Wed, Jan 16, 2019 11:18होमपेज › Kolhapur › अल्पवयीनाचा लैगिक छळ : ...तर ‘त्या’ उपअधीक्षकांवर कारवाई 

अल्पवयीनाचा लैगिक छळ : ...तर ‘त्या’ उपअधीक्षकांवर कारवाई 

Published On: Feb 23 2018 1:19AM | Last Updated: Feb 23 2018 1:19AMकोल्हापूर : प्रतिनिधी

कनाननगर येथील अल्पवयीन मुलाला कायदेशीर दत्तक न घेता केवळ घरकामासाठी त्याचा वापर करून लैंगिक छळ केल्याचे चौकशीत निष्पन्‍न झाल्यास संबंधित निलंबित पोलिस उपअधीक्षकांवर कठोर कारवाई केली जाईल, असे पोलिस अधीक्षक संजय मोहिते यांनी गुरुवारी सांगितले. पीडित मुलाची सायंकाळी शासकीय रुग्णालयात वैद्यकीय तपासणी झाली.

बालकामगार लैंगिक छळप्रकरणी चौकशीची प्रक्रिया निःपक्षपाती सुरू आहे. कोणाला पाठीशी घालण्याचा अथवा वाचविण्याचा प्रश्‍न नाही. चौकशीत जे निष्पन्‍न होईल, त्यानुसार संशयितावर कारवाई होईल, असेही मोहिते यांनी स्पष्ट केले.

तपासाधिकारी संजय मोरे यांच्याकडून तपासाचा आढावा घेण्यात आला आहे. अप्पर पोलिस अधीक्षक तिरूपती काकडे यांच्या नियंत्रणाखाली तपासाची यंत्रणा गतिमान करण्यात आली आहे. संशयितांना ताब्यात घेण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत, असेही ते म्हणाले.

ताराबाई पार्कात राहणार्‍या निलंबित पोलिस अधीक्षकांनी कनाननगर येथील एका गरीब घरातील अल्पवयीन मुलास सांभाळण्यासाठी घेतले होते; मात्र कायदेशीर दत्तकपत्र न करता त्याला घरगडी म्हणून वापर करण्यात आला आहे. अल्पवयीन मुलावर अत्याचार केल्याप्रकरणी शाहूपुरी पोलिस ठाण्यात पोलिस अधिकार्‍याच्या मुलीविरुद्ध नुकताच गुन्हा दाखल झाला आहे.

बाल लैंगिक अत्याचाराचे प्रकरण चव्हाट्यावर येऊन 20-25 दिवसांचा कालावधी होऊनही पोलिसांनी घटनेची गांभीर्याने दखल न घेतल्याने समाजातील सर्वच स्तरांतून उलटसुलट प्रतिक्रिया व्यक्‍त होऊ लागल्या आहेत. पोलिस अधीक्षक मोहिते व अप्पर पोलिस अधीक्षक काकडे यांनी स्वत: चौकशी सुरू केली आहे. पोलिस निरीक्षक मोरे यांच्याकडून सायंकाळी तपासाचा आढावा घेतला.

पोलिस उपअधीक्षक डॉ. प्रशांत अमृतकर म्हणाले, बाल कामगार लैंगिक छळ प्रकरणाचा योग्य दिशेने तपास सुरू आहे. संशयितांच्या शोधासाठी दोन विशेष पथके कार्यरत आहेत. संशयिताचा लवकरच ताबा मिळेल. दरम्यान, पीडित बालकाच्या वैद्यकीय तपासणीवेळी  माध्यमांचे प्रतिनिधी व तपास पथकातील अधिकार्‍यांत वादावादी झाली.