Sat, Jul 20, 2019 11:07होमपेज › Kolhapur › ‘पैशांचा पाऊस’ पाडणार्‍या टोळीकडून तरुणांची फसवणूक

‘पैशांचा पाऊस’ पाडणार्‍या टोळीकडून तरुणांची फसवणूक

Published On: Jan 20 2018 1:39AM | Last Updated: Jan 20 2018 1:03AMशिरोली पुलाची : वार्ताहर

शिरोली येथील कर्नाटक आंध्र येथील आंतरराष्ट्रीय टोळीने स्थानिकांच्या मदतीने झटपट श्रीमंत होण्याची अभिलाषा बाळगणार्‍या काही युवकांना हेरून पैशाचा पाऊस पाडण्याचे आमिष दाखवून त्यांना लाखोंचा गंडा घातल्याची चर्चा आहे. या रकमा या युवकांनी मोठ्या व्याजाने नातेवाइकांकडून घेऊन त्या टोळीकडे सुपूर्द केल्या. त्यामुळे या रकमा परत करण्यासाठी युवकांच्या घरच्यांनी स्थावर मालमत्ता विकल्याने शिरोली पोलिसांनी या प्रकरणात लक्ष घालून टोळीवर कारवाही करण्याची मागणी सुरू झाली आहे.

गेल्या सहा महिन्यांपासून एक कर्नाटक, आंध्रातील आंतरराष्ट्रीय टोळीने गावात हातपाय पसरले आहेत. या टोळीकडून काही स्थानिक तरुणाकडून हाताशी धरले आहे. या स्थानिक तरुणाकडून माहिती घेऊन झटपट श्रीमंत होण्याची अभिलाषा बाळगणार्‍या युवकांना आपल्या जाळ्यात ओढले आहे. या तरुणांना कासवाच्या मदतीने पैशाचा पाऊस पाडण्याचे आमिष दाखवले आहे. या आमिषाला बळी पडून शिरोलीतील 8 ते 10 युवक अडकले आहेत. या युवकांना राज्याबाहेर नेऊन पैशाचा पाऊस पाडण्याचे प्रात्यक्षिक दाखवण्यात आली. त्यामुळे युवकांनी टोळीला मागणीनुसार लाखो रुपये दिल्याची चर्चा आहे. त्यासाठी काहींनी व्यापारातील, काहींनी सावकाराकडून व्याजाने तर काहींनी पाहुण्याकडून रकमा आणून या टोळीच्या स्वाधीन केल्या आहेत. याशिवाय काही युवकांनी 
कासवांची तस्करी करून रकमा दिल्या आहेत. सध्या सावकार, पै-पाहुणे यांच्याकडून पैशाला तगादा सुरू झाल्याने ही गोष्ट घरच्यांना समजली. परंतु, त्यावेळी उशीर झाल्याने अखेर घरच्यांनी स्थावर मालमत्ता जसे की बंगले, जमीन विकून या रकमा भागवल्याची चर्चा आहे.

शिरोली पोलिसांनी यापूर्वी पुण्यातील रहिवासी असणार्‍या शिरोलीच्या मोहिते नावाच्या जावायाला ताब्यात घेतले होते.त्याच्याकडून काळ्या कागदपत्राची बॅग ताब्यात घेतली होती. ही कागदपत्रे वरती फेकून प्रकाशझोतात संमोहनाद्वारे पैसे असल्याचे भासवून फसवणूक केली जात असल्याचे सांगितले 
होते. शिरोली एमआयडीसी पोलिसांनी या टोळीचा छडा लावून त्यांना जेरबंद करावे, अशी मागणी ग्रामस्थांतून जोर धरू लागली आहे.