Wed, Jul 24, 2019 07:52होमपेज › Kolhapur › कोल्हापूरकरांच्या धाडसाला आणि माणुसकीला सलाम

कोल्हापूरकरांच्या धाडसाला आणि माणुसकीला सलाम

Published On: Jan 28 2018 1:34AM | Last Updated: Jan 28 2018 1:34AMकोल्हापूरः प्रतिनिधी

अपघाताची माहिती मिळताच जीवाची पर्वा न करता तरुण मदतीसाठी धावले. पंचगंगा घाटावरून परीट घाटामार्गे घटनास्थळी पोहोचता येत होते. मात्र, खडक, कचरा, काचा, काटेरी झुडपे, अंधार, त्यातून जाणारी चिंचोळी, नागमोडी, चढउताराची वाट आणि बाजूला नदीचे पाण्याने भरलेले पात्र आणि कडाक्याची थंडी यामुळे घटनास्थळापर्यंत जाणे म्हणजे जीवावर उदार होण्यातीलच प्रकार होता. मात्र, तरुणांनी धाडसाने घटनास्थळापर्यंत जात काहींनी कडाक्याच्या थंडीतही पाण्यात उतरून सात जणांना बाहेर काढले. यामुळे किमान तिघींचा तर जीव वाचला. यानंतरही गाडी बाहेर काढण्यासाठी कोल्हापूरकर सकाळपर्यंत मदतकार्यात सहभागी झाले होते. त्यांच्या धाडसाला आणि त्यांनी दाखवलेल्या माणुसकीला सलामच करावा लागेल, अशा शब्दांत पुण्याहून आलेल्या केदारी कुटुंबातील एका नातेवाईकाने आपल्या भावना व्यक्‍त केल्या.

शहरात 11 अन् जिल्ह्यात तब्बल 70 ब्लॅक स्पॉट

कोल्हापूर शहरासह जिल्ह्यात वाढत्या अपघातांच्या पार्श्‍वभूमीवर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने अपघात प्रवण क्षेत्रांचा सर्व्हे करण्यात आला आहे. त्यास ब्लॅक स्पॉट असे संबोधण्यात येत आहे. त्यानुसार कोल्हापूर शहरात 11 अन् जिल्ह्यात तब्बल 70 ब्लॅक स्पॉट असल्याचे स्पष्ट झाले आहेत. जिल्ह्यात करवीर व हातकणंगले तालुक्यात सर्वाधिक म्हणजे प्रत्येकी 14 ब्लॅक स्पॉट आहेत.

राज्य शासनाने अपघात प्रवण क्षेत्राचा सर्व्हे करण्याचे आदेश सार्वजनिक बांधकाम विभागाला दिले आहेत. गेल्या तीन वर्षांत एकाच ठिकाणी अपघातात पाच जण ठार किंवा दहा जखमी झाले असल्यास त्या रस्त्याचा ब्लॅक स्पॉटमध्ये समावेश करण्यात आला आहे. निवडण्यात आलेल्या 70 ब्लॅक स्पॉटच्या रस्त्यावर तात्पुरते आणि कायमस्वरूपी उपाययोजना करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने राज्य शासनाला त्यासंदर्भातील अहवाल पाठविण्यात येणार आहे. तात्पुरत्या उपाययोजनेने रिफ्लेक्टर बसवणे, रम्बलिंग करणे, स्पीड ब्रेकर बसविणे आदींसह इतर कामांचा समावेश असणार आहे. कायमस्वरूपी उपाययोजनेत बाह्यवळण काढणे, वळण सुधारण्यासह इतर कामांचा समावेश असणार आहे.

शहरातील 11 डेंजर स्पॉट...
1) फोर्ड कॉर्नर, रिलायन्स मॉल
2) उमा चित्रमंदिर, सावित्रीबाई फुले हॉस्पिटल, 
गोखले कॉलेज चौक
3) सीपीआर हॉस्पिटल चौक, दसरा चौक
4) डी मार्ट मॉल    

5) क्रशर चौक
6) दाभोळकर कॉर्नर, ताराराणी पुतळा, राजीव गांधी पुतळा
7) ताराराणी चौक, लिशा हॉटेल चौक, 
मार्केट यार्ड, तावडे हॉटेल चौक
8) भगवा चौक, शिये टोल नाका, शुगरमिल कॉर्नर
9) महावीर कॉलेज चौक, भगवा चौक, जीपीओ चौक
10) सायबर चौक, एनसीसी ऑफिस, एसएससी बोर्ड, शेंडा पार्क चौक
11) जुना टेंबलाई नाका, हायवे कँटिन, शाहू टोल नाका