Wed, Mar 20, 2019 12:44होमपेज › Kolhapur › स्कूल चले हम!

स्कूल चले हम!

Published On: Mar 19 2018 1:46AM | Last Updated: Jun 15 2018 6:31PMकोल्हापूर : प्रतिनिधी

अंगणवाडी हे शालेय जीवनातील पहिले पाऊल. जिल्हा परिषदेच्या महिला बालकल्याण विभागाच्या प्रवेशोत्सवाच्या निमित्ताने हे पहिले पाऊल आणखी अविस्मरणीय ठरले. 
फेटे, विविध रंगी पोशाखांमध्ये सजलेल्या तीन वर्षांच्या बालकांना लेझीम, ढोलच्या गजरात फुगे, फुलांनी सजवलेल्या गाड्यांमधून वाजतगाजत आणत अंगणवाडीत प्रवेश दिला गेला. यात खासदार राजू शेट्टी यांच्यासह जि.प. अध्यक्ष शौमिका महाडिक, सीईओ कुणाल खेमनार, सर्व विषय समिती सभापती, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, गटविकास अधिकारी, सरपंच, बालविकास प्रकल्प अधिकारी, अंगणवाडी कर्मचारी आदींनी स्वत: उपस्थिती लावत या बालकांचा उत्साह वाढवला. 

खासगी नर्सरी स्कूलचे आव्हान समोर असतानाही केवळ गुणवत्तेच्या अभ्यासक्रमाच्या जोरावर अंगणवाड्यांनीही ‘हम भी किसीसे कम नही’ म्हणत गुढीपाडव्यादिवशी जोरदार प्रवेशोत्सव मोहीम राबवली. जिल्ह्यातील 3 हजार 994 अंगणवाड्यांमध्ये 3 वर्षांवरील सर्व बालके प्रवेशकर्ती होतील यासाठी महिला बालकल्याण विभागाने गेल्या महिन्यापासून सर्व तयारी केली होती. अधिकारी व लोकप्रतिनिधींनी हातात हात घालून या मोहिमेत काम करत अंगणवाडी प्रवेशोत्सव यशस्वी केल्याने पाडव्यादिवशी अंगणवाड्या हाऊसफुल्‍ल झाल्या. 

नो फी नो डोनेशन, म्हणून घ्या अंगणवाडीत अ‍ॅडमिशन अशा आशयाचे फलक घेऊन गावागावांत अंगणवाडी बालकांसह जनजागृती फेर्‍या काढण्यात आल्या. जि.प. अध्यक्ष शौमिका महाडिक यांनी शिरोलीत तर खासदार राजू शेट्टी यांनी अंबप येथे जाऊन या प्रवेशकर्त्या बालकांना प्रवेशाच्या शुभेच्छा दिल्या. करवीर तालुक्यातील अशा फेरीत स्वत: सीईओ डॉ. कुणाल खेमनार हे सहभागी झाले. त्यांनी प्रवेशकर्त्या बालकांना पाटी, पुस्तक भेट दिली. महिला बालकल्याणचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी सोमनाथ रसाळ यांनीही अंगणवाड्यांना भेटी देऊन बालकांचा उत्साह दुणावला. प्रत्येक अंगणवाडीत स्थानिक जि.प., पं.स., ग्रामपंचायत सदस्य यांना सोबत घेऊन कार्यक्रम करण्यात आले.