Wed, Jul 17, 2019 18:08होमपेज › Kolhapur › कोल्‍हापूर : लिंगनूर नाका जुगार अड्ड्यावर छापा 

कोल्‍हापूर : लिंगनूर नाका जुगार अड्ड्यावर छापा 

Published On: Sep 12 2018 1:48AM | Last Updated: Sep 12 2018 1:48AMमुरगूड ः प्रतिनिधी/नानीबाई चिखली : वार्ताहर

निपाणी-राधानगरी राज्यमार्गावरील लिंगनूर नाक्यावर वक्रतुंड कला, क्रीडा मंडळाच्या नावे सुरू असलेल्या तीन पानी जुगार अड्ड्यावर छापा टाकून पोलिसांनी 34 जणांना ताब्यात घेतले. दोन लाख रुपयांची रोकड, दोन मोटारी, 22 ते 23 दुचाकी, 50 मोबाईल असा सुमारे 20 लाखांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्‍त केला. मंगळवारी रात्री आठच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली. दरम्यान, रात्री उशिरापर्यंत गुन्हा नोंद करण्याचे काम सुरू होते. 

कागल तालुक्यातील लिंगनूर नाक्यावर वक्रतुंड कला, क्रीडा मंडळाच्या नावे अनेक महिन्यांपासून तीन पानी जुगार अड्डा चालवला जात होता. जिल्ह्यासह सीमाभागातूनही मोठ्या प्रमाणात येथे जुगार खेळण्यासाठी गर्दी होत असे. अड्ड्याच्या बाहेर मोठ्या प्रमाणात वाहने उभी असत. दिवस-रात्र या परिसरात मोठी वर्दळ असे. या परिसरात मटकाही मोठ्या प्रमाणात चालतो. लिंगनूर नाका, नानीबाई चिखली परिसरात एजंटांचे मोठे जाळे आहे. या अवैध धंद्यांमुळे ग्रामस्थ अक्षरश: वैतागले होते. 

मंगळवारी रात्री आठच्या सुमारास करवीरचे पोलिस उपअधीक्षक सूरज गुरव यांच्या पथकाने मुरगूड पोलिसांसह वक्रतुंड कला, क्रीडा मंडळावर छापा टाकला. छापा पडल्याचे लक्षात येताच काही जुगार्‍यांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला; पण पोलिसांनी तो हाणून पाडला. या ठिकाणी जुगारी आणि कर्मचारी अशा सुमारे 40 जणांना पथकाने ताब्यात घेतले.

दोन लाख रुपयांची रोकड, दोन मोटारी, 22 ते 23 दुचाकी, 50 मोबाईल पोलिसांनी जप्‍त केले.

छापा पडल्याचे समजताच परिसरातील ग्रामस्थांनी मोठी गर्दी केली. पोलिसांनी ताब्यात घेतलेल्यांना टेम्पोतून मुरगूड पोलिस ठाण्यात आणले. रात्री उशिरापर्यंत गुन्हा नोंद करण्याचे काम सुरू होते. या कारवाईत मुरगूडचे सहायक पोलिस निरीक्षक विठ्ठल दराडे, किशोर खाडे, तसेच सहकार्‍यांनी भाग घेतला. 

‘पुढारी’च्या वृत्तानंतर कारवाई 

दै. ‘पुढारी’ने महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवर खुलेआम अवैध धंदे सुरू असल्याबाबतचे वृत्त दिले होते. निपाणी-राधानगरी राज्यमार्गावरील अनेक गावांत मटका जोमात सुरू आहे. त्याचबरोबर काही ठिकाणी कला, क्रीडा मंडळाच्या नावे तीन पानी जुगार अड्डे सुरू असल्याचेही या वृत्तात म्हटले होते. या कारवाईमुळे ग्रामस्थांमधून समाधान व्यक्‍त होत आहे.