Fri, Apr 26, 2019 20:03होमपेज › Kolhapur › रात्रभर सीपीआर जागेच..!

रात्रभर सीपीआर जागेच..!

Published On: Jan 28 2018 1:34AM | Last Updated: Jan 28 2018 12:53AMकोल्हापूर : प्रतिनिधी 

पंचगंगा नदीवरील शिवाजी पुलावरून शुक्रवारी रात्री ट्रॅव्हलर पुलाचा कठडा तोडून नदीत कोसळली. यात 13 जणांचा मृत्यू झाला, तर 3 महिलांना जीवदान मिळाले. रत्नागिरी मार्गावरील आंबा घाटातील तळवडे येथे अपघाती वळणावर वेगाने जाणारी कार झाडावर आदळून सहाजणांचा मृत्य, तर दोघे जखमी झाले. स्थानिक नागरिकांनी अपघातग्रस्तांना मदतीचा हात दिला. जखमींवर उपचार आणि मृतांच्या शवविच्छेदनासाठी रात्रभर सीपीआर जागेच राहिले. 

दिवसभरात जिल्ह्यात विविध छोट्या-मोठ्या अपघातांमध्ये 28 जणांचा मृत्यू झाला. शुक्रवारी सकाळी आंबा घाटातील तळवडे येथे कार झाडावर आदळून, तर रात्री साडेअकराच्या सुमारास शिवाजी पुलावरून ट्रॅव्हलर कोसळून 13 जणांचा मृत्यू झाला. या घटनेने संपूर्ण जिल्ह्यात हळहळ व्यक्‍त होत आहे.घटनास्थळावर स्थानिक नागरिकांनी अपघातग्रस्तांना मदतीचा हात दिला. जखमींना पुढील उपचारासाठी, तर मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी सीपीआर येथे हलविण्यात आले. अपघातग्रस्तांच्या नातेवाइकांनी गर्दी केली होती. मृतांचे नातेवाईक रुग्णालय परिसरात हतबल होऊन बसले होते. 

घटनास्थळावरून मृतांना थेट रुग्णवाहिकेतून सीपीआर येथील शवविच्छेदन विभागात आणले जात होते. दिवस-रात्र येथे रणजित सुखराम गोहिरे हा कर्मचारी 32 तासांहून अधिक काळ एकटाच तहानभूक विसरून शवविच्छेदनात व्यस्त होता.शुक्रवारी सकाळी आठ वाजता तो कामावर आला होता. शनिवारी दुपारी शवविच्छेदनाचे काम पूर्ण झाल्यानंतरच गोहिरे यांना मोकळीक मिळाली.

शनिवारी सकाळी सीपीआर येथे पालकमंत्री चंद्रकांत पाटील, आमदार सजेत पाटील, महापौर स्वाती यवलुजे, शिवसेनेचे सहसंपर्कप्रमुख संजय मंडलिक, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजय पवार, जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार, निवासी उपजिल्हाधिकारी संजय शिंदे, जिल्हा पोलिसप्रमुख संजय मोहिते, अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांनी भेट देऊन माहिती घेतली. आ. सतेज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांचे कार्यकर्ते मदत कार्यात व्यस्त होते. डॉ. डी. वाय. पाटील हॉस्पिटलच्या 11 रुग्णवाहिकांतून मृतदेह पुण्याकडे हालविण्यात आले.