Tue, Apr 23, 2019 21:35होमपेज › Kolhapur › रूई-कबनूर रस्त्यावर अपघात; तरुण ठार

रूई-कबनूर रस्त्यावर अपघात; तरुण ठार

Published On: Feb 12 2018 1:52AM | Last Updated: Feb 11 2018 11:51PMहातकणंगले : प्रतिनिधी

रूई-कबनूर रस्त्यावरील  वळणावर मोटारसायकल घसरून झालेल्या अपघातात मोटारसायकलस्वार महेश कृष्णात पोतदार (वय 30, रा. मिणचे, ता. हातकणंगले) हा तरुण जागीच ठार झाला, तर वडील कृष्णात राजाराम पोतदार हे गंभीर जखमी झाले आहेत. हा अपघात शनिवारी रात्री घडला. अपघाताची नोंद हातकणंगले पोलिसांत झाली आहे.

महेश हा सराफ व्यावसायिक असून, त्याचे इचलकरंजी येथे दुकान आहे. शनिवारी हुपरीहून दोघेजण मोटारसायकल  वरून गावी परतत होते.  रूई-कबनूर रस्त्यावरील रूई हद्दीतील मजलेकर मळ्याजवळ मोटारसायकल आली असता एका वळणावर मोटारसायकल घसरली. त्यावेळी दोघेही रस्त्यापासून खाली 15 फूट मोटारसायकलसह कोसळले. यावेळी महेशच्या डोक्याला जबर मार लागल्याने तो जागीच ठार झाला, तर वडील कृष्णात हे गंभीर जखमी झाले. याच अवस्थेत रस्त्यावर येऊन त्यांनी  अपघाताविषयी माहिती दिली. 

त्यानंतर नागरिक व समर्पण संस्थेचे स्वप्निल नरुटे यांनी तातडीने त्यांना इचलकरंजीतील आयजीएम येथे उपचाराकरिता दाखल केले. परंतु, तत्पूर्वीच महेश मृत झाल्याचे वैद्यकीय अधिकार्‍यांनी सांगितले. महेशच्या पश्‍चात आई, वडील, पत्नी, मुलगी, मुलगा असा परिवार आहे. रूईकडे नदीवरून येणारा रस्ता अत्यंत धोकादायक आहे. हा रस्ता दुतर्फा 10 ते 15 फूट खोल असून, रस्त्यावर संरक्षक कठडा, तसेच दिशादर्शक फलक नाही.