूचित केले असल्याचीही चर्चा आहे.