होमपेज › Kolhapur › यूपीएससीत कोल्हापूरचा दबदबा वाढतोय

यूपीएससीत कोल्हापूरचा दबदबा वाढतोय

Published On: Apr 29 2018 2:08AM | Last Updated: Apr 29 2018 12:08AMकोल्हापूर : विजय पाटील 

आमच्या गावचा ‘मन्या’ साहेब झालाय.. आता काय बी काम सांगायचं झालंच म्हणून समजा...असं शर्टाची कॉलर टाईट करून पिंट्या दिसेल त्याला सांगत सुटला आहे. मनोज (मन्या) परीक्षा पास झाला असला तरी त्याच्यापेक्षा जास्त आनंद आठवीतून शाळा सोडलेल्या पिंट्याला झालाय. कारण मन्या आणि पिंट्या एकाच गावचे. गावचा पोरगा साहेब झाल्यावर अख्खं गाव आनंदात बेभान तर तालुका आणि जिल्हावासीयसुद्धा या यशाचे कुटुंबीयांप्रमाणे कौतुक करतात.

नाव बदललेली पण कोल्हापूरचं सद्यचित्र सांगणारी ही बोलकी उदाहरणं. कोल्हापुरातील विशेषत: ग्रामीण भागातील दोन-तीन मुलं अलीकडं केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (यूपीएससी) परीक्षेत दरवेळी पास होताहेत. त्यामुळे यूपीएससी परीक्षेत  कोल्हापूर पॅटर्नचा दबदबा वाढत आहे. 

केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा म्हणजे म्हटलं तर अग्निदिव्यच. कारण देशभरातून लाखो विद्यार्थी ही परीक्षा देतात. चारपाचशे जागांसाठी लाखो विद्यार्थी बसलेले असल्याने स्पर्धा प्रचंड असते. त्यामुळे ही परीक्षा क्रॅक करणार्‍यांचे कौतुक केलेच पाहिजे. कोल्हापुरातील अनेकांनी यूपीएससी परीक्षा क्रॅक करून तरुणाईसमोर आदर्शवाट तयार करून ठेवली आहे. 

किसरूळ (ता. पन्हाळा) चा अजय कुंभार, नागनवाडीचा (ता. चंदगड) किरण चव्हाण या दोघांनी यूपीएससीत कोल्हापूरची यशस्वी पताका फडकावली. दोघेही दुर्गम समजल्या जाणार्‍या तालुक्याचे तरुण आहेत. एका अर्थाने ग्रामीण जीवनाशी निगडित असणारे तरुण या परीक्षांना आत्मविश्‍वासाने सामोरे जाऊन त्यावर आपली मोहोर उमटवत आहेत. प्रत्येक गोष्टीचे रडगाणं सांगणार्‍या हताश आणि हतबल तरुणाईला चार्ज करण्यासाठी या मंडळींच्या संघर्षकथा महत्त्वाच्या आहेत. कारण अजय कुंभारचे गाव हे तसं खेड आहे.

जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकून तो ही परीक्षा पहिल्याच प्रयत्नात उत्तीर्ण झाला. किरण चव्हाणचे शिक्षणही शिंगणापूरच्या शाळेत झालं. त्यानंतर तो चंदगडमध्ये शिकला. सगळं शिक्षण मराठीत आणि ग्रामीण भागात झालं. त्याने परीक्षाही मराठीतूनच दिली. हे दोघेही आता साहेब होणार हे नक्की. दररोज दहा-बारा तास अभ्यास आणि कोणत्याही परिस्थितीत हताश व्हायचं नाही तर प्रचंड इच्छाशक्ती ठेवायची हे दोघांच्याही यशाचं गमक आहे. 

सध्या कोल्हापूरचे आयजी असणारे विश्‍वास नांगरे-पाटील यांचा प्रवास तर बहुतेकांना माहीत आहेच. त्यांनी व्याख्यानाच्या माध्यमातून तरुणांना या परीक्षांबद्दलची गोडी लावण्याचे काम सुरू केले आहे. आयपीएस हेमंत निंबाळकर (सध्या कर्नाटक), निरंजन वायंगणकर (1996-बॅच),  दिलीप जवळकर (आयएएस, उत्तराखंड, 1996-97) यांनीही यशाची गुढी उभारून कोल्हापूरच्या परंपरेला पुढे नेण्यात सातत्य ठेवले. आयएएस मदन नागरगोजे  (2006) यांनी तर फक्त तीन वर्षे नियोजन करून मेहनत करा आणि आयएएस व्हा, असा मंत्रच मुलांना दिला.  ते सध्या  मध्य प्रदेशमध्ये कार्यरत आहेत. 

शाहूवाडी तालुक्यातील श्रीधर पाटील (आयपीएस 2010), कुलदीप कुंभार (कूर, भुदरगड, 2016) आदींसह अनेक तरुणांची उदाहरणे देता येतील ज्यांनी यश मिळवून एक आदर्श निर्माण करून ठेवला आहे. यापूर्वी ज्ञानेश्‍वर मुळे यांच्यासारख्या ऐंशीच्या दशकात ही परीक्षा पास झालेल्यांनीही  परराष्ट्र सेवेत उत्कृष्ट काम करून या सेवेचा चांगला पायंडा पाडला आहे.  यूपीएससीत यश मिळवणे ही सोपी गोष्ट नाही. नुसतीच निवडणूक आणि कुणाचा तर प्रचार करून दिवस ढकलणार्‍या तरुणाईसमोर ही चांगली उदाहरणे आहेत. त्यामुळे तरुणाईनेही कोणतेही एक क्षेत्र निवडून त्यामध्ये यश मिळवावे, अशीच सार्‍यांची अपेक्षा आहे..

कोल्हापूर पॅटर्नचा पायंडा

स्पर्धा परीक्षांबाबत मागे वळून पाहिले तर कोल्हापूरने राज्यातील तरुणाईसाठी नवनवे पॅटर्न निर्माण करून ठेवले आहेत. आयएएस भूषण गगराणी यांनी 1989 साली महाराष्ट्रात प्रथम आणि देशात चौथा येण्याचा बहुमान मिळवला. मराठी वाङ्मय विषय घेऊन त्यांनी हे यश मिळविले. मराठी वाङ्मय घेऊन यूपीएससी परीक्षेत यश मिळवता येते हे त्यांनी प्रथमच दाखवून दिले. त्यानंतर मराठी वाङ्मय हा विषय घेण्याची लाटच राज्यभर सुरू झाली.