Sat, Apr 20, 2019 15:51होमपेज › Kolhapur › झेब्रा क्रॉसिंग आहे पादचार्‍यांसाठी!

झेब्रा क्रॉसिंग आहे पादचार्‍यांसाठी!

Published On: May 28 2018 1:42AM | Last Updated: May 27 2018 11:24PMकोल्हापूर : प्रतिनिधी 

रस्त्यांवर असलेले झेब्रा क्रॉसिंग पादचार्‍यांसाठी असतात. ते त्यांना वापरता यावेत म्हणून किमान झेब्रा क्रॉसिंगवर तरी आपण वाहने उभी करू नये, हा साधा नियम आहे. मात्र, हा नियम पाळणारच नाही, अशी मानसिकता कोल्हापुरातील वाहनचालकांमध्ये दिसते. या वाहतुकीच्या समस्येवर सर्वच स्तरांतून नेहमी मोठ्या प्रमाणावर ओरड होताना दिसते. वाहनचालकांकडून वाहतूक नियमांचे उल्‍लघंन झाल्यानंतर होणार्‍या कारवाईतून वाहतूक पोलिसांकडून दंड लाखो रुपयांनी दरवर्षी वसूल केला जातो. तरीही या पोलिसी बडग्याची वाहनचालकांना भीती वाटेनाशी झाली आहे. ही सद्यस्थिती पाहता झेब्रा क्रॉसिंगचा नियम कागदावरच आहे, असे म्हणावे लागेल. 

सिग्‍नल हिरवा होण्यास अगदी दहा सेकंद उरलेले असतानाही वाहनचालक जोरात हॉर्न वाजवायला सुरुवात करतात. अनेकदा सिग्‍नल हिरवा होण्यापूर्वीच सिग्‍नल तोडून वाहनचालक पुढे निघालेले सर्रास पाहायला मिळतात. एखाद्या वाहनचालकाने सिग्‍नलचा नियम पाळायचा, असे ठरवले असेल तर त्याला मागे सारून पुढे जाणारे त्यास अक्षरश: वेड्यात काढतानाचे चित्र शहरातील प्रत्येक सिग्‍नलवर दिसते. 

शहरातील रस्त्याच्या कडेला असलेल्या फुटपाथची अवस्था तर भयावह आहे. चौक ओलांडताना पादचार्‍यांना अनेकदा जीव मुठीत घेऊन रस्ता क्रॉस करावा लागतो. ज्येष्ठ नागरिकांचे अशावेळी प्रचंड हाल होतात. त्यात सिग्‍नल न पाळण्याची शर्यत लागलेली असल्यामुळे रस्ता क्रॉस करत असलेल्या लोकांवरच ओरडत वाहनचालक निघून जातात. सिग्‍नल हिरवा होईपर्यंत वाट पाहण्याची सोशिकता आता उरली नसल्याचे दिसते. एकाने नियम मोडल्यामुळे त्याच्यामागे गेल्यास काही फरक पडत नाही, असा विचार करत सगळेच नियम तोडतात.  

झेब्रा क्रॉसिंगच्या अलीकडे असलेल्या पहिल्या लाईनवर आपले वाहन उभे करायला पाहिजे, हे केवळ कागदी नियमांमध्येच राहिले आहे. रस्त्यावर वाहन चालवण्यासाठी असलेले नियम स्वत:हून पाळले, तर वाहतूक कोंडीची समस्या कमी होण्यास मदत होईल. वाहनचालकांना वाहतुकीची शिस्त लावण्यासाठी अनेकदा वेळोवेळी वेगवेगळे उपक्रम राबवण्यात येतात. शहरातील विविध संस्था, संघटना, स्वयंसेवी संस्था, ज्येष्ठ नागरिक, कॉलेजवयीन मुले असे विविध समाजघटक शहरातील सिग्‍नलवर वाहतुकीचे नियम पाळावे यासाठी कार्यरत असतात.