Wed, May 22, 2019 14:27होमपेज › Kolhapur › भीषण अपघातात 5 ठार : लक्षतीर्थ, कळंबा परिसरात शोककळा

भीषण अपघातात 5 ठार : लक्षतीर्थ, कळंबा परिसरात शोककळा

Published On: Jun 26 2018 1:14AM | Last Updated: Jun 26 2018 12:59AMकोल्हापूर : प्रतिनिधी

निपाणीजवळ झालेल्या भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू झाला. त्यामध्ये कोल्हापूर येथील तीन तरुणांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने लक्षतीर्थ वसाहत व कळंबा येथील त्रिमूर्ती कॉलनीत शोककळा पसरली आहे. नातेवाईकांचा आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा होता. नातेवाईकांसह मित्र परिवाराने रुग्णालय आवारात मोठी गर्दी केली होती.

निपाणी येथील महात्मा गांधी शासकीय रुग्णालयासमोरील भुयारी मार्गावर सकाळी साडेआठला झालेल्या अपघातात कोल्हापूर येथील फयूम सलीम शेख, नदीम इसाक बागवान (रा. यशोदा कॉलनी, लक्षतीर्थ वसाहत) व शब्बीर करिम सय्यद (रा. त्रिमूर्ती कॉलनी) यांच्यासह पाच जणांचा मृत्यू झाला. त्यात तिघे जण कोल्हापूर येथील असल्याचे समजताच नातेवाईकांना मोठा धक्का बसला.

 कोल्हापूर येथील अब्दुल अत्तार यांच्या मालकीच्या टेम्पोतून फयूम बागवान घटप्रभा येथून कोल्हापूरकडे भाजीपाला घेऊन येत होता.त्याच्यासमवेत नदीम, शब्बीर व राज असे होते. भरधाव पिकअपचा पुढील टायर फुटून चालकाचा ताबा सुटला आणि दुर्घटना घडल्याचे सांगण्यात आले.

अपघातातील जखमी फयूमला तातडीने कोल्हापूर येथील शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र, उपचार सुरू असतानाच त्याचा मृत्यू झाल्याने नातेवाईकांसह मित्रांनी रुग्णालय आवारात आक्रोश केला. फयूम याच्या पश्‍चात आई, आजोबा, आजी, भाऊ, तर नदीमच्या पश्‍चात आई, बहीण, भाऊ असा परिवार आहे. शब्बीर यांच्यामागे पत्नी, मुलगा, मुलगी असा मोठा परिवार आहे.