होमपेज › Kolhapur › नृसिंहवाडी रस्त्यावर अपघातात महिला ठार

नृसिंहवाडी रस्त्यावर अपघातात महिला ठार

Published On: Mar 20 2018 4:28PM | Last Updated: Mar 20 2018 4:28PMकुरुंदवाड : प्रतिनिधी 

गणेशवाडी (ता. शिरोळ) येथील नृसिंहवाडी रस्त्यावर मोटारसायकल आणि ट्रकमध्ये झालेल्या अपघातात रेश्मा फिरोज मुजावर (वय 28.रा इचलकरंजी) ही महिला जागीच ठार झाली.

निष्काळजीपणाने ट्रक चालवून अपघात केल्याप्रकरणी ट्रकचालक मरोबा भिवा पांढरे (रा. टकळगे ता.विजापूर जि.विजापूर) यांच्याविरुद्ध कुरूंदवाड पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, आज (मंगळवार दि.20) सकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास फिरोज मौला मुजावर(रा.इचलकरंजी) हे आपली पत्नी रेश्मा मुजावर व तीन मुलांना घेऊन हिरो होंडा मोटारसायकल (क्र.एम एच 08.एल.8893) वरून कर्नाटक राज्यातील उगार या गावातून गणेशवाडी मार्गे इचलकरंजीकडे निघाले होते. 

मुजावर यांच्या मोटारसायकलला उजव्या बाजूने ट्रकने धक्का दिल्याने रेश्मा मुजावर ह्या ट्रकच्या पाठीमागील चाकाखाली आल्या. ट्रकाचे चाक डोक्यावरून गेल्याने त्या जागीच ठार झाल्या. या अपघातानंतर चालकाने घटनास्थळावरून पलायन केले.

दरम्यान या अपघातानंतर रेश्मा मुजावरच्या मृतदेहाकडे पाहून त्यांची मुले तंजीला, सबिया, हर्षद या चिमुकल्यांनी केलेला आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा होता. कुरुंदवाड येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात मयत मुजावर यांचे शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला आहे.

Tags : accident, nrushinhwadi road, woman, death,shirol, kurundwad, kolhapur news