Mon, Mar 18, 2019 19:30होमपेज › Kolhapur › जिल्हा परिषदेचे समृद्ध शाळा अभियान

जिल्हा परिषदेचे समृद्ध शाळा अभियान

Published On: Jul 19 2018 1:37AM | Last Updated: Jul 18 2018 11:22PMकोल्हापूर : प्रतिनिधी

जिल्हा परिषद शिक्षण विभागाच्या वतीने गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी ‘डॉ. जे. पी. नाईक माझी शाळा समृद्ध शाळा अभियान’ राबविण्यात येणार आहे. डॉ. जे. पी. नाईक यांचे जन्मशताब्दी वर्ष आहे त्या निमित्ताने हे अभियान हाती घेण्यात आले आहे. अशी माहिती शिक्षण समिती सभापती अंबरिषसिंह घाटगे यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिली.

ते म्हणाले, जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने यापूर्वी देखील नावीन्यपूर्ण उपक्रम राबविले आहेत. चालू 2018-19 मध्ये ‘डॉ. जे. पी. नाईक माझी शाळा समृद्ध शाळा अभियान’ लोकसहभागातून राबविण्यात येणार आहे. गुणवत्तापूर्ण शिक्षणाबरोबरच लोकसहभागातून शैक्षणिक उठाव व्हावा हाच या अभियानचा हेतू आहे. ज्ञानाशी असलेली बांधिलकी सत्यात उतरविण्यासाठी शिक्षकांनी आपले आयुष्य अध्ययन व अध्यापन या परस्परावलंबी कामात मुख्यत: घालवावे अशी अपेक्षा आहे.

जिल्हा परिषदेतील सर्व शाळांमध्ये हे अभियान राबविण्यात येणार आहे. शाळांमध्ये सुजाण विद्यार्थी निर्माण करण्याबरोबरच शाळा व परिसर सुंदर करणे, गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी अध्यापनता नावीन्यपूर्ण बाबींचा वापर करणे,  पायाभूत भौतिक व शैक्षणिक सुविधा निर्माण करून त्याचा प्रभावीपणे वापर करणे, लोकसहभाग वाढवून पालक व नागरिकांमध्ये जागृती निर्माण करणे, डिजिटल तंत्रज्ञानाचा अध्ययन व अध्यापन प्रक्रियेत वापर करण्यात येणार आहे. त्यासाठी जिल्हास्तरीय व तालुका स्तरावर समिती स्थापन करण्यात येणार आहे. जिल्हा स्तरावरील समितीचे अध्यक्ष शिक्षण व अर्थ समिती सभापती असणार आहेत. तालुका स्तरावरील समिती पंचायत समिती सभापतींच्या अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात येणार आहे. जिल्हा स्तरावरील समितीत आठ जणांचा तर तालुका स्तरावरील समितीत सात जणांचा समावेश असणार आहे. याशिवाय केंद्र स्तरावर केंद्र प्रमुखांच्या अध्यक्षतेखाली चार जणांची समिती स्थापन करण्यात येणार आहे. यावेळी सदस्य, विनय पाटील, रसिका पाटील, अनिता चौगुले, वंदना जाधव, प्रभारी शिक्षणाधिकारी रविकांत आडसूळ उपस्थित होते.

21 ते 51 हजारांची बक्षिसे

अभियान कालावधीत 18 जुलै ते 31 ऑक्टोबर या कालावधीत राबविलेल्या उपक्रमांच्या अनुषंगाने मुल्यांकन करण्यात येणार आहे. त्यानंतर तालुका स्तरावर पहिले तीन क्रमांक शाळांचे काढण्यात येतील. पहिल्या तीन शाळांना 5 ते 10 हजार रुपयाचे बक्षीस देण्यात येणार आहे. त्यातून जिल्हा स्तरावर तीन शाळांचे क्रमांक काढण्यात येतील त्यांना 21 ते 51 हजार रुपयांपर्यंतचे बक्षीस ठेवण्यात आले आहे.