होमपेज › Kolhapur › कुणबी दाखल्यासाठी अडवणूक थांबवा

कुणबी दाखल्यासाठी अडवणूक थांबवा

Published On: Jun 16 2018 1:29AM | Last Updated: Jun 16 2018 12:09AMकोल्हापूर : प्रतिनिधी

कुणबी दाखल्यांसाठी अडवणूक केली जात आहे, ती थांबवावी अशी मागणी मराठा महासंघाच्या वतीने करण्यात आली. शाळांच्या दाखल्यावर कु, कुण अथवा कुणबी अशी असलेली नोंद ग्राह्य धरून प्रस्ताव स्वीकारावेत, अशी मागणीही यावेळी करण्यात आली. या मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांना शुक्रवारी देण्यात आले.

कु, कुण अथवा कुणबी अशा नोंदी असणार्‍या जात प्रमाणपत्र देण्याच्या स्पष्ट सूचना राज्य शासनाने दिल्या आहेत. त्याबाबतचे शासकीय परिपत्रकच काढण्यात आले आहे. तरीही अशा नोंदी असलेले प्रस्ताव काही अधिकार्‍यांकडून सादर करून घेतले जात नाहीत.28 फेब्रुवारी रोजी राज्य शासनाच्या सामाजिक न्याय विभागाने हे परिपत्रक काढले आहे. ते सर्व तहसील व प्रांत कार्यालयांना पाठवण्यात आले आहे. तरीही त्याची अंमलबजावणी होत नाही. असे दाखले देण्यासाठी अडवणूक केली जात असल्याचा आरोप यावेळी महासंघाच्या वतीने करण्यात आला.

मराठा समाजातील अनेक तरुण, विद्यार्थी हे शिक्षण आणि नोकरीपासून उपेक्षित आहेत. त्यांच्यासाठी हे दाखले तातडीने उपलब्ध होणे आवश्यक आहे. मात्र, अशी दाखले देण्याची नकारात्मक भूमिका घेतली जात आहे. दाखल्याबाबत मौन बाळगणार्‍या अधिकार्‍यांनी मराठा समाजाला गौण समजू नये, दाखले देण्यास टाळाटाळ झाली तर होणार्‍या परिणामाची जबाबदारी संबंधित अधिकारी, कर्मचार्‍यांवर राहील, असा इशारा देत अडवणूक करणार्‍या, कामचुकार आणि हेतूपूर्वक काम करणार्‍या अधिकार्‍यांची गय करू नका, या परिपत्रकाची अंमलबजावणी करण्याबाबत संबंधितांना सूचना द्या, अशी मागणीही यावेळी करण्यात आली.

कुणबी दाखल्याबाबत कु, कुण अथवा कुणबी अशी नोंद असताना कोणाचीही अडवणूक होणार नाही, याकरिता संबंधित अधिकार्‍यांना राज्य शासनाच्या दि.28 फेब्रुवारीच्या परिपत्रकाचे प्रभावी पालन करण्याच्या सूचना दिल्या जातील, अशी ग्वाही जिल्हाधिकारी सुभेदार यांनी दिली. 

यावेळी मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष वसंतराव मुळीक, शंकरराव शेळके, प्रकाश पाटील, महादेव पाटील, उत्तम जाधव, शरद साळुंखे, सुनील पाटील आदी उपस्थित होते.