होमपेज › Kolhapur › बेकायदा फलक, बॅनर्सवर होणार कारवाई

बेकायदा फलक, बॅनर्सवर होणार कारवाई

Published On: Feb 04 2018 1:51AM | Last Updated: Feb 04 2018 12:14AMजयसिंगपूर : सुरेश मेटकर

शहरातील वाहतुकीची कोंडी कमी करण्यासाठी पालिका आणि पोलिस खात्याने कृती आराखडा तयार केला आहे. यासाठी कोल्हापूर आणि इचलकरंजी शहराच्या धर्तीवर स्वतंत्र वाहतूक शाखेची मागणी करण्यात आली आहे. तसा प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. तसे झाल्यास वाहतुकीचा बराचसा ताण कमी होईल.

नियम मोडणार्‍या वाहनधारकांना लगाम लावण्यासाठी दोन के्रनची मागणी करण्यात आली आहे. वाहतूक प्रश्‍नाबरोबरच चौका-चौकांतील विनापरवाना डिजिटल बोर्ड, बॅनर्स डोकेदुखी ठरले आहेत. त्यांच्यावरही ठोस कारवाईचा बडगा उगारण्यात येणार आहे. 

पार्किंग, नो-पार्किंग, एकेरी वाहतूक (वन-वे), सायलेंट झोन तयार करण्यात आले आहेत. पालिकेचे नगरअभियंता व उपअभियंता यांनी   आराखडा तयार केला आहे. जयसिंगपूर विभागाचे पोलिस उपअधीक्षक कृष्णात पिंगळे, नगराध्यक्ष डॉ. नीता माने, उपनगराध्यक्ष संजय पाटील-यड्रावकर, मुख्याधिकारी राजेंद्र तेली यांनी याबाबत प्रस्ताव तयार केला आहे.
पार्किंग झोन : एकूण 10 मार्ग : गल्ली नं. 5 ते गल्ली नं. 9 पर्यंतचा रस्ता, गल्ली नं. 9 अ विक्रमसिंह रोडच्या दोन्ही बाजूस, गल्ली नं. 10 ते 13 लक्ष्मी रोड ते नांदणी रोड, गल्ली नं. 14 ते 19 शिरोळ-वाडी रोडवर दोन्ही बाजूस, गल्ली नं. 1 ते 9 व 10 ते 19 पर्यंतचा लक्ष्मीरोड, गल्ली नं. 1 ते 9 स्टेशन रोड, गल्ली नं. 1 ते 9 विक्रमसिंह रोड (पालिका रोड), गल्ली नं. 2 ते 9 राधाबाई रोड, गल्ली नं. 10 ते 13 शिरोळ रोड उत्तर बाजू, गल्ली नं. 13 ते झेले हायस्कूलपर्यंत पूर्व-पश्‍चिम शिरोळ रोड, गल्ली नं. 10 ते 13 पर्यंतचा नांदणी रोड. या मार्गावर सम-विषम तारखांना दोन व चारचाकी वाहनांना पार्किंग व्यवस्था करण्यात येणार आहे.

नो-पार्किंग झोन : एकूण 5 मार्ग : यामध्ये शहरातील खालील प्रमुख मार्गांचा समावेश आहे. क्रांती चौक ते गल्ली नं. 9 चा बोळ रस्ता ते राजाराम रोडचा भाग, महामार्गावर क्रांती चौक ते महावितरण उपविभागीय कार्यालयपर्यंतचा मार्ग, नगरपालिका चौक, कोल्हापूर-सांगली महामार्गाला भिडणारा नांदणी रोड.

एकेरी वाहतूक : एकूण 4 मार्ग : स्टेशन रोड (राजाराम रोड) ते गल्ली नं. 1, सांगली-कोल्हापूर महामार्ग ते लक्ष्मीरोडने उत्तर दिशा (झेले चित्रमंदिर) पहिल्या गल्लीपर्यंत ते पुढे स्टेशन रोड, लक्ष्मीरोड दक्षिण दिशा ते गल्ली नं. 18 ते पुढे शिरोळ रोड.

सायलेंट झोन : एकूण 33 ठिकाणी : प्रस्तावात मोदी हॉस्पिटल, काडगेमळा परिसरातील हॉस्पिटल, क्रांती चौकातील जिल्हा अप्पर सत्र न्यायालय, नगरपालिका, नवीन न्यायालय, पायोस हॉस्पिटल, डॉ. जे. जे. मगदूम शैक्षणिक संकुल, झेले हायस्कूल, मालू हायस्कूल, नवजीवन हायस्कूलसह शहरातील शाळा, महाविद्यालये, रुग्णालयांचा यामध्ये समावेश आहे.


‘बीओटी’चा महाराष्ट्रातील पहिला प्रयोग

जयसिंगपूर शहरातील वाहतुकीचा ताण कमी करण्यासाठी राज्यातील पहिला ‘बीओटी’चा प्रयोग करण्यात आला. बांधा-वापरा आणि हस्तांतर करा, या योजनेतून सन 1988 अंकली पूल ते शिरोळ बायपास ते कोल्हापूर मार्गाच्या रुंदीकरणासह मजबुतीकरण करण्यात आले. सांगलीकडून येणारी अवजड वाहतूक या मार्गावर वळविण्यासाठी महामार्गावर उदगाव येथे मुख्य चौकात पोलिस चौकी उभारण्यात आली होती. मात्र, प्रस्तावाची अंमलबजावणी झालीच नाही. कालांतराने चौकीही राहिली नाही आणि शहरातून अवजड वाहतूकही थांबली नाही. आता अवजड वाहतूक दोन्ही बायपास मार्गावरून वळविण्याचा प्रस्ताव आहे.
(समाप्‍त)