Sun, Feb 23, 2020 10:00होमपेज › Kolhapur › ऊसबिले थकली; बळीराजा हवालदिल

ऊसबिले थकली; बळीराजा हवालदिल

Published On: Jan 15 2018 1:48AM | Last Updated: Jan 14 2018 10:57PM

बुकमार्क करा
यवलूज : वार्ताहर

साखर कारखान्यांचा गळीत हंगाम सुरू होऊन अडीच महिने झाले तरी अद्याप डिसेंबरपासूनची ऊस बिले थकल्यामुळे सेवा संस्था व इतर कर्जांवरील व्याजाचा भुर्दंड शेतकर्‍यांना सोसावा लागत आहे. राज्य बँकेने साखरेवरील मूल्यांकन कमी केल्यामुळे जाहीर केलेला ऊस दर साखर कारखान्यांना देताना दमछाक झाली आहे. यामुळे ऊस तुटल्यापासून 14 दिवसांत ऊस बिल देण्याच्या कायद्यांचे उल्लंघन होत आहे. ऊस दरासाठी संषर्घ करणार्‍या शेतकरी संघटना गप्प का, असा प्रश्‍न बळीराजाला पडला आहे.

महाराष्ट्रातील शेतकर्‍यांचे अर्थकारण ऊस शेतीच्या भोवती फिरते आहे. किंबहुना, पश्‍चिम महाराष्ट्रात प्रामुख्याने ऊस शेती केली जाते. चालू गळीत हंगामाच्या प्रारंभी शेतकरी संघटना व कारखानदार यांच्यात समेट घडवून एफआरपी व नंतर प्रतिटन 100 रुपये दर ठरवला गेला. त्यावेळी साखरेचे दर प्रतिक्विंटल 3800 च्या घरात होते. पण, आज साखरेचे दर गडगडले आहेत. यामुळे मूल्यांकन घटवल्यामुळे साखर कारखान्यांनी डिसेंबरपासूनची ऊस बिले काढलेली नाहीत. ऊस तुटून गेल्यावर 14 दिवसांत ऊस बिल खात्यावर वर्ग करावे लागते. अन्यथा, 15 टक्के व्याजाने दंड घ्यावा लागतो. हा कायदा आहे. पण, आज व्याज दूर राहिले, मुद्दल मिळवताना बळीराजाला वाट पाहावी लागत आहे. थकीत ऊस बिलांमुळे घेतलेल्या पीककर्जावरील व्याज वाढत आहे.