होमपेज › Kolhapur › झिपकॉईन फसवणूक; सूत्रधार बालाजी गणगे याला अटक

झिपकॉईन फसवणूक; सूत्रधार बालाजी गणगे याला अटक

Published On: May 08 2018 1:56AM | Last Updated: May 08 2018 1:14AMकोल्हापूर : प्रतिनिधी

बिटकॉईन लाभांशाच्या आमिषाने गुंतवणूकदारांना कोट्यवधींचा गंडा घालणार्‍या टोळीचा म्होरक्या व मास्टरमाईंड बालाजी ऊर्फ बाळासाहेब भरत गणगे (45, पुणे) याच्या आर्थिक गुन्हे अन्वेषणने सोमवारी रात्री मुसक्या आवळल्या. एजंटासह मित्रांना भेटण्यासाठी गणगे कोल्हापूर बसस्थानकावर आला होता.

राजेंद्र नेर्लेकर, अनिल नेर्लेकर व संजय कुंभारच्या सहाय्याने गणगे याने नोव्हेंबर 2017 मध्ये ‘झिपकॉईन क्रिप्टो’ या कथित कंपनीचे लक्ष्मीपुरीतील कोंडाओळ येथील व्यापारी संकुलात कार्यालय थाटले होते. गुंतवणुकीवर बिटकॉईनच्या स्वरूपात दरमहा पंधरा टक्के लाभांश देण्याच्या आमिषाने टोळीने कोल्हापूर, सांगलीसह पश्‍चिम महाराष्ट्र, कर्नाटक व गोव्यातील अनेक बड्या व्यावसायिकांना कोट्यवधीचा गंडा घालून पोबारा केला होता.

फसवणूकप्रकरणी शाहूपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल होताच पोलिसांनी नेर्लेकर बंधूसह तिघांना बेड्या ठोकल्या होत्या. मास्टरमाईंड गणगे हा कुटुंबीयासह पुण्यातून पसार झाला होता. आर्थिक गुन्हे अन्वेषणचे पोलिस उपअधीक्षक राजेंद्र शेंडे यांनी छडा लावून गणगे याला रात्री उशिरा ताब्यात घेतले.

नेर्लेकर बंधूसह तिघांना सोमवारी दुपारी जिल्हा व सत्र न्यायालयात हजर करण्यात आले असता, दि. 12 मेपर्यंत पोलिस कोठडी वाढवून देण्यात आल्याचेही शेंडे यांनी सांगितले. या प्रकरणात आणखी काही साथीदारांची नावे निष्पन्‍न झाली आहेत, असेही तपासाधिकार्‍यांनी सांगितले.