Thu, Jun 27, 2019 02:00होमपेज › Kolhapur › रवीकिरण इंगवले, कांदेकरसह ५९० जण केले हद्दपार

रवीकिरण इंगवले, कांदेकरसह ५९० जण केले हद्दपार

Published On: Sep 13 2018 1:50AM | Last Updated: Sep 13 2018 1:44AMकोल्हापूर : प्रतिनिधी

गणेशोत्सवात जनतेला उगाच उपद्व्याप नकोत म्हणून पोलिस दलाने शहरासह जिल्ह्यातील सराईतांवर प्रतिबंधात्मक कारवाईचा बडगा उगारला असून, माजी उपमहापौर रवीकिरण इंगवले, रणजित मोरस्कर, संदीप कांदेकर, प्रवीण लिमकर, सूरज साखरेसह 590 जणांना गणेशोत्सव काळात हद्दपार करण्यात येत आहे. पोलिस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी ही माहिती दिली. पोलिस रेकॉर्डवरील 3 हजार 189 जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे. गणेशोत्सवात  जिल्ह्यातही चोख बंदोबस्त असेल, असेही ते म्हणाले.

जिल्ह्यात डॉल्बीमुक्‍त गणेशोत्सवाचा निर्धार करण्यात आला आहे. कोणत्याही स्थितीत ‘डॉल्बी’चा दणदणाट होणार नाही. आदेशाच्या उल्लंघनाचा प्रयत्न झाल्यास सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या पदाधिकार्‍यासह कार्यकारिणी व साऊंड सिस्टीम चालक, मालकाला जबर किंमत मोजावी लागेल.‘डॉल्बी’साठी वापर होणारी वाहने ताब्यात घेऊन मालकावर खटले दाखल करण्याचे आदेश जिल्ह्यातील पोलिस यंत्रणेला देण्यात आले आहेत, असेही त्यांनी स्पष्ट केले.

शांतता-सुव्यवस्थेला प्राधान्य देणार

ते म्हणाले, पोलिस रेकॉर्डवरील 3 हजार 189 सराईतांवर वेगवेगळ्या कलमान्वये कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे. त्यामध्ये सीआरपीसी 144 (2) अन्वये 552, महाराष्ट्र पोलिस अधिनियम 1951 चे कलम 55 अन्वये 10, कलम 56,57 अन्वये 28 अशा एकूण 590 जणांना हद्दपार करण्यात येत आहे.

हद्दपार झालेल्यांत प्रामुख्याने रवीकिरण इंगवले, सूरज हणमंत साखरे, प्रवीण प्रकाश लिमकर, संदीप कांदेकर, रणजित मोरस्कर, राहुल किशोर भोसले, रणजित महिपती पाटील, शौकत इकबाल बागवान, प्रसाद ऊर्फ गुरू बाबुराव लाड, संदीप मारुती चौगुले, स्वप्निल संजय चौगुले, सागर खंडू कांबळे, अजित दत्तात्रय मोहिते, रवी सुरेश शिंदे, जमीर मकसूद बेपारी, विश्‍वास ऊर्फ बंटी खंडू कांबळे, नागेश गुंडाप्पा डोलारे, विवेक ऊर्फ गोट्या शंकर दिंडे, संदीप ऊर्फ डॅनी सुरेश शिंदे, विश्‍वनाथ ऊर्फ बिल्डर सौदागर कांबळे आदींचा समावेश आहे.

मोठा फौजफाटा तैनात

गणेशोत्सवाच्या पार्श्‍वभूमीवर शहर, जिल्ह्यात पोलिस अधीक्षक 1, अप्पर पोलिस अधीक्षक 2, पोलिस उपअधीक्षक 8, पोलिस निरीक्षक 26, सहायक पोलिस उपनिरीक्षक 95, पोलिस 1700. याशिवाय बाहेरील जिल्ह्यातील पोलिस उपअधीक्षक 3, निरीक्षक 5, गृहरक्षक दलाच्या 1300 जवानांचा बंदोसस्त असणार आहे. तसेच राज्य राखीव दलाची पाच पथके पाचारण करण्यात आली आहेत.