Fri, Mar 22, 2019 22:53होमपेज › Kolhapur › शिवरायांचे निर्णय वर्तमानातही लागू 

शिवरायांचे निर्णय वर्तमानातही लागू 

Published On: Jun 03 2018 1:14AM | Last Updated: Jun 03 2018 12:09AMकोल्हापूर : प्रतिनिधी 

छत्रपती शिवाजी महाराज आणि आजच्या राज्यकर्त्यांमध्ये मोठा फरक आहे. 350 वर्षांपूर्वी शिवरायांनी रयतेसाठी घेतलेले निर्णय वर्तमान काळातही लागू पडत आहेत. मराठा माणूस शिवाजी महाराजांची पूजा करतो, स्मारक उभा करतो, शिव चरित्र सांगतो पण हे वरवरचे आहे. ‘जय शिवाजी...’ म्हणून अनेकांनी धंदा सुरू केलाय. शिव छत्रपतींसाठी मरण सोपे आहे.पण, मूल्य, तत्त्वे  आणि त्यांच्या विचारानुरूप जगणे कठीण आहे, असे प्रतिपादन नाबार्डचे माजी अध्यक्ष यशवंतराव थोरात यांनी केले. 

अखिल भारतीय मराठा महासंघ कोल्हापूर जिल्हा यांच्या वतीने आयोजित केलेल्या शिवराज्याभिषेक व्याख्यानमालेत ‘वर्तमानाच्या शोधात : छत्रपती शिवाजी’ या विषयावर ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ.डी.बी.चौगुले होते.थोरात म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांना समजून घेण्यासाठी शेतीचे धोरण, व्यक्तीगत आचरण, शोषण विरोधी लढा, गरिबांविषयीची कणव, राष्ट्राबद्दलची भूमिका अभ्यासने गरजेचे आहे. 

थोरात म्हणाले, देशातील योजना चांगल्या आहे, मात्र त्यांची योग्य प्रकारे अमंलबजावणी होतच नाही. प्रभावी नेत्यांच्या मागे जाण्या पेक्षा स्वत: प्रभावशाली बना. तुमच्या मागून नेते फिरतील. आपण स्वत: जबाबदारी घेत नाही तर दुसर्‍यावर ढकलण्याची आपली मानसिकता आहे.शक्तीशाली नेता पाहिजे असेल तर रयतेने अंकुश ठेवला पाहिजे, असा इतिहास सांगतो.जेथे जनतेचा अंकुश जातो, तेव्हा राजकर्ते वाढतात.आपण प्रत्येक गोष्टींवर टीका करतो आणि दुसर्‍यांच्या गोष्टींवर विश्‍लेषण देतो.सामान्य माणूस निष्ठने उभा राहिला तर मोठी शक्ती निर्माण होते. आताच्या नेत्यांना ‘व्हिजन’ आहे का, असा प्रश्‍न देखील थोरात यांनी उपस्थित केला. शेतकर्‍यांना त्रास देणार्‍या वतनदारांना ठेचून शिवरायांनी शेतकर्‍यांना मदतीचा हात दिला. महाराजांची शक्ती समाजातील रयतेवर अवलंबून होती.दूरदृष्टी असणार्‍या शिवरायांनी सर्वजाती धर्मातील लोकांना एकसंघ करून सुराज्य निमार्ण केले.

यावेळी माजी डेप्युटी गर्व्हनर उषा थोरात, ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार, उद्योगपती चंद्रकांत जाधव, माजी महापौर हसिना फरास, उद्योगपती संग्राम पाटील, बाळ पाटणकर, उद्योगपती व्ही.बी.पाटील, राजदीप सुर्वे आदी उपस्थित होते.प्रास्ताविक जिल्हाध्यक्ष वसंतराव मुळकी, यांनी केले. पाहुण्यांची ओळख इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत यांनी करून दिली.  शैलजा भोसले यांनी आभार मानले.सुत्रसंचालन प्रा.माणिक पाटील यांनी केले. स्वागत बबनराव रानगे यांनी केले.

आजचे व्याख्यान : प्रा.देवेंद्र कासार सायंकाळी 5.30 वाजता 
विषय - राष्ट्र निर्माते : छत्रपती शिवाजी महाराज.