Tue, Nov 19, 2019 06:43होमपेज › Kolhapur › नाना पाटेकर धावले शिरोळ पूरग्रस्तांच्या मदतीला; ५०० घरे बांधून देणार

नाना पाटेकर धावले शिरोळ पूरग्रस्तांच्या मदतीला

Published On: Aug 14 2019 1:36PM | Last Updated: Aug 14 2019 1:43PM

नाम फाउंडेशन शिरोळमध्ये ५०० घरे बांधून देणार शिरोळ (जि. कोल्हापूर) : प्रतिनिधी 

नाम फाउंडेशनचे संस्थापक, ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांनी आज (ता.१४) कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ येथे पूरग्रस्तांना भेट दिली. त्यांनी शिरोळ भागातील पूरबाधित भागाची पाहणी केली. १०० टक्के जमीनदोस्त झालेली घरे आणि अंशत: पडझड झालेल्या घरासंदर्भात त्यांनी प्रशासनासोबत चर्चा केली. यामध्ये नाम फौंडेशनकडून शिरोळ तालुक्यात ५०० घरे बांधून दिली जाणार आहेत, असे नाना पाटेकर यांनी दैनिक पुढारीशी बोलताना सांगितले. 

नाना म्हणाले, यामध्ये सरकारने रमाई योजना असेल, इंदिरा आवास योजना आणि प्रधानमंत्री घरकूल योजना असेल, याच्या अटी शिथील करून द्याव्यात. तसेच या योजनेद्वारे घरकूलसाठी दिले जाणारे अनुदान, निधी सरकारने अदा करावा. उरलेले पैसे नाम घालेल आणि त्या कुटुंबाला पक्के घर उभे करून देईल. 

यासंदर्भात, आज रात्री किंवा उद्या मी नाम फौंडेशनच्यावतीने पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांची भेट घेऊन सर्व विषय मार्गी लावणार आहे. शिरोळ तालुक्यातील पूरग्रस्त नागरिकांच्या चेहऱ्यावर आनंद पाहायचा आहे. हेच माझे पुण्य आहे, असेही नाना पाटेकर म्हणाले. 

यावेळी नाना पाटेकर, प्रांताधिकारी समीर शिंगटे, तहसिलदार गजानन गुरव, जि. प. चे माजी उप मुख्य कार्यकारी अधिकारी इंद्रजीत देशमुख, अप्पर पोलिस अधिक्षक श्रीनिवास घाटगे, डीवायएसपी किशोर काळे यांची उपस्थिती होती.