Sat, Apr 20, 2019 17:52होमपेज › Kolhapur › धकाधकीच्या जीवनशैलीवर रामबाण ‘योगा’

धकाधकीच्या जीवनशैलीवर रामबाण ‘योगा’

Published On: Jun 21 2018 1:36AM | Last Updated: Jun 20 2018 11:37PMकोल्हापूर : सागर यादव 

वाढती लोकसंख्या, प्रत्येकाची जगण्यासाठीची धडपड, त्यातून निर्माण झालेली जीवघेणी स्पर्धा अशा धावपळीच्या आणि धकाधकीच्या जीवनशैलीवर रामबाण उपाय म्हणून ‘योगा’ कडे पाहिले जाते. यामुळे केवळ भारतातच नाही तर जगभरातील बहुतांश देशात योगाचे महत्त्व जाणलेल्या सर्व जाती-धर्मीय लोकांकडून योगा केला जातो. यामुळेच 21 जून रोजी होणारा आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा करण्यासाठी अवघे जग सज्ज झाले आहे. 

इंद्रियांचा संयम करून मन एकाग्र करणे म्हणजे योग होय. प्राचीन भारतीय संस्कृतीत योगाचे महत्त्व सांगणार्‍या अनेक गोष्टी धार्मिक-सांस्कृतिक शिलालेख, शिल्पाकृती, हस्तलिखिते, नाणी, दंतकथा अशा ऐतिहासिक संदर्भ साधनांत आहेत. योगाभ्यास म्हणजेच ‘योगसिद्धी’ झाल्याने आत्मसाक्षात्कार प्राप्त होतो. या आत्मसाक्षात्कारातून मोक्ष प्राप्ती होते, असे मानले जाते. संस्कृतमधील ‘युज’ धातूपासून ‘योग’ शब्द बनला आहे. गाडीला किंवा  रथाला घोडा-बैल जुंपतात. जुंपणे म्हणजे योग. इंद्रियांना घोड्यांची व शरीराला रथाची उपमा देण्यात आली आहे. ज्ञानयोग, कर्मयोग, भक्‍तियोग, राजयोग, हठयोग, लययोग, मंत्रयोग असे अनेक योगमार्ग अध्यात्मात सांगण्यात आले आहेत. सर्वांमध्ये चित्ताची एकाग्रता हा योगाचा अर्थ गृहित धरलेलाच असतो. 

योगचिकित्सा...

ज्या रोग चिकित्सेमध्ये योगोपचार वापरले जातात तीला ‘योगचिकित्सा’ म्हणतात. जीवात्मा व परमात्मा यांना जोडणे किंवा एकत्र आणणे हा सिद्धांत योगाचा आहे. महर्षी पतंजली यांनी इ.स.पूर्व दुसर्‍या शतकात या शास्त्राची मांडणी केली. त्यांनी ‘योगसूत्र’ या आपल्या ग्रंथात योगाचे शास्त्र मांडले आहे. यम, नियम, आसन आणि प्राणायाम ही पहिली चार अंगे शरीरासंबीधी असल्याने त्यांचा शरीरस्वास्थ्याशी तर उरलेल्यांचा मन:स्वास्थ्याशी संबंध येतो. ‘सुदृढ शरीर तरच सुदृढ मन’ अशी योगाची धारणा आहे. योगशास्त्र वैद्यकासारखे चिकित्साशास्त्र नसले तरी वैद्यकातील आरोग्यरक्षण, व्याधी निवारण, व्यक्तीमत्व विकास या सारख्या विषयांमुळे त्याचा व वैद्यकाचा जवळचा संबंध असल्याचे लक्षात येते. योगचिकित्सेतील षट्क्रिया धोती, बस्ती, नेती, त्राटक, नौली व कपालभाती आदी आहेत.  अतिरक्तदाब, हृदयरोग, दमा, मधुमेह, बुध्दकोष्ठ, स्त्रियांचे रोग, अतिस्थूलता अथवा लठ्ठपणा, निद्रानाश, मणक्याचा त्रास, मनोविकार, सर्दी डोकेदुखी, अम्लपित्त, अन्नमार्गाचे विकार अशा विविध व्याधींवरही योगचिकित्सा परिणामकारक ठरत असल्याचे उल्लेख आहेत. 

योगासने...

