होमपेज › Kolhapur › उस्मानाबादकरांच्या हाती कोल्हापूरची कायदा - सुव्यवस्था

उस्मानाबादकरांच्या हाती कोल्हापूरची कायदा - सुव्यवस्था

Published On: Jul 30 2018 1:29AM | Last Updated: Jul 29 2018 11:55PMकोल्हापूर : 

मराठवाड्यातील मागास जिल्ह्याचा शिक्का असलेल्या उस्मानाबादेतील दोन सुपुत्रांच्या हाती कोल्हापूरसारख्या प्रगत जिल्ह्याची कायदा, सुव्यवस्था सांभाळण्याची जबाबदारी असणार आहे. एकाच जिल्ह्यातील दोन सुुपुत्र या जिल्ह्याच्या पोलिसदलाचे सर्वेसर्वा असण्याचे हेही दुर्मीळ उदाहरणच ठरणार आहे.

पश्‍चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या सीमेवर असणारा किंबहुना या दोन्ही प्रदेशांना जोडणारा महत्वाचा दुवा म्हणजे उस्मानाबाद जिल्ह्याचे भौगोलिक व सामाजिकही स्थान आहे. मराठवाड्यातील सर्वात कमी पावसाचा जिल्हा म्हणून उस्मानाबादची ओळख. दुष्काळाचे जोखड वाहणार हा जिल्हा शिक्षणाच्या बाबतीत मात्र दोन पावले पुढे आहे. लातूर विभागीय मंडळातून बारावीच्या परिक्षेत राज्यात चमकदार कामगिरी केलेल्यांत उस्मानाबादकर विद्यार्थ्यांचा झेंडा अनेकदा उंचावत राहिला आहे.

दशकभरापूर्वीपर्यंत उच्च शिक्षणाच्या सोयींच्या अभावामुळे येथील तरुण लातूर, पुणे, मुंबई, कोल्हापूर, औरंगाबादसारख्या शहरात जात असत. त्यातीलच अनेकजण आज राज्याच्या प्रशासनात आयएएस, आयपीएस अधिकारी म्हणून नाव गाजवत आहेत.त्यातीलच एक म्हणजे अभिनव देशमुख. हे सध्या गडचिरोलीचे अधीक्षक म्हणून कार्यरत आहेत. एप्रिल महिन्यात त्यांनी 22 नक्षलवाद्यांचा खात्मा केला.

अभिनव देशमुख यांचे मूळ गाव पोहनेर (ता. जि. उस्मानाबाद) आहे. वडिलांच्या शासकीय नोकरीमुळे त्यांचे सर्व शिक्षण लातूरला झाले असले तरी त्यांची गावाशी नाळ कायम आहे. त्यांची बदली आता कोल्हापूरचे नवे अधीक्षक म्हणून झाली आहे.तर त्यांच्याअगोदर वर्षभरापासून कोल्हापुरातच अतिरिक्त अधीक्षकपदी तिरुपती काकडे कार्यरत आहेत. तेही उस्मानाबाद तालुक्यातील रुईभर गावचे सुपुत्र आहेत. कोल्हापूरसारख्या सामाजिकदृष्ट्या संवेदनशील असलेल्या जिल्ह्याची कायदा सुव्यवस्था आता हे दोन उस्मानाबादकर तरुण सांभाळणार आहेत.