Wed, Apr 24, 2019 07:59होमपेज › Kolhapur › 'अभय कुरुंदकरला पदोन्नती दिली नाही'

'अभय कुरुंदकरला पदोन्नती दिली नाही'

Published On: Jun 29 2018 10:08PM | Last Updated: Jun 29 2018 10:08PMकोल्‍हापूर : प्रतिनिधी

निलंबित पोलिस निरीक्षक अभय कुरुंदकर यांच्या पदोन्नतीसंबंधात विविध वृत्त वाहिन्यांवर दाखवित असलेली बातमी वस्तुस्थितीदर्शक नसून कुरुंदकर यांना कोणतीही पदोन्नती दिली नसल्याची माहिती विशेष पोलीस महानिरीक्षक (आस्थापना) राजकुमार व्हटकर यांनी दिली आहे.

सहायक पोलिस आयुक्त पदाच्या पदोन्नतीसाठी नियमाप्रमाणे पोलिस निरीक्षक पदाच्या १ जानेवारी २०१८ च्या सेवाज्येष्ठता यादीतील पहिल्या चारशे अधिकाऱ्यांची सद्य स्थितीची म्हणजे त्यांचे गोपनीय अहवाल, दाखल गुन्हे, विभागीय चौकशी, इतर सेवाविषयक बाबी इत्यादींची माहिती मागविण्यात आली आहे. त्याचप्रमाणे कुरुंदकर यांचे नावही या चारशे जणांच्या यादीत आहे. याचा अर्थ कुरुंदकर यांना पदोन्नती दिली असा होत नाही. फक्त माहिती मागविण्यात आली असून अद्याप निवड सूची तयार करण्यात आलेली नाही किंवा पदोन्नतीबाबत अद्याप विचार केलेला नाही.

या यादीतील सेवेत असलेले, निलंबित तसेच मृत व निवृत्त अधिकाऱ्यांची अद्यावत माहिती मागविण्यात येते. जमा झालेली माहिती पदोन्नती समितीच्या बैठकीत ठेवण्यात येते आणि त्यावेळी निवड सूची (Select List) बनविताना निलंबित, मृत व निवृत्त झालेल्या अधिकाऱ्यांची तसेच गुन्हे दाखल असलेले अधिकारी यांची नावे वगळून इतर अधिकाऱ्यांच्या नावाचा विचार पदोन्नतीसाठी समिती करत असते. त्यामुळे कुरुंदकर यांना पदोन्नती दिल्याची बातमी वस्तुस्थितीला धरून नाही, असे पोलीस महासंचालक कार्यालयाच्यावतीने व्हटकर यांनी सांगितले.