Mon, May 20, 2019 22:10होमपेज › Kolhapur › आता पोस्टातच मिळणार आधार कार्ड

आता पोस्टातच मिळणार आधार कार्ड

Published On: Dec 08 2017 1:37AM | Last Updated: Dec 08 2017 1:37AM

बुकमार्क करा

कोल्हापूर : शेखर दुग्गी

नवीन आधारकार्ड काढायचे आहे, द्या शंभर रुपये, नावातील, पत्त्यातील चुका दुरुस्त करायच्या आहेत, मग द्या दीडशे रुपये. शहरासह जिल्ह्यात विविध खासगी ग्राहक सेवा केंद्रांकडून खुलेआम सुरू असणारी ही लूट आता थांबणार आहे. कारण आता पोस्टातूनच ग्राहकांना आधारकार्ड काढून मिळणार आहे. कोल्हापूर प्रधान कार्यालयात नवीन वर्षात हे केंद्र सुरू होणार आहे.

आधारकार्ड ही भारतातील प्रत्येक नागरिकांची ओळख आहे. आधार क्रमांक मिळाल्यावर वेगळा पुरावा द्यावा लागत नाही. सुरुवातीला पोस्टाच्या जागेत खासगी कंपनीकडून आधारकार्ड काढून मिळायचे. हळहळू ही केंद्र बंद पडली. पुढे खासगी सेवा केंद्राचे पेव फुटले. या केंद्राकडून ग्राहकांची मोठी लूबाडणूक होऊ लागली. केंद्रातील व्यक्‍ती सांगेल ती रक्‍कम देऊन आधारकार्ड काढून मिळत असे. ग्राहकांची ही लूट खुलेआम सुरू होती. लोकही नाईलाजस्तव जादा रक्‍कम देऊन आधारकार्ड काढून घेत होते.

ग्राहकांची ही फसवणूक टाळण्यासाठीच केंद्र सरकारने आधारकार्डची संपूर्ण जबाबदारी पोस्ट खात्यावर सोपवली आहे. विश्‍वासहार्य आणि आपुलकीची सेवा देण्यासाठी पोस्ट आघाडीवर आहे. पोस्टाचे खेडोपाडी, वाड्या-वस्त्यांत जाळे पसरले आहे. त्यामुळे प्राथमिक टप्यात कसबा बावड्यातील प्रधान डाक कार्यालय, शिवाजी पेठेतील कोल्हापूर शहर प्रधान डाकघर आणि इचलकरंजी प्रधान डाकघर येथे आधार केंद्र सुरू होणार आहे. या केंद्रामुळे ग्राहकांची लुबाडणूक तर थांबेलच, शिवाय वेळेची बचत होणार आहे.

नवीन वर्षात हे केंद्र सुरू होणार असल्याचे पोस्टाच्या अधिकार्‍यांनी सांगितले. या केंद्रात पोस्टाचे प्रशिक्षित कर्मचारी असतील. केंद्रासाठी पोस्टात स्वतंत्र जागा असणार आहे. भविष्यात आणखी आधार केंद्र सुरू करण्याचा मानस पोस्टाचा  आहे.  

70 कार्यालयांत होणार दुरुस्ती
आधारकार्ड काढतेवळी त्यात अनेक चुका राहून जातात. नावात, पत्त्यात किंवा आणखी माहितीत चुका झाल्यास शासन कामात अडथळे निर्माण होतात. आधार कार्डातील या चुका सुधारण्याची सुविधाही पोस्टात असणार आहे. पोस्टाच्या एकूण 70 कार्यालयांतून ही सुविधा सुरू होणार आहे.

पोस्टात कमी खर्चात नवीन आधारकार्ड काढून मिळणार आहे. शिवाय कार्डातील दुुरुस्तीही करून मिळेल. यामुळे ग्राहकांची लुबाडणूक टळणार आहे.
- रमेश पाटील प्रवर डाक अधीक्षक, कोल्हापूर विभाग