योगसाधनेसाठी शरीराची विशिष्ठ प्रकारची स्थिती ठेवणे व त्यात सुख वाटणे म्हणजे विशेष आसन होय. म्हणून ‘स्थिरसुखं आसनम’ म्हणजेच स्थिर व सुखात्मक शरीरस्थिती म्हणजे आसन अशी आसनाची व्याख्या योगसुत्रात केली आहे. योगशास्त्रानुसार शरीर शुध्द करण्याच्या प्रक्रियेसाठी शरीर ज्या विविध स्थितींमध्ये ठेवले जाते त्यांना ‘योगासने’ म्हणतात. यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान व समाधी ही योगाची आठ अंगे सांगितली आहेत. यास अष्टांगयोग असेही म्हटले जाते. 

आंतरराष्ट्रीय योग दिवस...

संयुक्त  राष्ट्र महासभेच्या 69 व्या अधिवेशनात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संयुक्त राष्ट्र आम सभेला आंतरराष्ट्रीय योगदिवस साजरा करण्याचे आवाहन केले होते. त्यानुसार 11 डिसेंबर 2014 रोजी युनोच्या 193 सदस्य देशांनी 177 समर्थक देशांच्या संमतीने 21 जून हा आंतरराष्ट्रीय योग दिवस म्हणून साजरा करण्याचा निर्णय जाहीर केला. याला 47 मुस्लिम देशांनीही आपला पाठिंबा जाहीर केला.  महाराष्ट्र शासनाचा शिक्षण विभाग आणि पतंजली योग समितीच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्रातील प्राथमिक, माध्यमिक उच्च माध्यमिक शाळा व महाविद्यालयातील सुमारे 1 लाख 6 हजाराहून अधिक शिक्षकांनी योग प्रशिक्षण शिबीरात सहभाग घेवून योगाचे प्रशिक्षण घेतले आहे. 19 जून रोजी कोल्हापूर जिल्ह्यातील 12 तहसिल व कोल्हापूर शहरात 4 हजाराहून अधिक शिक्षकांना पतंजली तर्फे प्रशिक्षण देण्यात आले. शहरातील 55 ठिकाणी तर जिल्ह्यात 150 ठिकाणी सुमारे 25000 हजार अबालवृध्द योगा करतील. गुरुवार दि. 21 जून रोजी सकाळी साडेसहा ते पाऊणे आठ यावेळेत योगा  प्रात्यक्षीके होणार आहेत. मुख्य कार्यक्रम विभागीय क्रीडा संकुल रेसकोर्स मैदान, छत्रपती संभाजीनगर परिसर येथे होईल. यावेळी जिल्हाधिकारी, जिल्हा क्रीडा अधिकारी यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर व पतंजलीचे पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. 

योगासनाचे उपक्रम...

कोल्हापूर शहर : विभागीय क्रीडा संकुल, स्वामी समर्थ मंदीर कोटितीर्थ, तपोवन विद्यालय, वीर सावरकर हॉल राजलक्ष्मीनगर, टेंबलाई मंदीर पोलिस लाईन-लाईन बझार, आर.के.नगर सोसायटी क्रमांक 2, एकजूटी तरुण मंडळ मोहिते कॉलनी, शिवाजी मंदीर शिवाजीपेठ, पतंजली मेगा स्टोअर्स आशिष चेंबर शाहूपुरी, सणगर तालीम मंगळवारपेठ, नागोबा देवालय नागाळा पार्क, विश्‍वपंढरी हॉकी स्टेडियम परिसर, महाराष्ट्रनगर. जिल्हा : मौनी विद्यापीठ मैदान गारगोटी, चिंचवाड हायस्कूल, राम मंदीर गडहिंग्लज, ग्रामपंचायत राधानगरी, यशवंत मंगल कार्यालय हुपरी, कळे, मलकापूर, जुने दत्तवाड, शिरोळ, चंद्रगड, भुदरगड, आजरा. 

योग विद्याधामतर्फे आज उपक्रम

योग विद्याधामतर्फे योगदिनानिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. गुरुवार दि. 21  जून रोजी सकाळी 6 ते 7 यावेळेत कोरगावकर हॉल, राजारामपूरी येथे स्टेट बँक कर्मचार्‍यांसाठी योग होईल. सकाळी 7 ते 9 यावेळेत शहरातील प्रमुख मार्गांवरून ‘योगसंदेश’ प्रभातफेरी काढण्यात येईल. सकाळी 11 ते 12 यावेळेत तवनाप्पा पाटणे हायस्कूलमधील विद्यार्थ्यांसाठी उजळाईवाडी (ता. करवीर) येथील योगभवन-हनुमाननगर येथे योग कार्यशाळा होणार आहे.