Wed, Jun 03, 2020 17:36होमपेज › Kolhapur › आता अंत्यविधीलाही ‘आधार’ हवा

आता अंत्यविधीलाही ‘आधार’ हवा

Published On: Jan 04 2018 1:20AM | Last Updated: Jan 03 2018 11:05PM

बुकमार्क करा
कोल्हापूर : सुनील सकटे 

डिजिटल इंडिया संकल्पनेमुळे सर्वत्र आधार लिंक अनिवार्य बनली आहे. बँकिंगपासून मोबाईलपर्यंत सर्वत्र आधार कार्ड सक्तीचे बनले आहे. कोल्हापुरात आता अंत्यविधीसाठीही आधार सक्तीचे केल्यामुळे शहरवासीयांच्या भुवया उंचावल्या आहेत. 

भाजप सरकारच्या काळात आधार कार्डला अनन्य महत्त्व प्राप्त झाले आहे. पॅनकार्ड सक्तीचे केल्याने आधार कार्डशिवाय पॅनकार्ड निघत नाही. पॅन कार्ड, आधार कार्ड जोडल्याशिवाय बँक खात्याची प्रक्रियाच पूर्ण होत नाही. बँकिंगसह विविध मोबाईल कंपन्यांनीही आधार कार्ड असल्याशिवाय मोबाईल सुरू राहणार नाही. असा सततचा संदेश दिल्याने नागरिकांची आधार लिंक करण्यासाठी गर्दी वाढत आहे. विविध शासकीय योजनांचा लाभ घेताना आधार कार्ड आवश्यक बनले आहे. विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती असो अथवा विधवा महिलांचे मानधन सर्व आर्थिक व्यवहाय थेट खात्यावर होत असल्याने आधार कार्डला महत्त्व प्राप्त झाले आहे. मुलाच्या जन्मनोंदणीसाठी आई-वडिलांचे आधार कार्ड मागितले जाते. 

अशा सर्वच पातळीवर आधार कार्ड महत्त्वाचे बनले आहे. आता आधार कार्डशिवाय स्मशानभूमीत अंत्यसंस्कार होणार नाही. याबाबत महापालिकेने स्मशानभूमीतील कर्मचार्‍यांना त्याबाबतच्या सूचना दिल्या आहेत. पूर्वी केवळ नगरसेवकांचा दाखला अथवा डॉक्टरांचे प्रमाणपत्र असले की अंत्यसंस्कारास अडचण येत नसे. आता या दोन्हीसह आधार कार्डची मागणी केली जाते. त्यामुळे शेवटच्या प्रवासासाठीही आधार मागितला जात आहे. 

आधार कार्ड असल्याशिवाय मयत नोंद होणार नाही, असा इशारा दिल्याने शहरवासीयांच्या भुवया उंचावल्या आहेत. पंचगंगा, कसबा बावडा, कदमवाडी, बापट कॅम्प आदी ठिकाणच्या स्मशानभूमीत आधार कार्ड असल्याशिवाय मयत नोंद होणार नाही, अशा आशयाचे फलकच लावले आहेत.