Fri, Mar 22, 2019 01:28
    ब्रेकिंग    होमपेज › Kolhapur › कोल्‍हापुरात पूर्ववैमनस्यातून तरुणाचा खून

कोल्‍हापुरात पूर्ववैमनस्यातून तरुणाचा खून

Published On: Dec 13 2017 1:58AM | Last Updated: Dec 13 2017 1:58AM

बुकमार्क करा

कोल्हापूर : प्रतिनिधी

पूर्ववैमनस्यातून चिडून खंडोबा तालमीजवळील तरुण प्रणव ऊर्फ गणेश सुभाष बिंद (वय 17, रा. पद्माराजे गार्डन, शिवाजी पेठ, मूळ रा. गुजरात) याचा चाकूने छातीवर सपासप वार करून खून करण्यात आला. सायंकाळी साडेसहाच्या सुमारास गांधी मैदानामध्ये हा प्रकार घडला. याप्रकरणी जुना राजवाडा पोलिसांनी वैभव विनायक राऊत (23, रा. मरगाई गल्ली, शिवाजी पेठ) व तुषार ऊर्फ पिंटू जयसिंग रसाळे (23, रा. नाथागोळे तालमीजवळ) या दोघांना अटक केली आहे.

खंडोबा तालमीचे कार्यकर्ते आणि बीजीएम स्पोर्टस्मधील कार्यकर्ते यांच्यात दत्त जयंती दिवशी वाद झाला होता. त्यावेळी भागातील ज्येष्ठ नागरिकांनी मध्यस्थी करून हा वाद मिटवला होता. मंगळवारी सायंकाळी गणेश बिंद व त्याचे मित्र क्रिकेट खेळण्यासाठी गांधी मैदानात गेले होते. याच मैदानात वैभव राऊत,

 तुषार रसाळे व त्याचे मित्र क्रिकेट खेळत होते. गणेश बिंद आल्याचे पाहताच वैभव आणि तुषार हे दोघे गणेशजवळ गेले आणि त्याच्या डोक्यात त्यांनी हातातील बॅट मारली. हा प्रकार मैदानात असलेल्या गणेशच्या मित्रांनी पाहिला. काही तरुणांनी याची माहिती गल्लीतील तरुणांना सांगितली. काही वेळातच खंडोबा तालीम मंडळ परिसरातील कार्यकर्ते मैदानात आले. त्यांनी वैभव आणि तुषार यांना जवळ बोलावून गणेशच्या समोर समज देण्याचा प्रयत्न सुरू केला. तेवढ्यात तुषार रसाळे याने खिशातील चाकू काढून गणेशच्या छातीवर सपासप वार केले. त्यानंतर वैभव आणि तुषार यांनी पळ काढला. तेथून ते दोघे जुना राजवाडा पोलिस ठाण्यात गेले. गणेश बिंद याने आपल्याला मारहाण केली असल्याचे हे दोघे ठाणे अंमलदारांना सांगत होते; पण पोलिसांनी त्यांना काही वेळ थांबवून घेतले. दरम्यान, या दोघांनी मारहाण केलेला गणेश बिंद हा मृत झाल्याची माहिती जुना राजवाडा पोलिसांना मिळाली, त्यानंतर पोलिसांनी रात्री उशिरा वैभव राऊत आणि तुषार रसाळे या दोघांना ताब्यात घेतले. त्यानंतर त्यांना अटक करण्यात आली.

गणेश बिंद याचे कुटुंबीय मूळ गुजरातमधील आहे. 20 वर्षांपूर्वी गणेशचे वडील सुभाष बिंद हे उदरनिर्वाहासाठी कोल्हापुरात आले. सुभाष बिंद हे खंडोबा तालमीच्या मागे पद्माराजे उद्यानाच्या परिसरात भाड्याच्या घरात राहत होते. काही वर्षांपूर्वी सुभाष हे पत्नी आणि मुलांना सोडून परगावी निघून गेले. त्यानंतर ते परत आले नाहीत. गणेशची आई लहान मुलांची खेळणी, सौंदर्य प्रसाधने याची विक्री करून मुलांचे पालनपोषण करत होती. दहावीनंतर शिक्षण थांबवून गणेश  आईच्या कामात मदत करत होता. तर लहान भाऊ शाळेत जात होता. पती गेल्यानंतर तिला गणेशचा आधार होता; पण तोही आधार निघून गेल्याने त्याच्या आईने सीपीआरच्या आवारात फोडलेला हंबरडा हृदय पिटाळून टाकणारा होता.