Thu, Mar 21, 2019 11:08होमपेज › Kolhapur › ‘झिपकॉईन’: गणगे याच्या बंगला, फार्महाऊसवर छापा

‘झिपकॉईन’: गणगे याच्या बंगला, फार्महाऊसवर छापा

Published On: May 04 2018 1:52AM | Last Updated: May 04 2018 1:23AMकोल्हापूर : प्रतिनिधी

‘झिपकॉईन’ फसवणूकप्रकरणी कथित कंपनीचा मास्टरमाईंड व फरारी संशयित बालाजी गणगे याच्या पुण्यातील आलिशान बंगल्यासह फार्महाऊसवर कोल्हापूर पोलिसांनी गुरुवारी पहाटे छापा टाकून शोध घेतला. मात्र, ठावठिकाणा लागला नाही. गणगे हा कुटुंबीयांसह पसार झाला आहे, असे तपासाधिकार्‍यांनी सांगितले. संशयितांनी कर्नाटकात मोठी गुंतवणूक केल्याची माहितीही पुढे आली आहे. पोलिसांचा ससेमिरा टाळण्यासाठी सर्वच एजंटांनी पळ काढल्याचे निदर्शनास आले आहे.

बिटकॉईन लाभांश फसवणुकीत पुण्यातील संशयित बालाजी गणगे हा मास्टरमाईंड असल्याचे चौकशीत निष्पन्न झाले आहे.

‘एलसीबी’च्या पथकांचा पुण्यात ठिय्या : छापासत्र

फरारी संशयितांच्या शोधासाठी ‘एलसीबी’ची दोन पथके पुण्यात तळ ठोकून आहेत. आज पहाटेच्या सुमाराला गणगेच्या बंगल्यासह त्याच्या फार्महाऊसवर छापा टाकण्यात आला; पण 
पथकाच्या हाती काहीही लागले नाही, असे तपासाधिकारी दिनकर मोहिते यांनी सांगितले. संशयित कुटुंबीयांसह पसार झाला आहे, असेही ते म्हणाले.

संगणकाचा डेटाच केला लॉक

कंपनीकडे गुंतवणूक झालेल्या रकमेपैकी कोट्यवधींची रक्कम कर्नाटकात जमीन खरेदी व्यवहारात गुंतविल्याची माहितीही चौकशीतून पुढे येत आहे. कंपनीच्या कार्यालयातून जप्त केलेल्या लॅपटॉपमधील संगणकीय ‘डेटा’ संशयितांनी काही दिवसांपूर्वीच लॉक केला आहे. गणगे हाताला लागल्यानंतर फसवणुकीची निश्‍चित व्याप्ती उघड हाईल, असेही मोहिते यांनी सांगितले.

एजंटांनी व्यावसायिकां नाही अलगद जाळ्यात ओढले

मोठ्या कमिशनच्या ऑफरमुळे संशयितांनी नियुक्त केलेल्या एजंटांनी शहरासह ग्रामीण भागातील अनेक बड्या उद्योग, व्यावसायिक, व्यापारी व कारखानदारांना जाळ्यात आढून मोठमोठ्या रकमा गुंतविण्यास भाग पाडले आहे. फसवणुकीचा प्रकार उघडकीला येताच कोल्हापूर, सांगली व रत्नागिरी तसेच बेळगाव जिल्ह्यातील एजंट गायब झाले आहेत. त्याचाही शोध घेण्यात येत आहे, असेही सांगण्यात आले.